आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेदमंत्राहून आम्हा वंद्य ‘वंदे मातरम्’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1762 ते 1774 या काळात झालेले ‘संन्याशाचे बंड’ इतिहासात प्रसिद्ध आहे. या संन्याशांनी 1763 मध्ये उठाव करून बंगालमधील बकरगंजच्या आसपासचा प्रदेश काबीज केला. ‘आनंदमठ’ कादंबरीला ही पार्श्वभूमी आहे. भवानंद आणि महेंद्र ही या कादंबरीमधील पाच प्रमुख पात्रांपैकी दोन पात्रे. मुसलमान सुभेदाराच्या शिपायांची पलटण एका रस्त्याने जात असते त्या वेळी त्या टोळीवर भवानंद आणि त्याची सेना धाड घालतात. यामध्ये पैसा हस्तगत करत असताना गाडीत बांधून टाकलेला महेंद्र त्याच्या दृष्टीस पडतो. या प्रकरणामुळे दोघेही निकट येऊन दोघांची मैत्री घट्ट होते. आनंद साम्राज्यात पाऊल टाकतानाच भवानंद गाऊ लागतो, ‘वंदे मातरम्... सुजलाम्... सुफलाम् मलयज शीतलाम्...’ इथे नाट्य संपते.
वंदे मातरम् ही अक्षय ठिणगी आहे. कधीही न विझणारी... ‘चेतविता तो वन्ही चेततो’ ही या राष्‍ट्रदेहातील चेतना आहे. इतिहास नीट वाचला तर तो असे सांगेल की, ‘वंदे मातरम्’ गीताने पेटवलेला आगडोंब तसाच पेटत ठेवला असता तर त्याच्या प्रेरणेतून उठाव झाला असता व भारतमातेच्या शिराचे लचके न तोडता हिंदुस्थानचे अखंड स्वराज्य पदरी पडले असते. 1907 मध्ये योगी अरविंद घोष यांनी बत्तीस वर्षांपूर्वी हे गीत लिहिले, असे म्हटले होते. ‘आमार दुर्गोत्सवात’ व ‘एक टी गीत’ या दोन लेखांत दुर्गापूजेमध्ये अष्टमीच्या रात्री बंकिमचंद्रांना भारतमातेचे दर्शन झाले असावे. रविवार कार्तिक शुद्ध नवमी संवत 1932, शके 1797 म्हणजेच 7 नोव्हेंबर 1875 या दिवशी अक्षयनवमी या दिवशी ‘वंदे मातरम्’ हे गीत लिहिले गेले.


1868 मध्ये चुचडा येथे नदीच्या तीरावर कोळ्याच्या गीतातून बकिंमचंद्रांना देशाच्या नव्या रूपाचे दर्शन घडले. ‘साधो आ छे मा मने । दुर्गाबले प्राण त्याजिब जान्हवी जीवने।’ हे कोळ्यांनी गायिलेले गीत ऐकून बकिंमचंद्रांना सूर गवसला. ‘आनंदमठ’ ज्या वेळी लिहिली जात होती त्या वेळी क्षेत्रनाथ मुखोपाध्याय हेही बंकिमचंद्रासारखे एक डेप्युटी कलेक्टर होते. दोघेही शेजारी शेजारी राहायचे. क्षेत्रबाबू स्वरज्ञ होते. त्यांनीच हे गीत टेबल हार्मोनियम हाती घेऊन ‘मल्हार’ रागात बसवले होते. काफी रागात हे गीत सार्वजनिक रीत्या म्हटले गेले. ते प्रथम लाहोर येथे दिगंत कीर्तीचे पंडित पलुस्कर यांच्या आवाजात सारंग रागातून सध्या आकाशवाणीवरून प्रसारित होते.


याचे पहिले ध्वनिमुद्रण प्रभात फिल्म कंपनीत 1938 मध्ये व्ही. शांताराम यांनी करून घेतले. मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर हे वंदे मातरम् गीताशी एवढे एकरूप झाले की, पोलिसांबरोबर मार्चिंग करण्याचेही कष्ट त्यांनी घेतले. बँड पथकात हे गीत बँडवर वाजवताच येणार नाही, असे पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितल्यावरही अतिशय परिश्रमातून शास्त्रीय प्रकारातून त्यांनी सिद्ध करून दाखवले. या सर्व खटाटोपांमुळे ‘वंदे मातरम् कृष्णराव’ अशी पदवी त्यांना बहाल करण्यात आली.
जनरल करिअप्पा यांच्या सहकार्याने सैनिक घोषात (लष्करी बँडवर) हे गीत बसवण्याची चाचणी झाली. दिल्लीहून परत आल्यानंतर मुंबईला पोलिस कमिशनर भरुचा यांच्या सहकार्याने नौदलाच्या बँडचे इन्स्ट्रक्टर व कंडक्टर सी. आर. गार्डनर यांच्याबरोबर सतत आठ दिवस श्रम घेऊन हे गीत बँडवर बसवले गेले. इंग्लंडमध्ये यांचा प्रयोग यशस्वी झाला. वंदे मातरम् गीताला गहन अर्थ आहे, हे स्वत: गार्डनरसारख्या इंग्लंडमधील प्रख्यात संगीत दिग्दर्शकानेही मान्य केले.


1905 मध्ये वाराणसीला काँग्रेसचे एकविसावे अधिवेशन भरले होते. या अधिवेशनात प्रसिद्ध वंग कवयित्री व गायिका सरलादेवी चौधुराणी या उपस्थित होत्या. चौधुराणी यांनी संपूर्ण गीत म्हटले. 1905 मध्ये वंदे मातरम्ची प्रकट घोषणा झाली. जागृत झालेल्या देशाभिमानाचे ते प्रकट रूप सा-यांना जाणवू लागले. नवजात राष्‍ट्रवादाचा तो विजय घोष बनला. वंदे मातरम्ने लोकांच्या अंत:करणात खोलवर ठसा उमटवला. शेकडो कवींनी वंदे मातरम्पासून स्फूर्तीगीते लिहून देशभर चैतन्य निर्माण केले. या गीताशिवाय सभा होईनाशी झाली. फाशीच्या दोरखंडात आपल्या माना अडकवण्यापूर्वी एकमेकांना कडकडून मिठ्या मारून वंदे मातरम्चा घोष करीत मुक्तकंठाने मातृभूमीचा जयजयकार केला. दक्षिरंजनसेन यांनी वंदे मातरम्ची नवीन स्वरलिपी बनवली. भगिनी निवेदितांनी राष्‍ट्रध्वजावर वंदे मातरम् अक्षरे समाविष्ट केली. वंदे मातरम् या बंगाली आणि इंग्रजी दैनिकांचे प्रकाशन 1906 मध्ये करण्यात आले. 20 मे 1906 मध्ये वारिसाल संमेलन मिरवणुकीवर लाठीहल्ला आणि अशा अनेक माध्यमांतून वंदे मातरम् लोकप्रिय झाले.


वंदे मातरम् हे फक्त राष्‍ट्रगीतच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाच्या स्वाधीनतेचा तो हुंकार आहे. ती स्वातंत्र्यसंग्रामाची रणगर्जना आहे. राष्‍ट्रीय सामर्थ्याचा तो बीजमंत्र आहे. हा हुंकार कधीच दबणार नाही. रणगर्जना शमणार नाही. काही गं्रथ जसे मंत्रसिद्ध असतात, तसे काही मंत्रही जन्मसिद्ध असतात. त्यांचा जन्म होत नसतो. त्यांचा उद्भव देशकाल-परिस्थितीच्या गरजेतून होत असतो. म्हणून गांधीजींच्या शब्दांत सांगायचे तर ‘हे राष्‍ट्र जोपर्यंत आहे तोपर्यंत हे गीत राहणारच.’