आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘विश्वामित्रा’ला नोबेल (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाल्मीकी, व्यास, विश्वामित्रांच्या काळात नोबेल पुरस्कार नव्हते. नाही तर वाल्मीकी व व्यासांना साहित्याचे आणि विश्वामित्राला विज्ञानाचे नोबेल मिळू शकले असते. अर्थातच कुणी असेही म्हणू शकेल की त्यांचे साहित्य वा विज्ञान हे नोबेल सन्मानापेक्षाही महान आहे! ब्रिटनचे पीटर हिग्ज आणि बेल्जियमचे फ्रान्स्वा आँग्लेअर या दोन शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्रातील नोबेल सन्मान जाहीर करून ‘रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस’ने या युगातील विश्वामित्रांचा गौरव केला आहे. प्रत्येक पदार्थातील वस्तुमानाला काय कारण असते याचा शोध हे दोघेजण गेली 50 वर्षे घेत होते. अणूतील मूलकणांना म्हणजे ‘सब-अ‍ॅटोमिक’ पार्टिकल्सना त्यांनी ‘गॉड पार्टिकल’ ऊर्फ ‘देवकण’ म्हटले होते. त्यांच्याच नावाने ओळखल्या गेलेल्या या कणांना ‘हिग्ज बोसॉन’ कण असे वैज्ञानिक निबंधांमध्ये म्हटले जाऊ लागले होते. जेव्हा हा सिद्धांत त्यांनी 1964 मध्ये मांडला तेव्हा त्याचे स्वरूप ‘हायपोथिसिस’ असे होते-म्हणजे तर्काच्या निकषावर मांडलेला अंदाज असे होते. प्रायोगिक पद्धतीने हे ‘देवकण’ सिद्ध झाले नव्हते. काही आध्यात्मिक मंडळी असे म्हणतील की प्रत्येक गोष्टीत देवाचे अस्तित्व आहे, म्हणजेच चराचरात देव व्यापून उरला आहे हे तर त्यांनी हजारो वर्षे स्वीकारलेले सत्य आहे. तेव्हा यात नवीन काय? त्यांच्या आध्यात्मिक मांडणीचा वा श्रद्धेचा अवमान न करता असे म्हणता येईल की, कोणतीही तशी संकल्पना, साक्षात्कार वा श्रद्धा वैज्ञानिक प्रयोगशाळेत सिद्ध करता येत नाही. (जरी ‘विज्ञानानंदांनी’ आपल्याकडे तसे प्रयोग केले असले तरीही!) त्यामुळे हे विश्व कसे जन्माला आले? या विश्वाचा आकार केवढा आहे? ही विश्वरचना कशी चालते? जर विश्व ‘जन्माला’ आले असेल तर त्याला ‘अंत’ असेल का? या अथांग विश्वाचा ‘थांग’ लावण्याचा प्रयत्न वेदांमध्ये झाला तसाच वैज्ञानिक पद्धतीने गेल्या सहाशे वर्षांतही झाला आहे. वेदांती मानतात की ‘ब्रह्म’ नावाच्या गोष्टीपासून विश्व निर्माण झाले. वैज्ञानिक आणि ‘ब्रह्मर्षी’ दोघेही असे मानतात की, हे जग कुणी नियोजन करून घडवलेले नाही. त्यामुळे या ‘ब्रह्मा’ला किंवा त्या देवकणाला हेतू, प्रयोजन, इच्छा वगैरे गोष्टी लागू नाहीत. सध्या युरोप-अमेरिकेतही या मुद्द्यावर अहमहमिकेने वाद चालू आहे. शाळा-कॉलेजांमध्ये ‘ईश्वरनिर्मित विश्वा’चा सिद्धांत शिकवायचा की उत्क्रांतिवाद आणि भौतिकशास्त्रीय विश्वजन्माची कहाणी सांगायची असा तो वाद आहे. धर्ममार्तंड म्हणतात की, ईश्वरनिर्मित योजना विद्यार्थ्यांना समजावून सांगायची तर विज्ञानवादी/नास्तिक व उत्क्रांतीवादींच्या मते भौतिकशास्त्राची तत्त्वे सांगायची व संशोधन सुरू ठेवायचे. निरीश्वरवाद मानला की कर्मवादाला अर्थ उरत नाही. मग कर्मवादाचे महत्त्व मानवी जीवनातील/नात्यातील नैतिक-व्यावहारिक संबंधांपुरतेच उरते. या विश्वाला जन्मही नाही आणि अंतही नाही, हेतूही नाही आणि उद्दिष्ट-दिशाही नाही हे मान्य करणे अगदी भल्या-भल्या नास्तिकांनाही जमत नाही. परंतु जे वृत्तीने, मनाने आणि ‘श्रद्धेने’ कट्टर विज्ञानवादी असतात ते मात्र प्रत्येक गोष्ट प्रयोगशीलतेवर, सिद्ध करण्यावर पुन:पुन्हा प्रत्यय येण्यावर भरवसा ठेवतात. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बाळ फोंडके यांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास, ‘‘वैज्ञानिकांच्या जगात तर एकापाठोपाठ एक भूकंप होत राहिले आहेत. त्यांनी मोठ्या मुष्किलीनं घातलेली विश्वाची घडी पार विसकटून गेली. क्ष-किरण, गामा किरण वगैरे विक्षिप्त वल्लींनी आपलं अस्तित्व प्रकट केलं. किरणोत्सर्ग नावाचा अजब प्रकार दृष्टोत्पत्तीस आला. जे. जे. थॉमसनला इलेक्ट्रॉनचा शोध लागला. तो अणूचा घटक असल्याचंही दिसून आलं. अणू हा अविभाज्य असा मूलभूत कण नसून तो प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन या घटक कणांपासून बनलेला आहे हे समजलं. त्यातही प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे त्या अणूच्या अतिशय लहान अशा केंद्रात दाटीवाटी करून वसलेले असतात आणि त्यांच्याभवती इलेक्ट्रॉन घिरट्या घालत राहतात, सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणा-या ग्रहांसारखे, हेही ध्यानात आलं. सारंच काही उलथंपालथं झालं. आइन्स्टाइन नावाचं एक वादळ घोंगावत आलं आणि त्यानं अवकाश आणि काल यांच्या संकल्पनाच बदलून टाकल्या. दिक्कालाचं एकच एक महावस्त्र असल्याचं आणि त्यापायी त्यांचे धागे एकमेकांमध्ये गुंफून गेल्याचं त्यानं सांगितलं. एवढंच काय पण स्थलकाल मुळी निरंकुश, निरपेक्षच उरले नाहीत. ते सापेक्ष ठरले. त्यांच्याकडे पाहणारा कुठं आणि केव्हा उभा आहे यावर सारं काही अवलंबून असल्याची भन्नाट कल्पना मांडली गेली. एकसमयावच्छेदेकरून या दमछाक करणा-या शब्दाचाच दम घोटला गेला. तो निरर्थकच बनला. एवढंच काय पण कोणतीही बाब निश्चितच नसल्याचं हायजेनबर्गनं सांगितलं. सारं काही संभाव्यतेवर अवलंबून असल्याचं तो म्हणू लागला. म्हणजे या क्षणी मी हे इथं बसून लिहीत आहे असं म्हणणंच चुकीचं ठरलं किंवा तुम्ही हे वाचत आहात हेही. तसं असण्याची जास्तीत जास्त किती शक्यता आहे एवढंच फार तर आपण थोड्याफार ठामपणे सांगू शकू, असंच हायजेनबर्गनं ठाम निवेदन केलं. ही कल्पनाच इतकी अनाकलनीय होती की दस्तुरखुद्ध आइन्स्टाइनलाही ते पेलवली नाही. त्यानं आपला आक्षेप नोंदवण्यासाठी देवाचीच साक्ष काढली. ‘गॉड डजंट प्ले डाइस’ त्यानं जाहीर केलं. द्यूत खेळल्यासारखे फासे फेकून देव काय करायचं याचे निर्णय घेत नाही. आइन्स्टाइनचं म्हणणं चूक आहे हे त्याला सांगण्याची हिंमत फक्त नील्स बो-हकडेच होती. त्यानं त्याच्याच भाषेत आइन्स्टाइनला ठणकावलं. ‘डोंट टेल गॉड व्हॉट टू डू.’ तू नको देवाला सांगूस त्यानं कसं वागायचं ते.’ अशा देवकणाचा शोध घेण्यासाठी काही वर्षांपूर्वी युरोपमध्ये एक महासंशोधन प्रकल्प हाती घेण्यात आला. युरोपातील अनेक देशांनी मिळून त्यात अब्जावधी युरोंची गुंतवणूक केली. अनेक देशांतील प्रकांड शास्त्रज्ञ त्या प्रकल्पात गुंतवले गेले. ‘लार्ज हायड्रॉन कोलायडर’ नावाना ओळखल्या गेलेल्या ‘सर्न’च्या या प्रयोगांमध्ये गेल्या वर्षी या देवकणांच्या ऊर्फ हिग्ज-बोसॉनच्या कणांच्या अस्तित्वाचा पुरावा मिळाला. त्यामुळे विश्वजन्माच्या, ‘बिग बँग’च्या, विश्वरूपाच्या गूढावर प्रकाश पडू शकला. या सिद्धांताला छेद देणारा प्रबंध फ्रेड हॉयल आणि डॉ. जयंत नारळीकर यांचा होता - ज्याच्या सिद्धांतानुसार वर उल्लेखिलेल्या अनादि-अनंत विश्वाची संकल्पना मांडली गेली होती. पीटर हिग्ज यांनी म्हटले होते की, ‘बिग बँग’ ऊर्फ महाविस्फोटाच्या वेळी जी प्रचंड ऊर्जा बाहेर पडत राहिली त्याच वेळी अनेक मूलकणांची निर्मिती झाली. सुरुवातीला या कणांच्या अंगी वस्तुमान नव्हते. विलक्षण ‘हलके’ असल्याने ते मुक्तपणे फिरत होते. विश्व निर्माण करण्याची क्षमता त्यांच्यात नव्हती. ती क्षमता त्यांच्यात आली ती त्यांना वस्तुमान प्राप्त झाल्यावर. पण त्यांना वस्तुमान मिळालंच कसं? हिग्जनी गणित मांडून असे सांगितले की, त्या कणांमध्ये बोसॉन जातकुळीचा एक इलेक्ट्रॉनपेक्षा दोन लाख पटींनी भारी असलेला किंवा प्रोटॉनच्या शंभरपट वजन असलेला कण निर्माण झाला. या कणाच्या प्रभावक्षेत्राचे जाळे निर्माण झाले आणि सर्वदूर पसरले - विश्वजन्माची कहाणी सुरू झाली. ती सांगणा-या विश्वामित्रांना आता नोबेल पुरस्कार प्राप्त झाला आहे!