आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्डे नव्हे; सहानुभूतीचे दालन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागच्या आठवड्यात औरंगाबाद शहरात महापौर परिषद झाली. त्या निमित्ताने देशभरातील महापौर आले होते. या सर्व महापौरांनी या ऐतिहासिक शहरातील रस्तोरस्ती पडलेले खड्डे आणि जागोजागी साठलेला कचरा पाहून काय म्हटले असेल? याची चिंता शहरातील काही संवेदनशील नागरिकांना उगाचच लागून राहिली आहे. या प्रकारामुळे शहराची इभ्रत वगैरे गेली आणि पर्यटन शहराची देशभर बदनामी झाली असे वाटून काही सुजाण नागरिक उगाचच खंत करीत आहेत. त्यांना तसे करण्याचे काहीही कारण नाही. कारण देशभरातील महापौरांना खड्डे आणि रस्त्यावरचे कचऱ्याचे ढिगारे पाहून औरंगाबादविषयी कोणतेही उणेपण वाटण्याऐवजी इथल्या महापौरांविषयी सहानुभूतीच वाटली. कोणी विश्वास ठेवा अगर ठेवू नका, महापौर भगवान घडमोडे यांनी स्वत:च ही बाब स्पष्ट केली आहे. खरे तर मागच्या बुधवारी औरंगाबाद शहरात कोसळलेल्या धुवाधार पावसाने शहरात जी काही अनागोंदी निर्माण झाली होती तीही या देशभरातल्या महापौरांसमोर व्हायला हवी होती. त्यामुळे घडमोडेंविषयीच्या सहानुभूतीत भरच नसती का पडली?  

ना खेद, ना खंत; असे हे औरंगाबादचे राजकीय संत, असे म्हणायची वेळ इथल्या राजकारण्यांनी आणली आहे. निदान लोकलाजेस्तव का असेना, देशभरातील पाहुणे आपल्या शहरात येत असताना शहरातील कचऱ्याचे ढिगारे उचलण्याची, प्रमुख रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्याची तसदी औरंगाबाद महापालिकेने घ्यायला हवी होती.  ती घेतली गेली नाही आणि या शहराचे ओंगळवाणे दर्शन देशभरातील पदाधिकाऱ्यांना झाले याचे शल्यही ना पदाधिकाऱ्यांना बोचत ना अधिकाऱ्यांना. अशा परिस्थितीत हे शहर स्मार्ट सिटीतील स्वच्छ शहर स्पर्धेत २४९ वे आले काय आणि स्पर्धेतून बाहेर पडले काय, कोण पाहणार आहे? आमच्या हातात सत्ता  असताना आम्हाला जे काही करायचे होते ते साध्य झाले म्हणजे झाले. शेवटी प्रशासनावर खापर फोडून मोकळे होता येते आणि ते करताना कोणी तोंड दाबू शकत नाही, अशी मानसिकता आहे. आम्हीच काय, देशभरातील सर्वपक्षीय पदाधिकारी असेच आहेत, असे सांगायलाही इथले पदाधिकारी लाज बाळगत नाहीत. महापौर परिषदेत जे जे महापौर येऊन गेले, त्यांच्यापैकी किती महापालिका क्षेत्रात महापौर घडमोडे फिरून आले आहेत? कदाचित अपवादानेच असेल. आपल्या महापालिकेचा स्वच्छ शहर अभियानात कोणता क्रमांक आला आहे आणि आपल्या पुढे किती महापालिका आहेत, याचेही भान त्यांना नाही हेच त्यांनी असल्या उत्तरातून सिद्ध केले आहे. याच परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले की, ‘माकड मेवा’ मुळे महापालिकांची स्थिती दारुण झाली आहे. बरे झाले औरंगाबादचे महापौरही भाजपचे आहेत आणि मुख्यमंत्रीही.  जर मेवा खाणारी माकडे मुख्यमंत्र्यांना माहिती आहेत तर त्यांना तिथून हाकलून मेव्याचे न्याय्य वाटप करण्याचे काम ते का करीत नाहीत? असा प्रश्न आहे. निदान, मेवा खाणारी जी जी माकडे त्यांच्या स्वपक्षाची आहेत, त्यांच्यावर तरी त्यांनी कारवाई करायला हवी. कदाचित याबाबतीतही शिवसेनेपेेक्षा वरचढ व्हायची त्यांची इच्छा असावी. 

एकीकडे शहरात भूमिगत गटारांचे काम पूर्ण झाल्याचे सांगितले जाते आहे आणि दुसरीकडे थोडाही मोठा पाऊस आला की रस्ते आणि नाले तुंबणे सुरूच आहे. किंबहुना, यंदा ते वाढलेच आहे. नाल्यांवर शेकडोंनी बांधकामे करून नाल्याच्या गटारी केल्या जात आहेत. त्यामुळे गुरुवारी पावसाचे पाणी अनेक वसाहतींमध्ये घरात घुसले. त्यानंतर जिल्हाधिकारी एन. राम यांनी नाल्यांची पाहणी केली. त्यावरील पक्की बांधकामे पाहून ते आश्चर्यचकित झाले आणि ही बांधकामे पाडून नाले मोकळे करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पण असे काही होईल, याची अजिबात शक्यता औरंगाबादकरांना वाटत नाही. ज्या शहरात सत्ताधारी शिवसेनेचेच कार्यालय अशा प्रकारे नाल्यावर बांधण्यात आले आहे, ज्या शहरात औषधी भवनसारख्या नाल्यावर बांधलेल्या इमारतीला न्यायालयाच्या आदेशानंतरही बेकायदेशीरपणे संरक्षण दिले जाते आहे त्या शहरात एन. राम काय, खुद्द प्रभू राम आले तरी  अशी अन्य बांधकामे पाडण्याची त्यांची बिशाद नसेल, याची शहरवासीयांना खात्री आहे.  जुनी बांधकामे तोडण्याचे सोडा, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरदेखील  नाल्यावर पक्के बांधकाम करणे सुरू आहे.  ही हिंमत कुठून येते? सत्ताधारी राजकारणीच जेव्हा नियम तोडून वागत असतील तर तशाच कृत्यासाठी इतरांनी तरी भय का बाळगावे, या प्रश्नाच्या उत्तरातच ती हिंमत दडलेली असावी, असे दिसते. विदेशी वाणिज्यदूत खरोखरच हुशार म्हणायचे. काही तासांच्या शहरातील वास्तव्यात त्यांनी या शहरात आमच्या देशातील उद्योजक येणार नाहीत असे सांगितले. आम्हा शहरवासीयांसाठी हे सारे नवे नसले तरी त्यातून आम्ही काही शिकत नाही आणि काळजीही घेत नाही. राजकारण्यांचे फावते ते त्यामुळेच.
 
- दीपक पटवे
निवासी संपादक (औेरंगाबाद)
बातम्या आणखी आहेत...