आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यावरची चित्रबद्ध कादंबरी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या कादंबरीवर आधारित चित्रपट बनणं ही आता सर्वसामान्य बाब झाली आहे. एखाद्या चित्रपटाचं पुस्तकात रूपांतर होण्याचेही प्रयोग केले गेले आहेत. पण एखादा चित्रपट बघताना आपण एखादी कादंबरी वाचतोय असा आभास सहसा होत नाही. ‘द लंचबॉक्स’ हा चित्रपट तो आभास सत्यात उतरवतो. रितेश बात्राच्या या चित्रपटाला ऑस्करचं नामांकन मिळालं नाही. त्यामुळे चित्रपटाशी संबंधित अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. हा चित्रपट पाहताना ती खरी असल्याचं जाणवतं हेही नेहमीपेक्षा वेगळंच आहे.


पण या चित्रपटाचं वैशिष्ट्य एवढ्यात संपत नाही. चित्रपटाचं माध्यम सार्वजनिक असल्यानं तो समूहात पाहता येत असला तरी या चित्रपटाची खरी मजा ही एकांतात एकट्यानंच अनुभवण्यात अधिक आहे. कारण हा केवळ चित्रपट नाही तर सेल्युलॉइडवर लिहिलेली, चित्रबद्ध केलेली एक नितांतसुंदर, निष्पाप आणि उत्कट कादंबरी आहे. जी केवळ यातील पात्रांशीच नव्हे तर मुंबई नावाच्या एका वादळी सचेतन वातावरणाची कहाणी आहे. या वातावरणात जगण्याची धडपड करणा-या कोट्यवधी लोकांच्या स्वप्नांतील एक गोफ आहे. जगण्याच्या पराकोटीच्या दबावाखाली नैसर्गिक भावनांचा जो चोळामोळा होतो त्याची शोकांतिका आहे. ‘लंचबॉक्स’चं कथाबीज एका चुकीत दडलेलं आहे. मुंबईतील प्रसिद्ध डबेवाल्यांशी ती निगडित आहे. मुंबईत राबणा-या लाखो चाकरमान्यांना त्यांचा रोजचा डबा न चुकता देण्याबाबत त्यांची प्रसिद्धी आहे. पण एकदा चुकून एकाचा डबा दुस-यालाच पोहोचवला जातो आणि त्यातून एक नवी कथा आकाराला येते. ‘लंचबॉक्स’ची ही कथा एव्हाना सा-यांना माहीत असल्यानं ती पुन्हा सांगण्याची गरज नाही. पण हा चित्रपट फक्त या कथेपुरता मर्यादित ठेवला तर तो अन्याय ठरेल. ‘लंचबॉक्स’ हा अनेक अर्थानं भारतीय चित्रपटांमधील एक महत्त्वाचं वळण अधोरेखित करतो. आजवर केवळ कला चित्रपट म्हणून अशा चित्रपटांना मुख्य धारेतून म्हणजेच व्यावसायिक चित्रपटांच्या रांगेतून वगळण्यात आलंय. कारण या चित्रपटांना ठरावीक प्रेक्षकवर्गच असतो आणि त्याला व्यावसायिक यश कधी लाभत नाही असे पूर्वापारचे समज. अशा चित्रपटांतील कलाकारांची ठरावीक अनाकलनीय अभिनय क्षमता आणि तेवढीच अनाकलनीय अशी दिग्दर्शकीय कौशल्ये यामुळेही असे चित्रपट पाहताना प्रेक्षक एका ओझ्याखालीच असतात. हे ओझं असतं तो चित्रपट समजून घेण्याचं. ‘लंचबॉक्स’ या सर्वांना सुखद अपवाद ठरतो. तो बघताना सुखद अपेक्षाभंगांचे अनेक प्रसंग प्रेक्षक अनुभवतो. त्यामुळे एकाच वेळी चोखंदळ प्रेक्षकांसोबतच सर्वसामान्य प्रेक्षकांनाही तो आपल्यासोबत एका सुंदर प्रवासाला घेऊन जातो.


प्रेम ही भावना तुम्ही किती पद्धतीनं व्यक्त करू शकता याची अनेक उदाहरणं या चित्रपटांत आहे. आणि तीदेखील कोणत्याही गाण्याविना, शारीरिक जवळिकीविना दृश्यबद्ध केलेली. तरीही ती प्रेक्षकांना भावतात. पडद्यावर आपल्याला दिसते ती साजन फर्नांडिस व इला यांची अस्फुट प्रेमकथा. साजन निवृत्तीकडे झुकलेला पन्नाशीचा एकाकी विधुर आणि इला एक पस्तिशीची मध्यमवर्गीय गृहिणी. यांच्यातील प्रेम यशस्वी होणार नाही याची जाणीव जशी त्यांना असते तशीच ती प्रेक्षकांनाही असते. तरीही दोघे ज्या उत्कटतेने प्रेम करतात त्याच उत्कटतेनं प्रेक्षकही त्यांच्या या प्रेमाला प्रतिसाद देतो. याचं कारण या कथेतील निष्ठुर तरीही निरागस वाटणा-या सहजतेत आहे. जी आपण सर्वांनीच कधी ना कधी अनुभवलेली असते. आणि ही सर्व कथा तेवढ्याच सहजतेनं उतरवणारे यातील कलाकार.


इरफान खान या अभिनेत्याच्या काळात आपण वावरतोय याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा. बॉलीवूडची कोणी कितीही टिंगल करो पण याच बॉलीवूडमध्ये इरफानसारखे जातिवंत अभिनेते आहेत हे विसरून चालणार नाही. ज्यांच्यामुळे भारतीय चित्रपटाला एक वजन प्राप्त होतं. ही काहीशी अतिशयोक्ती वाटते का? जर ती तशी वाटत असेल तर एकदा इरफानने रंगवलेला, खरं तर जगलेला साजन फर्नांडिस बघायलाच हवा. इरफानचा अभिनय बघताना डोळ्यांत आणि त्याचे संवाद ऐकताना कानांत प्राण एकवटण्याचीही गरज आहे. अन्यथा नुकसान तुमचंच आहे. पण त्यासोबतच तुमचं नाकही उघडं असणं गरजेचं आहे. कारण दरवेळी आपला लंचबॉक्स उघडून साजन जेव्हा त्याचा सुवास घेतो तेव्हा तो सुवास आपल्याही नाकांत पोहोचतो.


आणि हे खरोखरंच घडतं. त्यामुळेच त्याच्या प्रत्येक वाक्याला, त्याच्या प्रत्येक हालचालीला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. इरफानएवढीच महत्त्वाची भूमिका भारती आचरेकरच्या ‘आंटी’ची आहे. जी एकदाही दिसत नाही, पण आपल्या बोलण्यानेच ती प्रत्येक प्रसंग डोळ्यांपुढे जिवंत करते. रितेश बात्रानं लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा चित्रपट म्हणजे बॉलीवूडबाबत अलीकडच्या काळात घडलेली सर्वात सुंदर घटना आहे. ही चित्रबद्ध कादंबरी ऑस्कर स्पर्धेत गेली नसल्याने जगभरातील चोखंदळ प्रेक्षकही या कादंबरीला मुकणार आहेत.

Pratikpuri22@gmail.com