आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एका महामहोपाध्यायाची उणीव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझा जिवलग मित्र आणि दुरून नात्यात असलेला प्रा. ब्रह्मानंद देशपांडे यांचे पुणे येथे निधन झाल्याची बातमी कळाली. त्या धक्क्यातून माझ्यासारखे अनेक जण लवकर सावरणे शक्य नाही. नोकरीपुरता ब्रह्मानंद स. भु. कला-वाणिज्य महाविद्यालयात इतिहासाचा प्राध्यापक होता; परंतु त्याच्या कर्तबगारीचे पंख मात्र महाराष्‍ट्रच काय, बृहन्महाराष्‍ट्रापर्यंत विस्तारलेले होते. त्याला महामहोपाध्याय, आचार्य अशा पदव्या बहाल केल्या गेल्या; परंतु त्याचे ज्ञान या पदव्यांपेक्षा किती तरी विस्तीर्ण होते.


ब्रह्मानंद कमालीचा एकपाठी. तो कधी कधी नरहर कुरुंदकरांनाही मागे टाकायचा. साधारण शारीरिक बळ असलेले लोक बळकट मुष्टियोद्धा असतात. ब्रह्मानंद अत्यंत बलवान बुद्धियोद्धा होता. इतिहासाच्या प्राचीन संशोधनात त्याने प्रस्थापित असलेल्या मी-मी म्हणणा-या संशोधकांना पाणी पाजले होते. त्याला एखादा दगड दिसला की, त्यात प्राचीन भारताचा इतिहास दिसायचा. मी त्याला म्हणत होतो की, शिळा झालेली अहल्या ही एकच रामाला मिळाली; पण ब्रह्मानंद कुठल्याही शिळेतून अहल्यारूपी संशोधन बाहेर काढायचा.


ब्रह्मानंद हा कोटीबाज होता. अनेक बुद्धिमान व्यक्तींना कोट्या करून तो असा लोळवायचा की, समोरचा माणूस पोट धरून हसत असे. ब्रह्मानंदने विविध स्वरूपाचे लिखाण केले. त्यातले बरेचसे मौलिक स्वरूपाचे होते. एक उत्कृष्ट वक्ता म्हणून त्याला कोणताही विषय वर्ज्य नव्हता. महानुभाव पंथाचे नगराजबाबा ब्रह्मानंदला खूप मानत असत. दलितांची झोपडी असो की बुद्धिवंताचा सेमिनार हॉल, त्यांची सहानुभूती आणि शब्दांची तलवार प्रचंड तळपत असे. लोक त्याला हिंदुत्ववादी मानायचे; पण माझा अनुभव असा की, तो आजच्या राजकीय अर्थाने सेक्युलर असो किंवा नसो, तो माणसाचा प्रेमी होता. अन् प्रेमाला जात, पंथ, धर्म, भाषा कधीच आडवे आले नाहीत.


ब्रह्मानंदला का कोणास ठाऊक, माझ्याविषयी आदर होता; पण वेळप्रसंगी बौद्धिक क्षेत्रात त्याने मलाही पराभूत केले. तो म्हणायचा, बोरीकर, तुमचा बुद्धिवाद तर्कावर आधारलेला असतो; तर माझा बुद्धिवाद प्रत्यक्ष पुराव्यावर आधारित असतो. ब्रह्मानंद देशपांडे कुटुंबीयांनी सर्वांना आपलेसे केलेले होते. त्याची पत्नी जयश्री यांनी शास्त्रीय ज्ञान क्षेत्रात आंतरराष्‍ट्रीय ख्याती मिळवलेली आहे. आमचे नाते इतके जवळचे होते की, आम्ही नेहमी एकमेकांच्या फिरक्या घेत असू.


वैचारिक क्षेत्रात टोकाची भूमिका घेणारा ब्रह्मानंद माणुसकीने भारलेला होता. त्याने गरजूंना विविध रूपात मोठी मदत केली आहे; पण त्याची दानशूरता चारचौघांत चुकूनही मांडली नाही. त्याचे व्यक्तिमत्त्व मोठ्या गमतीचे रसायन होते. काही प्रसंगी अत्यंत घमेंडखोर वाटणारा ब्रह्मानंद स्वत:ला शून्यवत मानायचा.


खरा ब्रह्मानंद कोणता हा प्रश्न मी त्यालाच विचारला होता. तो म्हणाला, ‘माझ्याही व्यक्तिमत्त्वात डॉ. जेकील आहे, तसाच मि. हाइल्ड आहे’ एका अर्थाने ब्रह्मानंदने एक चिरंतन सत्यच सांगितलेले आहे. माणसाचे मूल्यमापन करताना चौरसपणे केले पाहिजे, याबद्दल नेहमी त्याचा आग्रह असायचा. त्यामुळे कित्येक प्रसंगी एखाद्या आघाडीवर आम्ही एकत्रच वावरत असू.


ब्रह्मानंदला सामान्य बुद्धीचा विद्यार्थी घडवण्याची खूप हौस होती. आर्थिकदृष्ट्या विपन्न अवस्थेत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना आपल्या मायेच्या पदराखाली त्याने झाकले होते. ब्रह्मानंदचे निधन माझ्यासारख्याच्या वैयक्तिक जीवनात पोकळी निर्माण करणारे आहे; पण त्याच्या निधनाने महाराष्‍ट्राने खरोखरच एक महामहोपाध्याय गमावला. अशा ब्रह्मानंदाची दखल कोकणापासून विदर्भापर्यंतच्या महाराष्‍ट्राने घेतली पाहिजे. ब्रह्मानंदला मी ब्रह्मू म्हणत असे, याचेही त्याला अप्रूप होते. असा हा जिवलग मित्र आम्ही गमावला. एकदा सहज बोलताना, ब्रह्मू, तुझ्या खांद्यावर आम्ही जाऊ, असे मी म्हटले होते. त्या वेळी तुमच्यासारखी व्यक्ती माझ्या खांद्यावरून जात असेल तर मीच खरा भाग्यवान, असे तो म्हणत असे; परंतु नियतीला ते मान्य नव्हते. जयश्री, त्याचा मुलगा मुन्ना (अंबरिष), सूनबाई यांच्या दु:खात कसे सहभागी व्हावे हेच मला कळत नाही. ब्रह्मानंदचा आत्मा जाईल त्या ठिकाणी संशोधन क्षेत्राला उजाळा देईल. त्याची आठवण आम्ही कधीच विसरणार नाही.


(लेखक श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत.)