आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरागसता हरवणारे रिअ‍ॅलिटी शोज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन पिढी ही आधीच्या पिढीपेक्षा नेहमीच हुशार असल्याचे लहान मुलांना कौतुकाने म्हटले जाते. अर्थात त्यात तथ्यही आहे. बदलती सामाजिक परिस्थिती, आधुनिक शिक्षण, सुबत्ता, विविध क्षेत्रांतील खुल्या होणा-या संधी याचा परिणाम लहान मुलांवर होत असतो. त्यामुळे बुद्धी, आकलन शक्ती, समज अशा सर्वच बाबतीत ही मुले जुन्या पिढीला मागे टाकणारीच ठरतात. त्यांच्या या बुद्धीला, कौशल्याला वाव देण्याचा प्रयत्न शाळा, पालक यांच्या माध्यमातून होत असतो; पण देशाच्या पातळीवर रिअ‍ॅलिटी शोज घडवून या मुलांच्या बुद्धीचा, कलागुणांचा वापर करून पैसे कमावण्याचा वाहिन्यांचा धंदा ही खूपच आक्षेपार्ह बाब आहे. तरीही मुलांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ म्हणून या रिअ‍ॅलिटी शोजकडे पाहिले जाते आणि पालकही आपल्या मुलांना प्रोत्साहन देतात याबद्दल आश्चर्य वाटते. मुलांची निरागसता मारून त्यांना अकाली प्रौढ बनवून शेवटी कोणतीच दिशा त्यांच्या आयुष्याला या रिअ‍ॅलिटी शोजमधून मिळत नाही.


रिअ‍ॅलिटी शो म्हणजे एक मोठे प्रस्थ होऊन बसले आहे. मात्र, यामध्ये केवळ नृत्य, गायन, काही जनरल नॉलेजचे प्रश्न, स्वयंपाक बनवणे, एखादी वस्तू बनवणे किंवा चित्र काढणे एवढेच कलागुण मर्यादित आहेत. त्यापेक्षा वेगळ्या काही कला आहेत किंवा कलागुण मुलांमध्ये असू शकतात याची फारशी दखल घेतली जात नाही. या सर्व स्पर्धांमध्ये देशभरातून मुलांची निवड केल्याचे वारंवार सांगितले जाते. प्रत्येक निवडीसाठी मुले आणि पालकही बहुसंख्य दाखवले जातात, जेणेकरून शोची लोकप्रियता लक्षात यावी. मग काही विशिष्ट निकष लावून या मुलांना निवडले जाते. मग त्यांचे प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष स्पर्धा होते. हा सर्व प्रकार काही महिने सुरू राहतो. त्यानंतर विजेता ठरलेल्या त्या मुलाचे आयुष्य कसे आता बदलून जाणार असे एक वातावरण निर्माण केले जाते. या स्पर्धेत असलेला झगझगीतपणा, ग्लॅमर आणि थोडा भावनिक स्पर्श दिला जातो. निवडली जाणारी बहुतेक मुले ही चांगल्या घरातलीच असतात. त्यामध्ये जेवणात लोणचे असल्याप्रमाणे एखादा स्पर्धक अगदी वीज न पोहोचलेल्या खेड्यातून आलेला असतो, एक वेळ जेवण मिळताना मारामार असलेल्या गरीब घरातून एखाद्या मुलीला घेतात, अल्पसंख्याक किंवा समाजाच्या उतरंडीवरील जातीतून येणारा एखाद्-दुसरा स्पर्धक असतो आणि एखादा अपंगही. मग यांच्या ख-या कहाण्या ऐकून परीक्षक आणि प्रेक्षक यांचे हृदय हेलावते आणि डोळ्यात अश्रू जमा होतात; पण देशामध्ये अशा मनाला स्पर्श करणा-या अनेक कहाण्या आहेत. गरिबी, उपासमारी हे आजही देशाचे वास्तव आहे. ते जाणून घेण्यासाठी रिअ‍ॅलिटी शोजची काय गरज? या मुलांच्या गरिबीचे, असाहाय्यतेचे या शोजमधून भांडवल केले जाते आणि कार्यक्रमाला सहानुभूती मिळवून पर्यायाने टीआरपी वाढवला जातो.


त्यामुळे हा दिखाऊपणा बाजूला ठेवून जरा वास्तवाचा विचार करूया. कोणतीही व्यावसायिक वाहिनी ही मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रिअ‍ॅलिटी शोज ठेवत नाही तर त्याचा वापर करून नफा कमावण्यासाठी हे कार्यक्रम असतात. या स्पर्धांमध्ये सहभागी होणारी मुले ही साधारण आठ ते 12 या वयोगटातली असतात. अभ्यास करण्याचे, खेळण्याचे, हसण्या-बागडण्याचे, नवे काही शिकण्याचे त्यांचे वय असते; पण या कोवळ्या वयातच त्यांना रिअ‍ॅलिटी शोजमधून घराघरात पोहोचवले जाते की ती मुले म्हणजे छोटे स्टार्सच बनतात. त्यांना सगळीकडे मिळणारे महत्त्व, लोकप्रियता याची चटक एवढ्या लहान वयातच अनुभवाला येते. अभ्यास, खेळ, शाळा सोडून काही महिने ही मुले घरापासून दूर राहतात. त्यांना टीव्हीसमोर सादर करताना चंट बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. बहुतेक वेळा रिअ‍ॅलिटी शोज हे ‘स्क्रिप्टेड’ असतात. अनेकदा कार्यक्रम बघताना ही मुले किती हजरजबाबी आहेत, असे वाटते; पण त्यातला बहुतांश भाग हा आधीच ठरलेला असतो. तसेच स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीच्या तणावाला ही मुले सामोरी जातात तो त्यांच्या वयासाठी योग्य नसतोच. लहान लहान गोष्टीमध्ये त्यांची आपापसात तुलना केली जाते. ‘परफेक्ट’ असणे हे इतके महत्त्वाचे होऊन बसते की लहानशा चुकीलाही माफी नसते. मग तो ताण सहन न होऊन मुले रडतात. हा प्रकार तर एकदम क्रूर वाटतो. या स्पर्धेला एवढे प्रतिष्ठेचे बनवले जाते की मुले रडायला लागली की प्रेक्षकांतून पालकांच्या डोळ्यातही पाणी येते आणि परीक्षकांच्याही. पण अशा वेळी पालक आपल्या मुलांना या स्पर्धेमध्ये ठेवतातच कशाला? एवढे काय त्याचे आयुष्य यामधून बदलणार असते?


अशा रिअ‍ॅलिटी शोजमधून स्वप्नांची खोटी दुनिया उभी केली जाते आणि त्यामध्ये सर्वोच्च पदावर पोहोचण्याचे आव्हान मुलांसमोर ठेवले जाते. कपडे, केशभूषेपासून सर्व काही छानछान, चकचकीत दाखवले जाते. ग्लॅमर, लोकप्रियता यांचा इतका मारा केला जातो की मुलेच काय, पण त्यांचे पालकही त्याला हुरळून जातात. हा रिअ‍ॅलिटी शो जिंकणं हा त्यांच्या जन्म-मरणाचा प्रश्न होऊन बसतो. जणू काही आयुष्यात यश मिळवण्याचे दुसरे काही पर्यायच नाहीत. प्रत्यक्षात उत्तम गायक किंवा नृत्यांगना होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागते. त्यासाठी कोणतेही रिअ‍ॅलिटी शोज कामी येत नाहीत. यशासाठी शॉर्टकट नसतो. रिअ‍ॅलिटी शोज जिंकणा-या मुलांची किंवा अगदी मोठ्या माणसांची मक्तेदारीही काही काळापुरती मर्यादित असते. रिअ‍ॅलिटी शोज जिंकलेले कोणते स्पर्धक तुमच्या लक्षात आहेत? कोण त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये टॉपच्या पदावर आहेत? याची उत्तरे देता येणार नाहीत. काही शोजमध्ये तर अंतिम फेरी जिंकायची असेल तर त्यापुढे त्या विजेत्याला मिळणा-या कामाचा काही आर्थिक हिस्सा संबंधित वाहिनीली द्यावा लागतो. असा करारच त्या स्पर्धकाकडून करून घेतला जातो व त्यानंतरच त्याला ‘नंबर वन’ बनवले जाते.


या सगळ्याचा विचार करता आपल्या निरागस मुलांना आणि भावी तरुण पिढीला लहान वयातच प्रौढ का बनवायचे, असा प्रश्न पडतो. मुलांकडे उपजत काही कलागुण असतील तर त्याला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करून योग्य वेळी स्पर्धेसाठी तयार करून मग त्याच्या आयुष्याला दिशा दिली जाऊ शकते. या स्पर्धेमध्ये सहभागी होणारी मुले खरंच हुशार असतात; पण त्यांच्या हुशारीला या स्पर्धा त्यांच्या नफ्यामध्ये परावर्तित करतात. आपले कर्तृत्व दाखवण्यासाठी मुलांसमोर मोठे आयुष्य असते. त्यांचे खेळण्या-बागडण्याचे वय अशा तणाव आणि खोट्या दुनियेमध्ये गेले तर असलेले गुणही ही मुले विसरून जातील. कारण या स्पर्धांमधून एक आदर्श त्यांच्यासमोर ठेवला जातो आणि त्याप्रमाणे एकासाची बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. मुलांमध्ये असलेल्या वैविध्याला आणि अंगभूत कौशल्याला नष्ट करण्याचा हा प्रकार आहे आणि त्याला विरोध व्हायलाच हवा