आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ऑनलाइन’ लग्नाची मोडणारी गोष्ट...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणतीही जात असो, धर्म असो वा पंथ, लग्न हा अत्यंत संवेदनशील विषय असतो. म्हणूनच तो तितक्याच गांभीर्याने हाताळला जावा, अशी समाजधुरीणांची अपेक्षा असते. सर्वसाधारणपणे दोन कुटुंबांतील-समाजातील परस्पर संबंध हाच लग्न जुळवून आणण्यात महत्त्वाचा आधार असतो. पारंपरिकरीत्या परस्पर संबंधांतून हा व्यवहार होत आल्याने माहितीच्या देवाणघेवाणीत एक प्रकारची पारदर्शकता आणि विश्वासार्हता जपली जाते. किंबहुना, तशी ती जपली जावी, अशी सर्वसाधारण धारणा असते. अशा प्रकारे परस्पर संबंध आणि विश्वासार्ह माहितीच्या आधारावर जुळून येणार्‍या लग्नाला समाजाचा दृश्य-अदृश्य धाकही असतो. अर्थात, समाजाचा धाक आणि लग्नघरांनी पुरवलेल्या माहितीत विश्वासार्हता आहे म्हणून झालेले लग्न शंभर टक्के टिकणारच, याची शाश्वती कुणी देत नाही. देऊ शकत नाही. तरीसुद्धा या व्यवहाराला नैतिकता आणि मूल्यांचे अधिष्ठान असते. जबाबदारी आणि उत्तरदायित्वाचे भान असते. मात्र बदलती जीवनशैली आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या प्रचार-प्रसाराने जगण्याचे संदर्भ बदलत गेले. कुटुंब व्यवस्थेचा मूळचा ढाचा बदलत गेला. कुटुंब आणि समाजाच्या पातळीवर परस्पर संबंधांत दुरावाही येत गेला. माणसे ‘ऑफलाइन’पेक्षा ‘ऑनलाइन’ अधिकाधिक एकमेकांच्या संपर्कात येऊ लागली. याच ऑनलाइन जगाने पारंपरिक लग्नसंस्थेची रचनाही बदलून टाकली. प्रामुख्याने नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने कुटुंबापासून दुरावलेली विवाहेच्छुक मंडळी कौटुंबिक-सामाजिक जाळे उपलब्ध नसल्यामुळे वधू-वर सूचक मंडळात नोंदणी करण्यापेक्षा ऑनलाइन साइट्सच्या माध्यमातून आपली आवडनिवड नोंदवू लागली. त्यातूनच लग्ने ठरू लागली. ऑनलाइन विवाह मंडळे चालवणार्‍या बड्या बड्या कंपन्यांचा भाव वधारला. परंतु आभासी जगाचे व्यासपीठ वापरून ‘झट मंगनी-पट ब्याह’ पद्धतीने जुळून आलेल्या लग्नाचे धागे तटातट तुटूही लागले आहेत. ही ऑनलाइन जुळून आलेली परंतु एकापाठोपाठ एक मोडणारी लग्ने आभासी जगाचे ‘साइड इफेक्ट’ असल्याचा तर्क कुणी काढल्यास त्यांना दोष देता येणार नाही. ‘मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया’ या संस्थेवर विश्वास ठेवायचा तर या घटकेला ऑनलाइन विवाह नोंदणी करून घेत असलेल्या मॅट्रिमोनी कंपन्यांचा व्यवसाय तब्बल 510 कोटींचा आहे. लक्षवेधी बाब म्हणजे, या व्यवसायाची 30 टक्के दराने वार्षिक वाढ होत असल्याचीही आकडेवारी वृत्तपत्रांमधून अलीकडेच प्रकाशित झाली आहे. शादी डॉट कॉम वा भारत मॅट्रिमोनी डॉट कॉम यासारख्या जनप्रिय साइटवर दर दिवशी तब्बल 10 हजार नव्या नोंदी होत आहेत. त्यातील 10 टक्के प्रत्यक्ष लग्नात रूपांतरित होत असल्याचा जाणकारांचा दावा आहे. एकूणच, ‘ऑनलाइन मॅट्रिमोनी’चा हा व्यवसाय ‘दिन दूनी रात चौगुनी’ बरकत देणारा असला तरीही ऑनलाइनचा वापर करून झालेल्या लग्नांपैकी जवळजवळ निम्मी लग्ने (त्यातील 10 पैकी 5 लग्ने दिशाभूल करणारी माहिती दिल्यामुळे मोडल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे.) मोडण्याच्या घटनाही समांतरपणे घडत असल्याने या कंपन्यांच्या विश्वासार्हतेपुढे प्रश्न उभा राहिला आहे. आपली विश्वासार्हता गमावू नये, पर्यायाने आपल्या व्यवसायावर गदा येऊ नये, यासाठी या कंपन्यांनी नवनव्या क्लृप्त्या लढवणे सुरू केले आहे. त्यात विवाहेच्छुक नोंदणीकृत उमेदवारांना सुखी संसाराची सूत्रे सांगणारी ‘डूज अँड डोंट्स’ प्रकारातली पुस्तिका वाटणे, सोशल मीडिया आणि ब्लॉग्जच्या माध्यमातून समुपदेशन सुरू करणे, असले उपक्रमही सुरू केले आहेत. चेन्नईतल्या एका संस्थेने तर समुपदेशात्मक पुस्तिकेच्या जवळपास 50 हजार प्रती इच्छुकांमध्ये वितरित केल्या आहेत. काही मॅट्रिमोनी कंपन्या ऑनलाइन ओळख झाल्यानंतर एकमेकांना समजून घेण्यास किमान 6 ते 9 महिन्यांचा कालावधी देण्याचा सावध सल्ला जोडप्यांना देताहेत. लग्न मोडण्यास कंपन्या जबाबदार नसल्याचे या क्षेत्रातील मंडळींचे म्हणणे असले आणि ते काही अंशी खरेही असले तरीही आभासी जगात आकारास येणारा नवा गुंताच या निमित्ताने पुढे आला आहे. या संदर्भात ऑनलाइन विवाह मंडळे चालवणार्‍यांचे म्हणणे ग्राह्य धरले तर, ऑनलाइन नोंदणी करणारे विवाहेच्छुक लोक वय, जात-धर्म, वैवाहिक पात्रता, वेतन याबाबत दिशाभूल करणारी माहिती सराईतपणे अपलोड करीत आहेत आणि हीच ऑनलाइन लग्ने मोडण्याची प्रमुख कारणे ठरत आहेत. वस्तुत: भारतीय संस्कृतीत लग्न या घटनेला असलेले अनन्यसाधारण महत्त्व ध्यानात घेता, आयुष्यातला एक मोठा निर्णय घेताना संबंधितांची फसवणूक होऊ नये, यासाठी उमेदवारांनी दिलेल्या माहितीची सत्यासत्यता पडताळून पाहणारी यंत्रणा कंपन्यांनी प्राधान्याने उभारायला हवी. परंतु यंत्रणा उभारूनही नियमाअंतर्गत सादर होणारी माहिती खोटी नसेलच, याचीही खात्री या देशात कुणाला देता येणार नाही. त्यात ऑनलाइन व्यवहार आहे म्हटल्यावर येथे संबंधित वधू-वरास दोन कुटुंबांतील परस्पर संबंध जपण्याचे बंधन नाही, की समाजाची भीती वाटण्याचे कारणही उरत नाही. म्हणूनच झटपट ऑनलाइन जुळून येणारे संसार तितक्याच वेगाने मोडतही आहेत. यात खरे तर आश्चर्य वाटून घेण्यासारखे काहीही नाही. या घटकेला, सोशल नेटवर्किंग साइट, ब्लॉग्ज यांसारख्या माध्यमातून आकारास आलेल्या आभासी जगात खरा चेहरा न लपवता अभिव्यक्त होणारे असले, तरीही मुखवटे घालूून वावरणारेच संख्येने अधिक आहेत. म्हणूनच आभासी जगात खासगी वा सार्वजनिक माहितीची मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण होत असली तरीही माहिती देणारा आणि घेणारा असे दोघेही स्वत:चे खरे रूप न लपवता ती देत-घेत आहेत, हे कुणीही या घडीला छातीठोकपणे सांगू शकणार नाही. किंबहुना, आपल्या सोयीचे तेवढेच जगापुढे आणायचे आणि अडचणीचे असेल ते चाणाक्षपणे लपवायचे, याकडेच बहुसंख्यांचा कल असतो, हे निरीक्षण या क्षणी कुणी नोंदवल्यास वावगे ठरू नये. माणसा-माणसांत प्रत्यक्ष संबंधच येत नसल्याने आभासी जगात प्रतिमेला भुलण्याची सोय इंचा-इंचावर आहे. म्हणूनच ग्लॅमरस छायाचित्रापासून खोट्या वैयक्तिक माहितीपर्यंत बरेच काही अपलोड करून समोरील माणसाची फसवणूक करणे केव्हाही सोपे आहे. अशा वेळी विवाहासाठी ऑनलाइन नोंदणी करणारे काही विवाहेच्छुक यापेक्षा वेगळे वर्तन करतील, असे मानणे म्हणजे स्वत:ची दिशाभूल करून घेणे आहे. सोशल नेटवर्किंग साइट्समुळे जग एकमेकांशी घट्ट जोडले गेले असेलही; पण ते स्वत:शी प्रामाणिक राहिले आहे का, हाच लाखमोलाचा प्रश्न ऑनलाइन लग्नाच्या मोडणार्‍या गोष्टीने प्रकर्षाने उपस्थित केला आहे.