आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूसरा सहगल नहीं आया...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


महान गायक कुंदनलाल सैगलने 18 जानेवारी 1947 रोजी जगाचा निरोप घेतला आणि ते वृत्त समजल्यावर अवघे संगीत जगत सुन्न झाले. अनेक आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्यांनी समृद्ध असलेल्या त्याच्या आवाजाने संगीतप्रेमींवर नुसती मोहिनीच नव्हती घातली, तर त्यांचे अवघे भावविश्वच व्यापले होते. सैगलच्या निधनानंतर त्यांच्या एका हळव्या कोप-यावरच आघात झाल्यासारखे त्यांना वाटले तर त्यात काही नवल नव्हते.

त्यानंतरच्या फेब्रुवारी महिन्याच्या फिल्मी इंडियाच्या अंकात त्या मासिकाचे संपादक कै. बाबूराव पटेल यांनी ‘सैगल- द मॅन हू थ्रिल्ड द नेशन’ नावाचा लेख लिहिला. त्या लेखाच्या एका भागात सैगलच्या मृत्यूनंतर देशभरात एक दु:खाची लाट कशी पसरली याचे वर्णन आहे. तो भाग असा - ‘सैगलच्या निधनाची बातमी वर्तमानपत्रांत छापून आल्यावर ज्याच्या त्याच्या तोंडी तोच विषय होता. फाळणी, दंगल, राजकारण हे विषय पूर्णपणे मागे पडले. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू, स्पृश्य-अस्पृश्य असे सर्व जण आपत्तींचा दीर्घकालीन इतिहास असलेल्या भारतीय चित्रपटसृष्टीच्या या सार्वकालीन महान गायकाच्या अचानक आणि दु:खद निधनाचीच आत्यंतिक आदरभावाने चर्चा करत होते.

लोकांचे सैगलवर केवळ प्रेमच होते असे नाही, तर त्यांची त्या मधुर आवाजावर भक्तीच जडली होती. त्या आवाजाला ते दैवी वरदान मानत. त्याच्या मृत्यूबरोबर लाखो आत्म्यांना त्यांच्या जीवनातले गाणेच लयाला गेल्यासारखे वाटले आणि यात काहीच आश्चर्य नव्हते की, संगीताचा कान असलेला प्रत्येक जण देशातल्या अशा लाखो लोकांप्रमाणेच त्याच्या मृत्यूने हळहळला.रेल्वेगाड्या, बसगाड्या, ट्रॅम, टॅक्सी, रस्ते, चित्रपटगृहे, बागा, रेसकोर्स कुठेही जा, सैगलच्याच आठवणींनी त्याच्या चाहत्यांच्या मनात गर्दी केली होती. सर्व स्त्री-पुरुष, मुले-मुली, तरुण-वृद्ध, गरीब-श्रीमंत प्रत्येक जण आपापल्या परीने एकमेकांना सैगल हा किती थोर गायक होता, याच्या आठवणी सांगून गहिवरत होता आणि त्यांच्या मनाला भावलेले त्याचे एखादे गाणे सर्वोत्तम असल्याचे सांगत होता.’

सैगलचे गाणे त्या काळी संगीतप्रेमींच्या मनावर सहजासहजी न पुसला जाणारा ठसा उमटवून गेले. त्याबद्दल बाबूराव पटेलांनीच असे लिहिले आहे, की saigal turned music into a simple emotional poetry of the soul- he cant be forgotten so easily, not till this music-mad nation suddenly goes deaf.

सैगलचे गाणे लाखो सामान्यजनांच्या घराघरात आणि हृदयात तर पोहोचले होतेच; पण त्यात मोठ्या संख्येने थोर व्यक्तिमत्त्वेही होती. त्यापैकी एक होते बहुरंगी व्यक्तिमत्त्व असलेले दीवान शरर! कथाकार, गीतकार, नाटककार, पटकथाकार अशी चौफेर मुशाफिरी करणा - दीवान शरर यांनी व्ही. शांताराम यांच्या अनेक चित्रपटांची पटकथा लिहिली होती. शकुंतला, डॉ. कोटनीस की अमर कहानी अशा पटकथा त्यांच्याच नावावर आहेत. काही चित्रपटांत त्यांनी छोट्या मोठ्या भूमिकाही केल्या आहेत. तर असे हे दीवान शरर यांनाही सैगलच्या मृत्यूने अगदी गलबलून आल्यासारखेच झाले आणि त्यांना एकदा सैगलच्या आठवणीने एक हृदयस्पर्शी काव्य स्फुरले. ते काव्य -
‘सहगल की याद’
न जाने सागर-ए-सहगल बना था कौन सी गिल से,
कि अबतक इक महक सी आ रही है उसकी मेहफील से ।
नसीम-ए-सुबह की रफ्तार में उसका तरन्नुम है,
की उसकी लय में लहरे गा के टकराती है साहिल से ।।
अभी तक याद है हम को तरन्नु मे जिया उसकी
निगाहों से, अदाओं से, जिगर से, जान से, दिल से ।।
है उस के दिलरूबा नगमों की नैरंगी का यह आलम
की अब रोना है खुद कातिल लिपटकर अपने बिस्मिल से ।
नहीं मुमकीन की मिट जाए दिलों से याद सहगल की,
खयाल-ए-जल्व-ए-गुल जा नहीं सकती अना दिल से ।।

संगीतकार नौशाद यांना तर सैगलच्या ‘शहाजदान’ चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन करण्याचे भाग्य लाभलेले आणि सैगलची थोरवी ते जाणून होते, हे सांगायलाच नको. सैगल हा एकमेवाद्वितीय कसा होता, याचे त्यांनी अगदी यथार्थपणे वर्णन केले आहे ते असे - ऐसा कोई फनकारे मुकम्मल नहीं आया, नग्मों का बरसता हुआ बादल नहीं आया, संगीत के माहिर तो बहुत आये है लेकीन, दुनिया में कोई दूसरा सहगल नहीं आया ।
याविषयी आता अधिक लिहिणे न लगे!