Home | Editorial | Agralekh | nominee of osama

ओसामाचा वारस!

divya marathi | Update - Jun 18, 2011, 12:41 AM IST

जवाहिरी आल्यामुळे आता ‘अल कायदा’ची वाटचाल कशी व कोणत्या दिशेने होईल यावर विविध तज्ज्ञांची विविध मते आहेत.

  • nominee of osama

    अयमान अल जवाहिरी या इजिप्तमधल्या एका नेत्रतज्ज्ञाची जगभरातील लोकांनी दखल घ्यावी, असे त्याचे नक्की कोणते योगदान आहे? डॉ. जवाहिरीने लाखो दृष्टिहीनांना दृष्टी दिली आहे, किंवा लाखांनी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करून गोरगरिबांचा दुवा मिळवला आहे, तर असे काहीही नाही. मात्र तरीही त्याची दखल जगभरातील राज्यकर्त्यांना आणि प्रसिद्धी माध्यमांना घ्यावी लागली. कारण गेली ४० वर्षे ओसामा बिन लादेनचा प्रमुख सहकारी असलेल्या जवाहिरीच्या ताब्यात ओसामाच्या मृत्यूनंतर अल कायदाची सर्व सूत्रे आली आहेत. ‘अल कायदा’ या दोन शब्दांची दहशत जगभरात इतकी प्रचंड आहे की त्याबद्दल जगातील कुठल्याही देशातील निरक्षर माणसालाही फारसे काही सांगण्याची गरज नाही. लादेनला अमेरिकेने पाकिस्तानात मारल्यानंतर अल कायदाचे प्रमुखपद दुस-या क्रमांकावरील जवाहिरीच्याच ताब्यात जाईल, अशी अटकळ अमेरिकी कू टनीतितज्ज्ञ आणि हेरखात्यातील अधिकारी यांनी बांधलीच होती. मात्र तरीही ओसामाइतका करिश्मा नसलेल्या जवाहिरीला या पदावर येताना कदाचित मोठ्या अंतर्गत विरोधाला तोंड द्यावे लागण्याची शक्यताही अनेकांना वाटत होती. जवाहिरी आल्यामुळे आता ‘अल कायदा’ची वाटचाल कशी व कोणत्या दिशेने होईल यावर विविध तज्ज्ञांची विविध मते आहेत. काहींच्या मते लादेनच्या काळातील अल कायदाची आक्रमकता जवाहिरीच्या ताब्यात संघटन आल्यानंतर फारशी टिकणार नाही. काही तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे आता पाश्चिमात्य देशांवरील लक्ष कमी करून अल कायदा काश्मीरवर म्हणजे पर्यायाने भारतावर आपले लक्ष केंद्रित करेल. काहींच्या मते अल कायदा ही संघटना म्हणून आता कार्यरत राहणे मुश्किल आहे. असे विविध अंदाज पाश्चिमात्य विचारवंतांमध्ये चर्चिले जात आहेत.

    ओसामा बिन लादेनची प्रतिमा मुस्लिम जगतात व विशेषत: तरुणांमध्ये अत्यंत प्रिय असण्यामागे त्याने केलेला त्याग, कौटुंबिक संपत्ती, ऐषाआराम सोडून जिहादच्या रस्त्यावर जाणे हे जसे कारण आहे, तसेच त्याच्या विचारधारेबरोबर जगातील मुस्लिमांसकट बहुतांश शांतताप्रेमी जनतेचे मतभेद असले, तरी लादेनची त्याप्रति असलेली कटिबद्धता हेदेखील त्यामागील प्रमुख कारण आहे. जवाहिरीला ही लोकप्रियता मिळणे कठीणच नव्हे तर अशक्य आहे. मुळात हा प्रश्न जवाहिरी, लादेन किंवा ‘अल कायदा’ आणि तालिबानसारख्या इतरही शेकडो संघटना व त्यांनी सुरू केलेला बेधुंद दहशतवाद इतपत मर्यादित नाही. सोव्हियत युनियनच्या विघटनानंतर शीतयुद्धाचा काळ संपुष्टात आला. जगात अमेरिकेच्या दादागिरीला कुठलीही आडकाठी उरली नाही. नेमक्या याच कालावधीत अमेरिकेतील बुद्धिवंत किंवा कूटनीतितज्ज्ञांनी नवे राजकीय प्रमेय मांडण्यास सुरुवात केली होती. 'क्लॅश आॅफ सिव्हिलायझेशन' किंवा संस्कृतींचा संघर्ष हा नवा विचार अमेरिकी ध्येय-धोरणांमध्ये आला. क्लॅश आॅफ सिव्हिलायझेशनचा जनक म्हणून सॅम्युएल हंटिग्टन याचे नाव साधारणत: घेतले जात असले तरी त्याच्याही आधी बर्नार्ड लुई या प्रिंस्टन विद्यापीठातील पौर्वात्यवादाच्या अभ्यासकाने १९९० मध्ये लिहिलेल्या 'मुस्लिमांच्या आक्रमकतेची मुळे' या निबंधाच्या शेवटी संस्कृतींचा संघर्ष ही संकल्पना सर्वात आधी मांडली होती. लुई हादेखील अमेरिकी धोरण समितीचा सर्वात महत्त्वाचा सल्लागार होता. त्यानंतर हंटिग्टन याने लुई याच्या निबंधातील ही संकल्पना अधिक घातक पद्धतीने विकसित केली. जगातील संघर्ष हे आर्थिक वा विचारधारांवर आधारित नसून ते सांस्कृतिक संघर्ष आहेत ही त्यांची सैद्धांतिक मांडणी होती. या संघर्षात उत्कृष्ट संस्कृती टिकून राहील, जुनाट व निकृष्ट संस्कृतीचा नाश होईल, असे भविष्य वर्तवून हंटिग्टन गप्प बसला नाही तर बुश प्रशासनात महत्त्वाचा सल्लागार असलेल्या हंटिग्टनने अमेरिकी ध्येयधोरणांमध्ये याचा अंतर्भाव करायला भाग पाडले. अमेरिकेतील झिओनिस्ट लॉबी आणि त्यांच्या हातात असलेले भांडवली वित्तपुरवठ्याचे व्यवसाय यामुळे तत्कालीन अमेरिकी प्रशासनालाही ही भूमिका सोयीची होती. आज जगभरात मुस्लिमांच्या विरोधात ते विरुद्ध आपण ही जी दरी निर्माण झाली आहे यामागे लुई, हंटिग्टन आदी अनेक कूटनीतितज्ज्ञांनी दिलेले वैचारिक अधिष्ठान महत्त्वाचे आहे. भारतात थोड्याफार फरकाने हीच विचारधारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंडळींनीही विकसित करण्याचा प्रयत्न केला. मात्र हजारो वर्षांच्या सांस्कृतिक सरमिसळीतून भारतीय समाजाच्या नेणिवा प्रगल्भ झालेल्या असल्यामुळे संघाला लुई वा हंटिग्टनसारखा प्रतिसाद सुदैवाने लाभला नाही. अल कायदाचा प्रचार व प्रसार करून संघटनेचे जाळे संपूर्ण जगभर पसरवणा-या ओसामा बिन लादेनचेही हंटिग्टन व लुईप्रमाणेच म्हणणे होते. पाश्चिमात्य किंवा ख्रिस्ती-ज्यू संस्कृतीचे इस्लामवरील आक्रमण हे जगातील कोट्यवधी मुस्लिमांना त्यांच्या जीवनपद्धतीवरील आक्रमण वाटते. हे आक्रमण केवळ सांस्कृतिक अंगाने होत नसून या आक्रमणामागे एक ठोस लष्करी पाठबळ आहे. इस्लामविरुद्ध ख्रिश्चन वा ज्यू हे या संघर्षाला मिळालेले वळण शीतयुद्धाच्या संदर्भात प्राप्त झाले. विद्वेषाचे राजकारण हे कसे परस्परपूरक असते याचे यापेक्षा चांगले उदाहरण दुसरे कुठलेही नसेल.

    या सर्व पार्श्वभूमीवर अल कायदाची सूत्रे घेतलेला जवाहिरी किती बॉम्बस्फोट घडवतो, लोकशाहीच्या मूल्यांसाठी लढणा-या किती जणांचे अपहरण करून त्यांचे गळे चिरतो, बुरखा न घालणा-या किती मुस्लिम स्त्रियांना दगडाने ठेचून मारण्याचे फतवे काढतो याच्या हिशेबाचे अंदाज बांधण्यापेक्षा या विचारधारेला विरोध करावा लागेल. हा विरोध अहिंसेच्या, सर्वसमावेशकतेच्या, आपल्यापेक्षा वेगळ्या जीवनपद्धतीचा आदर शिकवणा-या अशा भारतीय सुफी-हिंदू तत्त्वज्ञानातून साकारलेल्या गांधीवादातूनच होऊ शकतो, हे जगाला पटवून देण्याचे कामही आपल्यालाच करावे लागेल.

Trending