आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत ठरावीक चौकटीबाहेरचा विचार हवा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘फादर ऑफ ऑल मोबाइल्स’ ज्याला म्हटले गेले, तो आपल्या देशात आजवर सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला नोकिया ३३१० फोन पुन्हा एकदा नव्या अवतारात बाजारात येत असल्याची बातमी आहे. भारतीय बाजारपेठेत हा फोन पुन्हा एकदा धुमाकूळ घालणार हे निश्चित. मजबूतपणाचा आदर्श ज्याला मानले गेले तो हा फोन कालबाह्य झाल्यानंतरही त्याची बॅटरी, स्नेक गेम, “आजच्या तरुण पिढीचा पहिला फोन’ इत्यादी अनेक गोष्टींसाठी आजही चर्चेत असायचा.
 
 परंतु, इतक्या सर्व लोकप्रिय फीचर्सनंतरही हा फोन कालबाह्य का झाला, १८६५ पासूनचा इतिहास असलेली एकेकाळची जगात पहिल्या क्रमांकाची कंपनी इतकी मागे का पडली, याचे उत्तर म्हणजे नोकियाने आपल्या तंत्रज्ञानात कालानुरूप आधुनिकीकरण न करणे. आणि याच मुद्द्यावर, आजच्या तरुण पिढीने विचार करण्याची गरज आहे. 
 
मेक इन इंडिया, स्टार्ट अपसाठी योजना, मुद्रा योजना, कौशल्य विकास आदी अनेक योजना सरकार तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी राबवत आहे. ह्या सर्व बाबींचा सुयोग्य वापर आपण आपला व्यवसाय उभा करण्यासाठी नक्कीच करू शकतो. किंबहुना, तो करावाही. असे असले तरीही, उद्योगाचा विकास अवलंबून असतो तो, त्या उद्योजकाने राबवलेल्या नावीन्यपूर्ण कल्पनांवर! 
 
केवळ इलेक्ट्रॉनिक्सच नव्हे, तर प्रत्येक क्षेत्रात हे तत्त्व थोड्याफार फरकाने लागू पडते. दुसरे उदाहरण आहे ते व्हेस्पा स्कूटरचे. टू स्ट्रोक तंत्रज्ञानाची जागा फोर स्ट्रोकने घेतल्यानंतर बजाज स्कूटर कालबाह्य होऊ लागली आहे, असे वाटू लागले. परंतु, तरीही बहुउपयोगी असल्याने अनेकविध मॉडेल्समध्ये फोर स्ट्रोक ऑटोमॅटिक गिअर्सच्या स्कूटर्स बाजारात येऊ लागल्या. 
 
तरीही, आपल्या खास फीचर्समुळे लोकांच्या मनात आजही जुन्याच स्कूटरने जागा कायम ठेवलेली असल्याचे कंपनीच्या लक्षात आल्याने त्यांनी व्हेस्पा स्कूटर नवीन अवतारात बाजारात आणली आणि ती पुन्हा एकदा लोकप्रिय ठरली. या दोन उदाहरणांमधून नवउद्योजकांनी काय करावे आणि काय टाळावे हे नक्कीच शिकू शकतो. 

एखादे तंत्रज्ञान यशस्वी ठरले तरी त्यालाच चिकटून राहणे टाळावे. कारण, आजच्या स्पर्धेच्या युगात क्षणाक्षणाला नवनवीन स्पर्धक नवनवीन योजनांसहित आपल्यावर कुरघोडी करायला तयार असतात. काळानुसार अधिकाधिक स्वस्त आणि उपयुक्त तंत्रज्ञानाचा आविष्कार होत असल्याने केवळ ‘जुने तेच सोने’ हा विचार करणे सोडावे. 
 
मानसिकतेमध्ये लवचिकता ठेवावी. जुन्या वस्तूंचा आकर्षकपणा आणि उपयुक्तता कायम ठेवून त्यांना कालोचित आयाम कसा देता येईल, याचा विचार करावा. बदलासाठी सकारात्मक प्रकारे सज्ज राहावे. नवनवीन कल्पना राबवून संयमाने व आत्मविश्वासाने बाजारातील स्पर्धेला सामोरे जावे.
बीई इलेक्ट्रॉनिक्स, अंतिम वर्ष, नाशिक
 
बातम्या आणखी आहेत...