आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘वन बिलियन रायझिंग...’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘वन बिलियन रायझिंग’ म्हणजे नेमके काय? कोटी कोटी माणसांनी जागे होणे! संपूर्ण जगात मिळून दरवर्षी वन बिलियन म्हणजे 100 कोटी स्त्रियांवर हिंसा होते. त्या संख्येचे प्रतीक म्हणून 100 कोटी स्त्रिया आणि पुरुष घर, कार्यालय, व्यवसाय, काम यातून एक दिवस बाहेर पडतील. देशाच्या सीमा पार करून हिंसेविरुद्ध एकीचा जाहीर आविष्कार करताना म्हणतील, ‘बस्स! आता आम्ही स्त्रियांवर होणारी हिंसा सहन करणार नाही.’ विविध जाती, धर्म, वर्ण, वर्ग, भाषा, प्रदेश, देश यातील लहान-थोर, स्त्री-पुरुष सर्व जण या जनजागृतीमध्ये भाग घेणार आहेत. त्यांचा नारा आहे, ‘प्रतिकार करा, प्रेमाचा संदेश द्या, आनंद साजरा करा आणि जागे व्हा!’ हे जागतिक पातळीवरील आवाहन आहे. याची तयारी गेले वर्षभर सुरू आहे. हिंसा थांबवणे, न्याय आणि स्त्री-पुरुष समता प्रस्थापित करणे यासाठीची ही
हाक आहे.

पृथ्वीवर दर तीन स्त्रियांपैकी एक स्त्री तिच्या आयुष्यात बलात्कार किंवा मारहाणीची शिकार बनते. हे नक्कीच लांच्छनास्पद आहे. हे बदलण्यासाठी 100 कोटी स्त्रिया एकत्र येणे ही नक्कीच एक आगळी क्रांती ठरेल, या विश्वासाने ही हाक दिलेली आहे. दिवस आहे 14 फेब्रुवारी. ही हाक ‘व्ही-डे’ या आंतरराष्‍ट्रीय संस्थेने दिली आहे. या वर्षी संस्थेने 15व्या वर्षात पदार्पण केले आहे. या संस्थेच्या प्रमुख इव्ह एनस्लर ‘वन बिलियन रायझिंग’चे आवाहन करताना म्हणतात, ‘हा जागतिक प्रतिकार असेल. स्त्रियांनी एकीची ताकद ओळखायची आहे. स्त्री-पुरुषांनी बलात्कार संस्कृतीला नकार देण्यासाठीची ही साद आहे. संवाद आणि सहकार्याचे एक नवीन पर्व सुरू करायचे आहे.’

आपल्या प्रिय व्यक्तीसाठी प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त करून संत व्हॅलेंटाइन यांच्या त्यागाप्रति 14 फेब्रुवारी रोजी दरवर्षी आदर दाखवण्याची प्रथा आहे. फुले, भेटवस्तू, शुभसंदेश, प्रार्थना आणि चॉकलेट परस्परांना देऊन आनंद साजरा केला जातो. हा दिवस ‘व्ही-डे’ या संस्थेने स्थापना दिवस म्हणूनही निवडला आहे. त्यामुळे या वर्षी प्रेमाचा संदेश देताना स्त्रियांवर होणा-या हिंसेला प्रतिबंध करण्याचा निश्चय करायचा आहे. त्यासाठी कोटी कोटी माणसांनी
जागे व्हायचे आहे.

व्ही-डे या आंतरराष्‍ट्रीय संस्थेच्या संस्थापिका इव्ह एनस्लर या अमेरिकन असून जागतिक कीर्तीच्या नाटककार, कलाकार आणि स्त्रीवादी कार्यकर्त्या आहेत. 1996 मधील त्यांचे ‘द व्हजायना मोनोलॉग’ हे नाटक 48 भाषांतून 140 देशांत सादर होत चांगलेच गाजले. या नाटकाला अनेक पुरस्कार मिळाले. (वंदना खरे यांनी ते ‘योनीच्या मनीच्या गोष्टी’ या नावाने मराठीतून ते सादर केले. त्याचा 100 वा प्रयोग या निमित्ताने होत आहे.) इव्ह एनस्लर यांनी अनेक चित्रपटही दिग्दर्शित केले आहेत. त्यापैकी ‘अंटील व्हायलन्स स्टॉप्स’ हा एक. लेखिकांना लिहिते करण्यासाठी त्या एक गट चालवतात. ‘द गुड बॉडी’ या नाटकात वेगवेगळ्या संस्कृतीत समाजामध्ये स्वीकारार्ह दिसण्यासाठी स्त्रियांवर येणा-या मानसिक दबावाच्या कारणांचा ऊहापोह केला आहे.

2006 मधील ‘द ट्रीटमेंट’ या नाटकात युद्धात सहभागी झाल्याने येणारे नैतिक आणि मानसिक ताण यांचा वेध घेतला आहे. त्यांचे 2010 सालचे पुस्तक जगभरातल्या मुलींची स्वगते एकत्रित करते. त्याचे नाव आहे ‘आय अ‍ॅम अ‍ॅन इमोशनल क्रिचर : द सिक्रेट लाइफ ऑफ गर्ल्स अराउंड द वर्ल्ड’. 9 नाटके, 6 पुस्तके आणि 4 चित्रपट, नाटकांचे असंख्य प्रयोग अशा सर्जन-ऊर्जेतून त्या स्त्रियांवर होणारी हिंसा थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंसा प्रतिबंध हाच त्यांच्या चिंतनाचा विषय राहिला आहे.

‘द व्हजायना मोनोलॉग’ सादर करत असताना इव्ह एनस्लर यांना जे अनुभव आले त्यातून त्यांनी 1998मध्ये व्ही-डे ही आंतरराष्‍ट्रीय संस्था स्थापन केली. यातील व्ही म्हणजे व्हिक्ट्री, व्हॅलेंटाइन आणि व्हजायना. म्हणजेच विजय, प्रेम-जिव्हाळा आणि योनी! 2010मध्ये अमेरिकेत या नाटकाचे असंख्य प्रयोग निधी उभारण्यासाठी केले. संस्थेने हिंसाविरोधी जागृती सर्वदूर अनेक देशांतून पसरवली. मध्यपूर्वेत आधारगृहे सुरू केली आणि स्त्रियांना हिंसेपासून सुरक्षा देणा-या अनेक संघटनांना मदत केली. तालिबान दहशतीला विरोध करणा-या अफगाणी स्त्रियांच्या बाजूने संस्था उभी राहिली. कांगोमधील स्त्रियांसाठी युनिसेफच्या मदतीने 2011 मध्ये ‘सिटी ऑफ जॉय’ नावाची नवीन वसाहत स्थापन केली. तेथे हिंसेपासून मुक्त जीवन जगण्याची संधी 180 कांगो स्त्रियांना मिळाली आहे. ही वसाहत कांगो स्त्रिया स्वत: चालवतात. हिंसेपासून मुक्त जीवन जगणे शक्य आहे, हे व्ही-डे या संघटनेला दाखवून द्यायचे आहे. या विचाराचा प्रसार जगभर होण्यासाठी 2012 मध्ये संघटनेने ‘वन बिलियन रायझिंग’ हे जागतिक आवाहन केले आहे.

या आवाहनाला 160 पेक्षा जास्त देशांनी प्रतिसाद दिला आहे. 14 फेब्रुवारी 2012 पासून विविध कार्यक्रम होत आहेत. भारत आणि शेजारील दक्षिण आशियायी देश यात सामील झाले आहेत. त्यासाठी ‘संगत’तर्फे कमला भसीन यांनी सुरुवात केली. भारतात अनेक ठिकाणी त्याचे प्रतिसाद उमटले. पुष्पा रावत यांचा ‘निर्णय’ चित्रपट, इव्ह एनस्लर यांनी राजधानीत केलेले ‘आय अ‍ॅम अ‍ॅन इमोशनल क्रिचर’ या कवितेचे सादरीकरण, पियानिस्ट एलिझाबेथ सोम्बर्त आणि अहमदाबाद येथील दर्पण अकादमीच्या संस्थापक नर्तिका मल्लिका साराभाई यांची नृत्य-नाटिका, अस्मिता नाट्यसंस्थेचे ‘दस्तक’ हे नाटक, रवींद्र रंधवा-स्वर भास्कर ‘मानी मेरी...’ हे गाणे, अनेक चित्रपट महोत्सव, चित्रप्रदर्शन, कार्यशाळा, सभा, पुस्तक प्रकाशने, कविता, गाणी आणि असे बरेच कलात्मक आविष्कार! नाटक आणि लोकप्रिय कलाविष्कार तरुणाईला सामाजिक भान देत असल्याने जाणिवा चेतवण्याचा हा आगळा प्रयोग घडतो आहे. तरुणाई हिंसेला नकार देण्यासाठी पुढे येत आहे, हे नक्कीच आशादायी आहे. देशातील जवळजवळ सर्व प्रमुख शहरांत याचे पडसाद उमटत आहेत. आपल्या शहरात होणा-या कार्यक्रमात भाग घेऊन आपण संवाद आणि सहकार्याचे एक नवीन पर्व सुरू करण्याचे साक्षीदार बनावे!

(अधिक माहितीसाठी onebillionrising.org या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि आपला सहभाग नोंदवावा.)

raruna.burte@gmail.com