आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्वलंत प्रश्नांशिवाय लाट येणे अशक्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणा भाजपने आता केलेली नसली तरी दिल्लीच्या राष्‍ट्रीय कार्यकारिणीच्या अधिवेशनात त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. काही विपरीत घडले तरच काही वेगळे घडू शकते. अन्यथा मोदींच्या नावाला विरोध करण्याची हिंमत राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघातही नाही. आता संघ आणि मोदी यांच्यात ताळमेळ वाढण्याची शक्यता अधिक बळकट होत जाईल.

भाजपमध्ये मोदींना तीन प्रकारे विरोध होऊ शकत होता. एक तर इतर मुख्यमंत्र्यांचा विरोध, दुसरी शक्यता त्यांच्याच पक्षातील सुमारे अर्धा डझन नेत्यांची होती, तर तिसरे म्हणजे भाजपमधील वरिष्ठ नेत्यांचाही विरोध होताच! मोदींचे दिल्लीत झालेले अभूतपूर्व स्वागत आणि भाजप अध्यक्ष राजनाथसिंह यांनी भाषणाच्या सुरुवातीला मोदींसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे मोदींचा पंतप्रधानपदाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे या तिन्ही वर्गांतील नेत्यांनी भाषणात, आडमार्गाने आपले नाव रेटण्याचा प्रयत्न केला ना कोणी मोदींना विरोध केला किंवा त्यांच्यावर टीका केली.
मोदींनी आपल्या भाषणातून सभागृहाच्या प्रशंसेला नवी चकाकी दिली.

गुजरातची निवडणूक तीन वेळा जिंकून त्यांनी पंतप्रधानपदाचे द्वार तर गाठले होते; पण ते द्वार जोराजोरात ठोठावत आहेत, असेच त्यांच्या भाषणावरून वाटत होते. काँग्रेस आणि इंदिरा-फिरोज गांधी कुटुंबांबाबत यापूर्वी कोणत्याही जनसंघ किंवा भाजपच्या नेत्यांनीही अशी कटू भाषा वापरली नाही. इतक्या शेलक्या शब्दांत टीका केली. त्यांनी हरितक्रांतीचे श्रेय लालबहादूर शास्त्रींना देऊन टाकले. काँग्रेस नेत्यांची तुलना त्यांनी ‘वॉचमन’शी (चपराशांशी नव्हे) केली. त्यांनी भाजपला ‘मिशन’ आणि काँग्रेसला ‘कमिशन’चा पक्ष म्हटले. मोदींच्या या आक्रमकपणावर काँग्रेसची मिळमिळीत प्रतिक्रिया कशाचे द्योतक आहे? काँग्रेसनेही आपले शस्त्र म्यान केले आहे, असे तर नव्हे? मग याचा गंभीर परिणाम आम जनतेवर होणार नाही का?

काँग्रेस आणि भाजपच्या भावी पंतप्रधानांत तुलना तर करून पाहा! जयपूर आणि दिल्ली अधिवेशनाचीही! काँग्रेसच्या पंतप्रधानांचा चेहरा इतका पडलेला होता, ते पाहून असे वाटत होते की, अंतिम निरोपाचे गीतच म्हणत आहेत. याउलट भाजपचा उमेदवार विजयश्री मिळवण्यासाठी गर्जना करत आहे, पण केवळ गर्जना करून 272 जागा जिंकता येतील का? लोकसभा निवडणुकीत जेव्हा कधी एखाद्या पक्षाने हा आकडा पार केला असेल, तेव्हा त्यांच्याकडे गर्जना करणारा कोणीतरी असेल. पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट ही की, त्यांच्याकडे एखादा मोठा मुद्दा असेल. कधी गरिबी हटाव, कधी इंदिरा हटाव, कधी इंदिराजींच्या बलिदानाचा मुद्दा असेल आणि कधी बोफोर्स, तर कधी राममंदिर उभारणीचा प्रश्न असेल.

2014 च्या निवडणुकीत भ्रष्टाचाराचा मुद्दा आकार घेत होता, परंतु अण्णा हजारेंच्या आंदोलनाने त्यातील हवाच काढून घेतली. त्यांचीही हवा गेली. काँग्रेस आपल्या कर्तृत्वानेच या मुद्द्याला बळकट करत चालली होती. आताच हेलिकॉप्टरमध्ये 360 कोटींच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा देशाला त्यांनीच दिला आहे, पण विरोधी पक्षही या मुद्द्याला गरम करू शकले नाहीत. कारण सत्तेवर असताना त्यांच्यावरही शिंतोडे उडालेलेच होते. यात सर्वात मोठी अडचण अशी आहे की, त्यांच्याकडे भ्रष्टाचाराविरोधात अशी कोणती प्रतिमा नाही. बोफोर्समध्ये ज्याप्रमाणे विश्वनाथ प्रतापसिंग होते, तर आणीबाणीमध्ये जयप्रकाश नारायण होते. नरेंद्र मोदी ही पोकळी भरून काढू शकतील? जर ते मुख्यमंत्री नसले असते तर देश त्यांच्यामागे लागला असता. दहा वर्षे राज्य करून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लागलेला नाही, परंतु जनता भ्रष्टाचाराच्या विरोधात प्रतीकात्मक व्यक्ती अशांनाच मानते, जो या मुद्द्यावर बंड करेल किंवा त्याग क रेल. नरेंद्र मोदींना अशी संधी मिळेल का? ते भ्रष्टाचाराच्या विरोधात देशभर लाट निर्माण करू शकतील का? एखादी लाट निर्माण केल्याशिवाय ते मजबूत आघाडी उभी करू शकत नाहीत.

पक्षाचा अडथळा तर त्यांनी दूर केलाच आहे, पण त्यांच्या नेतृत्वाखाली 200 जागांची जुळवाजुळव करणे दृष्टोत्पत्तीस येत नाही तोपर्यंत भाजप आघाडीतील जुने घटक पक्ष त्यांच्याकडे पुन्हा येतील कसे? कायदेशीर नव्हे, पण पक्षीय दृष्टिकोनातून पाहिल्यास आज भारत छोट्या छोट्या क्षेत्रात विभागले गेलेले प्रजासत्ताक राज्य बनले आहे. अखिल भारतीय म्हणवणारे पक्ष काही राज्यांपुरतेच मर्यादित राहिले आहेत. बहुतांश राज्यांवर प्रादेशिक नेत्यांचे वर्चस्व प्रस्थापित झालेले आहे. त्या नेत्यांशी तडजोड केल्याशिवाय 272 चा आकडा गाठणे अशक्य आहे. या तडजोडीतूनच बनलेल्या सरकारची अवस्था मनमोहन सरकारपेक्षाही वाईट होईल. याला एकच मार्ग आहे, मोदींनी एखादी मोठी लाट निर्माण करावी. जी विद्यमान भाजप आणि काँग्रेसपेक्षाही मोठी असावी. ती खरोखरच संपूर्ण भारतात निर्माण व्हावी. त्यांनी लालबहादूर शास्त्री आणि प्रणव मुखर्जींची प्रशंसा करून भाजपची कक्षा तर रुंदावली , पण ते पी. व्ही. नरसिंहराव यांना विसरले? त्यांना दक्षिण भारत आपल्यासोबत घ्यायचा नाही का?

जी गोष्ट अडवाणी यांनी सांगितली, ती लक्ष देण्याजोगी आहे. अल्पसंख्याकांचा विश्वास प्राप्त करणे भाजपसाठी मोठे आव्हान आहे. विशेषत्वाने नरेंद्र मोदींचे नाव भाजप उमेदवारपदासाठी घोषित करेल तेव्हा याची गरज आहे. या कामी नरेंद्र मोदींनी स्वत: जबाबदारी घेऊन पुढाकार घ्यावा. तरच याचा आश्चर्यकारकरीत्या फरक पडेल. काहीही असो, हा मुद्दा देशव्यापी लाट निर्माण करण्याजोगा नाही. जर मोदी खरोखरच पंतप्रधान बनू इच्छित असतील तर त्यांना एखाद्या ज्वलंत प्रश्नावर लाट निर्माण करावी लागेल. ज्यामुळे भाजपचे मतदान पाच ते दहा टक्क्यांनी वाढेल. विकास हा मुद्दा तर आहेच, पण त्याचे दावेदार अन्य मुख्यमंत्रीही आहेत. जर गरिबी हटाव, भ्रष्टाचार मिटाव यासारख्या मुद्द्यांना जर ते ठोस आकडेवारीसह उचलणार असतील तर जात, धर्म, राज्यांच्या भिंती ढासळतील आणि एक देशव्यापी लाट निर्माण होईल. मग संतापची नव्हे, तर आशेची लाट निर्माण होऊ शकेल.ज्याला 26 रुपये रोजाने गावात आणि 32 रुपये रोजाने शहरात गुजराण करावी लागते, अशा लोकांसाठी एखाद्या नेत्याने 100 रुपये रोज अशी कमाई देण्याचे आश्वासन दिले तर त्या नेत्याला त्याचा पक्ष किंवा आघाडी पंतप्रधान बनण्यापासून कसे रोखतील?


rdr.vaidik@gmail.com