आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय नौदलासाठी कोची येथे बांधल्या जात असलेल्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू जहाजाचे जलावतरण झाल्यानंतर तेथे दुस-या विमानवाहू जहाजाची बांधणी करण्याची योजना आहे. मात्र दुस-या जहाजाचे काम एक वर्षानंतरही चर्चेचा टप्पा पार करू शकलेले नाही. दुस-या बाजूला चीननेही आपल्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू जहाजावर काम सुरू केले आहे. चीन भारताचा आशियातील मुख्य स्पर्धक आहे. त्यामुळे चीनच्या अशा निर्णयांचा भारताच्या सुरक्षेवर परिणाम होत आहे. म्हणूनच भारतानेही विमानवाहू जहाजांचा प्रकल्प वेगाने राबवणे आवश्यक आहे.
भारतीय नौदलासाठी स्वदेशातच दोन विमानवाहू जहाजांची बांधणी करण्याचा विचार 1989 मध्ये सर्वप्रथम मांडला गेला होता. मात्र संरक्षण क्षेत्रातील प्रत्येक प्रकल्प रेंगाळण्याची परंपरा याही बाबतीत कायम राहिली आहे. 1989 मधील विचार प्रत्यक्षात येण्यास 2016 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. येत्या 12 ऑगस्ट रोजी पहिल्या विमानवाहू जहाजाचे कोची येथे जलावतरण होणार आहे. त्यानंतर तेथे बांधल्या जाणा-या दुस-या स्वदेशी विमानवाहू जहाजाचे प्राथमिक टप्प्यातील काम गेल्या वर्षीच्या मध्यावर सुरू झाले आहे. हे जहाज कशा पद्धतीचे असावे, त्यावर कोणकोणत्या वैशिष्ट्यांचा समावेश असावा आदी गोष्टींवरच चर्चा सुरू आहेत. मात्र अजूनही त्याचे आरेखन होणे बाकी आहे. त्यामुळे ती प्रक्रिया लवकरात लवकर संपवून त्या जहाजाचे आरेखन आणि त्यानंतर त्याची प्रत्यक्ष बांधणी लगेच हाती घेणे आवश्यक आहे. सध्याची परिस्थिती पाहता त्या जहाजाची बांधणी सुरू होण्यास किमान तीन वर्षे तरी लागतील. त्यानंतरही सर्व घटक अनुकूल राहिले, तर ते जहाज नौदलात दाखल होण्यासाठी आणखी किमान सात वर्षे लागणार आहेत.
भारतीय नौदलाने हे नवे जहाज कसे असावे याचे काही ठोकताळे निश्चित केले आहेत. त्यानुसार हे जहाज अनेक बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. या जहाजावर कॅटोबार यंत्रणा (कॅटापल्ट असिस्टेड टेक ऑफ बट अरेस्टेड रिकव्हरी) बसवली जाणार आहे. जहाजावरून उड्डाण करताना विमाने कॅटापल्टची मदत घेणार आहेत. या यंत्रणेमुळे या जहाजाच्या डेकवरील धावपट्टीच्या पुढील बाजूला ऊर्ध्व कोन (स्की जंप) करण्यात येणार नाही, तर ती पूर्णपणे सपाट असणार आहे. भारतीय नौदलात अशा प्रकारचे विमानवाहू जहाज प्रथमच समाविष्ट करण्यात येणार आहे. सध्या कॅटोबार यंत्रणा पारंपरिक पद्धतीची वाफेवर आधारलेली असावी की नव्या इलेक्ट्रो-मॅग्नेटिक पद्धतीची असावी यावर चर्चा सुरू आहे. भारताच्या हितसंबंधांचे क्षेत्र हिंदी महासागराच्याही पलीकडे विस्तारत आहे. त्यामुळे भविष्यात नौदलाला शत्रूच्या हवाई हल्ल्याची पूर्वसूचना देणारी वॅक्स विमाने आणि इंधनवाहू विमानेही विमानवाहू जहाजांवरून हाताळावी लागणार आहेत. अशा विमानांसाठी अशी धावपट्टीच आवश्यक असते. हे जहाज सुमारे 65 हजार टन वजनाचे असणार आहे. भारतात बांधले जाणारे हे आजपर्यंतचे सर्वांत मोठे जहाज ठरणार आहे.
भारतात हे घडत असताना झपाट्याने जगातील दुस-या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होऊ घातलेल्या चीनला जगातील महत्त्वाच्या महासागरांमध्ये आपले नाविक अस्तित्व निर्माण करायचे आहे. चीनच्या राष्ट्रहिताचाही विस्तार हिंदी महासागर आणि पर्यायाने आफ्रिका आणि आशिया-प्रशांतमध्येही झाला आहे. त्यामुळे मुख्य भूमीपासून दूर राहून आपल्या हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी विमानवाहू जहाजाची चीनलाही नितांत आवश्यकता भासत आहे. ती क्षमता मिळवण्याचे चीनने जोरदार प्रयत्न चालवले आहेत. विमानवाहू जहाजांच्या संचालनाच्या बाबतीत अजून तरी भारताची बाजू चीनपेक्षा वरचढ आहे. चीन याबाबतीत नवखा असल्याने त्याला ती क्षमता प्राप्त करण्यासाठी कमीत कमी दहा वर्षे तरी लागतील. त्यामुळे चीन स्वदेशी विमानवाहू जहाज नियोजित कालावधीत नौदलात दाखल करण्याची शक्यता आहे. त्याउलट संरक्षण सिद्धतेच्या बाबतीत नेहमीच दिरंगाई करणा-या भारताकडून विमानवाहू जहाजांचा ताफा विकसित करण्यातही दिरंगाई होत आहे. म्हणूनच आज पन्नाशी ओलांडलेल्या आयएनएस विराट या एकमेव विमानवाहू जहाजावर भारतीय नौदलाला विसंबून राहावे लागत आहे. वर्षाखेरीस बहुचर्चित आयएनएस विक्रमादित्य येत आहे. त्यानंतर चार वर्षांनी पहिले स्वदेशी विमानवाहू जहाज सेवेत येईल. सध्या प्राथमिक टप्प्यात असलेल्या ‘विशाल’लाही नौदलात येण्यासाठी बराच वेळ आहे.
चीनच्या वाढत्या नाविक ताकदीच्या आणि त्याच्या हिंदी महासागरातील वाढत्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर भारताने दुस-या विमानवाहू जहाजाच्या कामाला गती देणे गरजेचे आहे. ‘हिंदी महासागरातील सर्वांत प्रबळ नौदल’ असा दरारा निर्माण केलेल्या भारतीय नौदलाची सामरिक शक्ती टिकवून ठेवण्यासाठी ते आवश्यक आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.