Home »Editorial »Columns» Once Again Tata's Take Off

टाटांची पुन्हा हवाई झेप

दिलीप सामंत | Feb 23, 2013, 02:00 AM IST

  • टाटांची पुन्हा हवाई झेप

पोलाद निर्मितीपासून आय. टी., वाहन अशा अर्ध्या डझनभर उद्योगात कार्यरत असणा-या देशाच्या आघाडीच्या टाटा समूहाने आता पुन्हा एकदा हवाई क्षेत्रात प्रवेश करण्याचे ठरवल्याने 60 वर्षांपूर्वी जे.आर.डी. टाटा यांचे दुभंगलेले स्वप्न आता पुन्हा एकदा साकार होणार आहे. 1953 मध्ये सरकारने टाटा एअरलाइन्सवर ताबा घेऊन एअर इंडिया जन्माला घातली होती. तेव्हापासून टाटांनी विमान उद्योगात प्रवेश करण्याचे वारंवार प्रयत्न केले. मात्र, यात त्यांना काही यश लाभले नव्हते.

1995मध्ये रतन टाटा यांनी सिंगापूर एअरलाइन्स समवेत देशांतर्गत हवाई सेवा सुरूकरण्याचा प्रस्ताव सरकारला सादर केला होता. मात्र, त्या वेळी या क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीस परवानगी नसल्याने हा प्रस्ताव फेटाळला आणि टाटांचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. त्यानंतर टाटांनी स्पाइस जेट या कंपनीत दहा टक्के भांडवल खरेदी केले. मात्र, त्यांची ही केवळ भांडवली गुंतवणूक होती. स्पाइस जेटच्या व्यवस्थापनात टाटांचा सक्रिय सहभाग नव्हता. आता मात्र आशिया खंडातली सर्वात मोठी लो कॉस्ट हवाई कंपनी एअर एशियासोबत टाटा समूहाने सहकार्य करार करून देशातील हवाई बाजारपेठ काबीज करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

या संयुक्त प्रकल्पाची सुमारे 250 कोटी रुपयांची गुंतवणूक असेल. महत्त्वाचे म्हणजे, देशातील हवाई उद्योग अतिशय खडतर कालखंडातून जात असताना टाटा उद्योग समूहाचे हे धारिष्ट्य वाखाणण्याजोगे ठरावे. थेट विदेशी गुंतवणुकीसाठी हवाई क्षेत्र खुले झाल्यानंतरची ही देशातील पहिली गुंतवणूक ठरणार आहे. या नव्याने स्थापन होणा-या कंपनीत एअर एशियाचे 49 टक्के, टाटांचे 30 टक्के व पोलाद सम्राट लक्ष्मी मित्तल यांचे जावई अमित भाटिया यांचे 21 टक्के भांडवल असेल; परंतु भाटिया हे केवळ गुंतवणूकदार असतील. त्यांचा व्यवस्थापनातील वाटा नगण्यच असेल. या विमानसेवेचे व्यवस्थापन एअर एशिया व टाटांकडे असेल. अनिवासी भारतीय फ्रान्सिस फर्नांडिस यांनी स्थापन केलेली ही कंपनी लो कॉस्टमधील बादशहा कंपनी म्हणून आशिया खंडात ओळखली जाते. फर्नांडिस यांनी 2001मध्ये आपले मलेशियातील राहते घर गहाण टाकून हवाई कंपनी स्थापन केली आणि एक विमान विकत घेऊन आपला कारभार सुरू केला.

आज एअर एशियाच्या मालकीची 92 विमाने आहेत आणि 20 देशांत विमान सेवा पोहोचली आहे. 2011मध्ये त्यांनी एअरबस 320 या जातीच्या 200 विमानांची खरेदी करण्याची ऑर्डर नोंदवून जगातील एअरलाइन्स उद्योगाला धक्का दिला होता. बारा वर्षांपूर्वी 9/11 झाल्यावर, जगातील हवाई उद्योग संकटात असताना एअर एशियाचा जन्म झाला. खरे तर त्या वेळी एखादी नवीन विमान कंपनी सुरू करणे म्हणजे एक मोठे धारिष्ट्यच म्हणावे लागेल; परंतु ही विमान सेवा कंपनी पहिल्याच वर्षात नफ्यात आली. तीन वर्षांनंतर त्यांनी आपल्या कंपनीचे समभाग जनतेला विक्रीस काढून कंपनीवर असलेला कर्जाचा बोजा पूर्णपणे हलका केला. त्या वेळी कंपनीच्या समभागांचा भरणा 130 टक्क्यांनी झाला होता.

एअर एशियाने आशिया खंडातील हवाई सेवेचे चित्र पूर्णपणे बदलण्याची किमया केली. सिंगापूर एअरलाइन्स, मलेशियन एअरलाइन्स, थाई एअरवेज यांची एकेकाळी आशिया खंडातील प्रमुख मार्गांवर असलेली मक्तेदारीची स्थिती एअर एशियाने मोडीत काढली आणि आपले एक स्वतंत्र स्थान निर्माण केले. त्यांनी आपल्या विमानसेवेच्या विस्तारासाठी जे काही मार्केटिंगचे प्रयोग केले त्याची दखल जगातील कॉर्पोरेट क्षेत्राने घेतली. आता भारतातदेखील अनेक नवनवीन विक्रम करण्यासाठी एअर एशिया सज्ज झाली आहे.सध्या भारतातील हवाई उद्योग अतिशय वाईट परिस्थितीतून वाटचाल करत आहे. किंगफिशर ही फार गाजावाजा करून सुरू झालेली कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने यात आणखीनच भर पडली. ज्याप्रमाणे गैरव्यवस्थापनामुळे खासगी क्षेत्रातील किंगफिशर आर्थिकदृष्ट्या धोक्यात आली, त्याचप्रमाणे सरकारी उद्योगातील एअर इंडिया या कंपनीलाही करोडो रुपयांचा तोटा झाला; परंतु सरकारने या कंपनीला जीवदान देण्याचे जाहीर केले आहे. यात मात्र अपवाद इंडिगो व स्पाइस जेटचा. सध्या देशातील याच दोन कंपन्या नफ्यात आहेत. त्यात इंडिगोचा देशातील एकूण हवाई बाजारपेठेत 27.3 टक्के वाटा असून त्यांनी आघाडीचे स्थान पटकावले आहे. म्हणजे आपल्याकडेही लो कॉस्ट एअर लाइन्सने आता हवाई बाजारपेठेवर आपली पकड घट्ट केली आहे. गेल्या तीन वर्षांत तीन विमान सेवा कंपन्या बंद पडल्या, तर येत्या वर्षात एअर एशियासह तीन कंपन्या बाजारात उतरणार आहेत.

देशातील हवाई उद्योग एका नवीन वळणावर येऊन ठेपला आहे. एकीकडे विमान सेवा बंद होत आहेत, तर दुसरीकडे काही नवीन कंपन्यांचा उदय होत आहे. सरकारने थेट विदेशी गुंतवणुकीचे दालन खुले केल्याने आता हे क्षेत्र झपाट्याने विस्तारेल. सध्या देशात एकूण असलेला 300 विमानांचा ताफा पुढील दहा वर्षांत एक हजार विमानांवर जाईल. जेट एअरवेजचा इतिहाद बरोबर सहकार्य करार होण्याची अपेक्षा आहे. इतिहाद या कंपनीत 40 टक्क्यांहून जास्त भांडवली खरेदी करेल. तर किंगफिशरही आपल्यासाठी कुणी विदेशी गुंतवणूकदार मिळेल का यासाठी जगात दारोदारी भटकत आहे. कदाचित त्यांच्या या मोहिमेत त्यांना यश येईलही. विदेशी गुंतवणूक या उद्योगात आल्यावर याचे चित्र पालटण्यास सुरुवात झाली आहे. याची सुरुवात एअर एशियाकडून झाली आहे. या निमित्ताने टाटांची या उद्योगात उतरण्याची मनीषाही पूर्ण होत आहे...

rprasadkerkar73@gmail.com

Next Article

Recommended