आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनाची नव्हतीच....जनाचीही सोडली! ( अग्रलेख )

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


राजमान्य राजर्षी भास्करशेठ जाधव यांचा पुत्र आणि कन्या या दोघांच्याही शाही विवाह सोहळ्याच्या निमित्ताने शरद पवार यांनी अलीकडच्या काळात होणा-या शाही विवाह सोहळ्यांवर जोरदार टीका केली, हे योग्यच झाले. फुले-शाहू-आंबेडकर या त्रिमूर्तीचा जप करत या महान विभूतींच्या विचारांना खड्ड्यात घालण्याचे काम गेली कैक वर्षे राज्यात सुरू आहे.मात्र, सध्या मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रामध्ये अन्नपाण्याविना जनतेची त्राही उडालेली असताना कोट्यवधींच्या भोजनावळी व ओंगळवाणे देखावे लग्नाच्या निमित्ताने उभारून स्वत:कडील मनी पॉवरच्या बेडकुळ्या साध्या-भोळ्या जनतेला दाखवणे म्हणजे, अठराव्या शतकातील फ्रेंच शेतमजूर जनतेला भाकरी मिळत नसेल तर केक खा, असे सांगणा-या राजकुमारीपेक्षाही काकणभर अधिकच उद्दामपणाचे आहे. खरे तर महाराष्ट्रात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अशा शाही जेवणावळींची परंपराच आहे. 72च्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरही अकलूजला मोहिते-पाटील यांच्या घरात झालेल्या शाही विवाह सोहळ्याबाबतही असेच वादाचे वादळ उठले होते.

त्या काळात बिस्लेरीच्या बाटल्यांचा शोध लागलेला नसल्याने चक्क विहिरीतच बर्फाच्या लाद्या सोडल्याचे प्रत्यक्ष डोळ्यांनी हा सोहळा पाहिलेल्यांचे म्हणणे आहे. मुळात दुष्काळ असो वा नसो, लग्न समारंभात असा गुन्हेगारी प्रवृत्तीचा खर्च करणे ही मानसिकता, आपल्यापेक्षा कनिष्ठ वर्गातील माणसाच्या शोषणातूनच येऊ शकते. कारण श्रमापेक्षा धनसंचय श्रेष्ठ, असा विचार सरंजामी किंवा भांडवली मूल्ये शिकवत असतात. त्यामुळेच श्रमिकाला त्याच्या श्रमाचे योग्य दाम न देता त्याचे शोषण करून मिळालेल्या वरकड मूल्यातून महाप्रचंड धनसंचय केला जातो. या धनसंचयाद्वारेच मग समाजावर सत्ता गाजवली जाते. लग्न हा ज्या कुटुंब व्यवस्थेचा गाभा आहे, ती कुटुंब व्यवस्थाच मुळात खासगी मालमत्तेचे गमक आहे, असे फ्रेड्रिक एन्गेल्स याने आपल्या ‘फॅमिली प्रायव्हेट प्रॉपर्टी अँड स्टेट’ या पुस्तकात सांगितले आहे. अश्मयुगापासून ते आजच्या उत्तर आधुनिक जगापर्यंतच्या प्रवासात कुटुंब व्यवस्थेत जे काही बदल झाले ते आपल्यानंतर आपण केलेला धनसंचय गावखात्यात जमा होऊ नये; तो आपल्या अपत्यासच मिळावा, यासाठीच झाल्याचे एन्गेल्स याने सप्रमाण सिद्ध केले आहे.

खासगी मालमत्तेचा व पर्यायाने भांडवलशाहीच्या उगमाचा स्रोत हा कुटुंब व्यवस्थेतूनच होत असला तरीही पाश्चात्त्य समाजात श्रमाला प्रतिष्ठा असल्याने व श्रम हे जाती-पातीनिहाय विभागले गेले नसल्याने तेथे शोषणातून आलेल्या वरकड मूल्याची गुंतवणूक केली जाते. याउलट भारतातील सनातनी विचारधारेमुळे येथील शूद्रांना ज्ञान, सत्ता, संपत्ती व प्रतिष्ठेपासूनच दूर लोटले गेले. त्यामुळेच त्या समाजाकडे संपत्ती आल्यानंतर ते लग्न समारंभात उधळपट्टी करून खोटी प्रतिष्ठा मिळवण्याचा मार्ग चोखाळतात. शाहू महाराजांच्या काळात वेदोक्त प्रकरण घडले होते. शाहू महाराजांच्या स्नानाप्रसंगी तेथील ब्राह्मण पुराणोक्त श्लोक म्हणत असल्याचे त्यांना भेटायला गेलेल्या राजारामशास्त्री भागवतांनी त्यांच्या लक्षात आणून दिले. तेव्हा शूद्रांसाठी केवळ पुराणोक्त श्लोकच म्हटले जाऊ शकतात, अशी भूमिका स्थानिक ब्राह्मणांनी घेतली. त्यातून एक मोठा वाद त्या काळी झाला होता.

शूद्रांना सनातन धर्मात नाकारण्यात आलेल्या ज्ञान, सत्ता, संपत्ती व प्रतिष्ठेतील पहिल्या तीन गोष्टी भांडवलशाही व्यवस्थेत प्राप्त करणे सध्या काही प्रमाणात शक्य झालेले आहे. मात्र, ज्ञान, सत्ता, संपत्ती प्राप्त करूनही प्रतिष्ठा हाती लागत नाही. त्यामुळेच सत्ता, संपत्तीच्या जोरावर खोट्या प्रतिष्ठेच्या मागे आज बहुजन समाजातील अनेक जण लागलेले दिसतात. युरोप-अमेरिकेत पैशाची गुंतवणूक नव्या भांडवली उद्योग-व्यवसायात केली जाते व त्या उलट भारतात त्याची उधळपट्टी होते, त्यामागे हे महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळेच खोट्या प्रतिष्ठेच्या मागे लागणा-यांना सार्वजनिक जीवनात स्थान नाही, असे शरद पवारांनी म्हणणे स्वागतार्ह असले तरी केवळ तेवढेच म्हणून भागणार नाही, त्यासाठी सशक्त पर्याय द्यावा लागेल. महाराष्ट्रातील दुष्काळ हा काही जाधवांच्या घरातील लग्नापासून सुरू झालेला नाही. तो गेल्या पावसाळ्यापासूनच सुरू झाला आहे. मग तेव्हापासून जाधवांच्या लग्नापर्यंत महाराष्ट्रात घालण्यात आलेल्या जेवणावळींचा विचार केल्यास काय दिसते?

स्वत: शरद पवार गेल्या महिन्यातच भास्कर जाधव यांच्याच चिपळूण शहरात आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनात वैचारिक भाषण करून आले; तेथे ज्या लाडू-जिलब्यांच्या पंगती उठल्या, त्याला काय मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळाने होरपळणा-या शेतकरी-शेतमजुरांचा पाठिंबा होता? भास्कर जाधवांना कानपिचक्या देणारे पवारसाहेब छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, अविनाश भोसले, नितीन गडकरी यांच्या शाही सोहळ्यांना कसे काय उपस्थित राहतात, असा प्रश्नही उद्या जनतेतून विचारला जाईल व भास्कर जाधवांच्या शाही सोहळ्याने त्यांची उडालेली झोप पुढे कित्येक रात्रींसाठी उडून जाऊ शकते. आपल्या ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या पुस्तकात म. फुले लग्नाची व्याख्या करताना म्हणतात की, ‘मानव स्त्री-पुरुषांस सारासार विचार करण्याची बुद्धी मिळालेली आहे. काही अविचारी दांडग्या लोकांस कलह करता येऊ नये, म्हणून सर्वानुमते असे ठरले असावे की, हरएक मानव पुरुष व स्त्री हे उभयतां मरेतों एकमेकांचे साथी व सहकारी होऊन एकचित्ताने वर्तन करून सुखी व्हावे, म्हणून जी कबुलायत करण्याची वहिवाट घातली आहे, त्यास लग्न म्हणतात.या लग्नानंतर वधू-वराने इष्टमित्रांच्या भेटी घेतल्यानंतर मोठ्या आनंदाने कोणत्याही धर्माची अथवा देशाची आवडनिवड न करता एकंदर सर्व मानवबंधूंतील पोरक्या मुली-मुलांस व अंध-पंगूस आपल्या शक्तीनुसार दान-धर्म करीत आपल्या घरी वा गावी जावे.’

फुल्यांचा हा विचार प्रत्यक्ष कृतीत आणण्याची हिंमत व कुवत फुले-शाहू आंबेडकरांच्या नावाने जप करणा-या एका तरी सत्ताधारी पठ्ठ्यामध्ये आहे का? खोट्या प्रतिष्ठेच्या मागे लागलेल्या समाजाला खरी प्रतिष्ठा कशाला म्हणतात ते दाखवावे लागते. प्रतिष्ठा ही श्रमातून उत्पन्न झालेल्या संपत्तीचा विनियोग कुटुंबासाठी व समाजासाठी करण्यात असते, हे स्वत:च्या कार्यकर्त्यांना वा समाजाला समजवायचे असल्यास मुळात स्वत:मध्ये श्रम करण्याची हिंमत हवी. बलाढ्य इंग्रजांना चरख्याद्वारे देशाबाहेर घालवता येईल, असे समजायला गांधीजी म्हणजे काही गावठी अण्णा नव्हते. या देशात इंग्रजी भांडवलशाहीद्वारे रुजू पाहणा-या नव्या मूल्यांमध्ये श्रमाची प्रतिष्ठा मारली जात होती. त्याची जाण गांधीजींना होती, त्यामुळेच आश्रमात प्रत्येकाला संडास साफ करण्यापासून चरख्यावर सूत कातण्यापर्यंतची सक्ती होती. खोट्या प्रतिष्ठेपासून मुक्त होण्याचा गांधी, फुले, शाहू, आंबेडकरांनी सांगितलेला हाच एक मार्ग आहे. दुर्दैवाने तो मार्ग अवलंबण्याची हिंमत आज कुणातही नाही, त्यामुळे खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पनेत अडकलेल्या राजकारणात दिवस ढकलण्याचेच काम पवार यांना करावे लागणार आहे. महाराष्ट्रातील धनदांडग्यांनी मनाची लाज केव्हाच सोडली होती, आता जनाचीही सोडली आहे. आणि हा सांस्कृतिक ओंगळपणा हे आता समाजाचेच (मध्यमवर्गाचेही) प्रतिष्ठित लक्षण बनले आहे.