आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्लामच्या नावाने पुन्हा फतवा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


काश्मीरमध्ये शाळकरी मुलींच्या प्रगाश या म्युझिक बँडवर काही मूलतत्त्ववाद्यांनी हरकत घेऊन फतवा काढल्याने हे प्रकरण सध्या गाजत आहे. प्रगाश बँडच्या मुलींनी डिसेंबर महिन्यामध्ये बॅटल ऑफ द बँड्स म्युझिक नावाच्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा भाग घेऊन बक्षीस मिळवले होते. त्यानंतर त्यांचा बँड फेसबुकवर लोकप्रिय झाला होता. त्या लोकप्रियतेबरोबर त्यांना काहींचा राग आणि द्वेषही सहन करावा लागला. काहींनी या तीन मुलींना धमक्या देणे, अर्वाच्य शब्द वापरणे असे प्रकार फेसबुकवर केले. त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी ग्रँड मुफ्ती बशिरुद्दीन अहमद यांनी फतवा काढून संगीत हे इस्लामच्या विरोधात असल्याचे दाखले देत बँड बंद करण्यास सांगितले. या फतव्याचा परिणाम म्हणून मुलींच्या पालकांनीच त्यांना जाहीर कार्यक्रम करण्यापासून मनाई केली आहे.

अशा पद्धतीने लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्यासाठी फतवा निघाल्याची ही काश्मीरमधली पहिली घटना नाही. काश्मीरमध्ये दहशतवादाची सुरुवात झाल्यावर 90 च्या दशकात अशा पद्धतीने इस्लामचा सोयीस्कर अर्थ लावून लोकांवर मूलतत्त्ववाद्यांनी आपले विचार लादण्याचा प्रयत्न वारंवार केला आहे. त्या वेळी दुखतरान-ए-मिल्लत या महिलांच्या दहशतवादी संघटनेच्या आसिया आंद्राबी यांनी महिलांनी बुरखे घालावेत म्हणून फतवा काढला. ज्या महिला आपला चेहरा न झाकता बाहेर पडत त्यांच्या तोंडावर रंगीत पाणी उडवले जाई. त्यामुळे एकेकाळी काश्मीरमध्ये काळ्या कपड्याला खूप मागणी होती. असाच प्रयत्न लष्कर-ए-जब्बा या आणखी एका दहशतवादी संघटनेने केला होता. पण आसिया आंद्राबी यांचा नवरा डॉ. कासीम एका मानवी हक्क कार्यकर्त्याच्या हत्येसाठी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. या बाईंनीही पुन्हा एकदा या लहान मुलींविरोधात आघाडी उघडून त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या संघटनेने हिंदी चित्रपटांचे पोस्टर्स काळे करणे, त्यावर बंदीची मागणी करणे अशी अनेक प्रकारची बंधने लादण्याचा प्रयत्न काश्मिरी जनतेवर केला.

दहशतवाद फोफावत गेल्याने फतवे काढणा-या संघटना आणि मूलतत्त्ववाद्यांमध्येही गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे. इस्लामचा अर्थ पाहिजे तसा लावून धर्म आणि अल्लाच्या नावाने लोकांना धमकावण्याचे प्रकार सतत होत असतात. संगीत हे इस्लामच्या विरोधी असल्याचे सांगणा-या मूलतत्त्ववाद्यांना कुराण हे पद्यात लिहिले आहे याचा सोयीस्कर विसर पडतो. प्रेषित डेव्हिड किंवा इस्लाममध्ये तो दाऊद म्हणून ओळखला जातो. त्याला देवाने गोड गळा दिला होता, ही गोष्ट तर प्रसिद्ध आहेच. त्यामुळे इस्लाम आणि संगीत यांचे अगदी जवळचे नाते असताना मूलतत्त्ववादी खोटे बोलून लोकांना धर्माच्या नावाने घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच इयत्ता दहावीमध्ये शिकणा-या या तीन मुलींबद्दल घाणेरड्या भाषेत लिहिणे, त्यांना धमकावणे ही बाब इस्लामशी कशी काय सुसंगत होऊ शकते? कोणता धर्म किंवा देव अशा कृत्याचे समर्थन करतो याचे उत्तर फतवा काढणारे मुफ्तीही देऊ शकणार नाहीत. काश्मीरमध्ये संगीत, नृत्य आदी कलांवर कोणतीही बंदी नाही. अगदी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करताना अनेक मुली, महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता. त्या वेळी संगीताला बंदी असल्याचे मुफ्ती किंवा इतर कोणाला सुचले नाही.

मग अचानक या शाळकरी मुलींनी एक कार्यक्रम सादर केल्यावर इस्लामच धोक्यात आल्यासारखे एकामागून एक प्रतिक्रिया का येऊ लागल्या, हा प्रश्नही विचार करण्यासारखा आहे. स्त्रिया, मुली, गरीब किंवा सलमान रश्दींसारख्या प्रसिद्ध व्यक्तींविरोधात फतवे काढायचे. त्यातून काही परिणाम झाला तर ठीक नाहीतर किमान त्या संघटनेचे अस्तित्व तरी सिद्ध होते. एका फतव्याचा प्रयोग अयशस्वी झाला तर नवीन प्रयोग करायचा आणि लोकांना सतत दहशतीचा अनुभव देत राहायचे, असे त्यांचे धोरण आहे.

या सर्व प्रकरणात एक गोष्ट खरी की ज्या पद्धतीने या मुलींना समाजाकडून आणि राजकीय पाठिंबा व संरक्षण मिळायला हवे होते तसे मिळाले नाही. दोन दिवस हे प्रकरण राष्ट्रीय माध्यमांनी उचलून धरल्यावर काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारने तक्रार नोंदवली. तीसुद्धा फेसबुकवर दिलेल्या धमक्यांच्या विरोधात. ग्रँड मुफ्तींविरोधात किंवा दहशतवादी संघटनांच्या विरोधात कोणीही चकार शब्द काढला नाही. कदाचित ग्रँड मुफ्तींना राज्य सरकारचा पाठिंबा असल्याने असेल कदाचित. अगदी मुख्यमंत्री म्हणून राहिलेल्या पीडीपीच्या नेत्या आणि सध्याच्या विरोधी पक्षनेत्या मेहबुबा मुफ्ती यांनीही स्पष्टपणे कोणतीही भूमिका यावेळी घेतली नाही. या घटनेचा निषेध नोंदवणारे खूपच कमी आवाज काश्मीरमधून आले.अगदी तेथील उर्दू वृत्तपत्रांमध्येही या प्रकरणाबाबत फारसे लिहून आले नाही. कदाचित हा फतवा काहींना खूप महत्त्वाचा वाटत नसेल. पण दुर्लक्ष करण्याएवढाही हा विषय साधा नाही. गेल्याच वर्षी पाकिस्तानमधील मलाला युसूफझाई या शाळकरी मुलीवर तालिबान्यांनी थेट गोळी झाडली होती. तिचा दोष हा होता की तिने शिक्षणाचा प्रसार मुलींमध्ये केला. त्यामुळे दहशतवादी फतव्यांना उत्तर द्यायलाच हवे आणि स्त्रिया, मुली, गरीब, दुर्बल किंवा सलमान रश्दींसारखा एखादा लेखक यांच्या बाजूनेच उभे राहायला हवे.