आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्नाची भपकेबाज गोष्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


‘इथे जनता दुष्काळाने तडफडतेय आणि तुम्ही कसल्या पंगती उठवताहात’ अशा आशयाचा जाहीर दम देत साहेबांनी भपकेबाज लग्नसोहळा आयोजित करणारे नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांचे कान टोचले हे बरेच बरे झाले. ‘पक्षशिस्ती’ला अनुसरून ‘आज्ञाधारक’जाधवांनी त्वरेने साहेबांची जाहीर माफी मागितली हे त्याहून बरे झाले. पण जाधवच का? आणि नेमके आत्ताच का? राजकीय भिंगातून जगाकडे बघण्याची खोड जडलेल्यांकडून हेही प्रश्न न चुकता उपस्थित झाले. तेही बरेच झाले.

मुळात, साहेब तसे खूप धोरणी.नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे एकट्या जाधवांचे कान टोचून एका दगडात अनेक पक्षी मारण्याची किमया त्यांनी याही वेळी अचूक साधली. याचे कारण जनाची आणि मनाची लाज ठेवत चला, अशा कानपिचक्या राजकीय-सांपत्तिक शक्तीचे प्रदर्शन मांडणा-या महत्त्वाकांक्षी जाधवांसाठी होत्या, तितक्याच त्या जाधवांघरच्या दुहेरी लग्नसोहळ्याला सन्माननीय उपस्थिती लावणा-या मुख्यमंत्री-उद्योगमंत्री यासह स्वपक्षातल्या-मित्रपक्षातल्या-विरोधी पक्षांतल्या (खासकरून मित्रपक्षांतल्या) पुढा-यांनाही होत्या. जाधव ढीग पंगती उठवतील, तुम्ही का सामील झालात त्या श्रीमंती थाटामाटात? असा टोकदार प्रश्नही साहेबांच्या बोलण्यातून डोकावत होता. पण सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे एरवी श्रीमंतीचे प्रच्छन्न दर्शन घडवणा-या राज्यातल्या तमाम तालेवार घराण्यांतील पुढा-यांना साधी राहणी उच्च विचारसरणीची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या साहेबांनी दिलेला तो जळजळीत उपदेश होता.

साहेबांना यात राजकीय टायमिंग साधायचे असेल, जनतेला (म्हणजे मित्रपक्षातले नेते दुष्काळाच्या बाबतीत गंभीर नाहीत असा) काही संदेशही द्यायचा असेल, वा राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार जाधवांघरच्या लग्नाचे निमित्त करून दुष्काळाच्या प्रश्नावर मित्रपक्षातल्या नेत्यांना आलेले अपयश अधोरेखित करण्याची संधी साधायची असेल. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी मुलीच्या लग्नाचा दाखलाही ( त्यानुसार साहेबांच्या मुलीच्या म्हणजेच खासदार सुप्रिया सुळेंच्या लग्नाला दोन लाख लोक आले होते. साहेबांनी लग्नाला आलेल्यांच्या हातावर केवळ पेढा ठेवला होता.) अत्यंत मननीय आहे यातही दुमत असण्याचे कारण नाही. अखेर साहेब काय खोटे बोलले ? राज्यात भीषण दुष्काळ पडला आहे.

माणसांना खाण्या-पिण्यास अन्नपाणी नाही, गुराढोरांना चरण्यास चारा नाही. सगळीकडे नुसती रखरख आणि तडफड आहे. अशी चिंताजनक परिस्थिती असताना सरकारतले एक जबाबदार मंत्री मुला-मुलीच्या लग्नात 50-50 हजारांच्या पंगती उठवतात काय आणि मंत्रिमंडळ त्यात सामील होते काय. अशा वेळी साहेब या नेत्यांच्या (खरे तर मित्रपक्षातल्या नेत्यांच्या अकार्यक्षमतेवर) बेपर्वा वृत्तीवर बोट ठेवणार नाहीत तर आणखी काय करणार ? पण मग एकटे जाधवच का ? जाधवांच्या जीवनशैलीशी स्पर्धा करणा-या पक्षबंधूंची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काय कमतरता आहे? किंबहुना एक शोधायला जावे तर असे शेकडो पुढारी साहेबांच्याच पक्षात मोठमोठ्या पदांवर विराजमान असल्याचे दिसतील. त्यांचे कान का वेळोवेळी टोचले जात नाहीत? साहेबांना का हे ठाऊक नाही, ‘साधी राहणी उच्च विचारसरणी’ या भाषणात बोलण्यापुरत्या गोष्टी झाल्या. प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा उपयोग शून्य! पण तरीही साहेब बोलले. पण पक्षातले इतरही पुढारी घरच्या लग्नकार्यावर कोट्यवधी रुपये उधळत असताना, इतरही पुढा-यांच्या गावी लग्नप्रसंगी सरबतांच्या विहिरी आणि मद्यांचे पाट वाहत असताना, सापडले कोण तर एकटे जाधव. शेवटी काय, पकडा गया वो...

साहेबांनी हे मान्य करायलाच हवे की, जुन्या पिढीतले समाजवादी-साम्यवादी सोडले तर सर्व पक्षांतल्या बहुसंख्य पुढा-यांना लग्नाच्या साध्यासुध्या नव्हे तर भव्यदिव्य गोष्टीतच रस असतो. स्वपक्षातच कशाला, स्वच्छ चारित्र्य आणि शुद्ध विचार ही विचारसरणी असलेल्या संघाच्या मुशीतून बाहेर पडलेल्या नितीन गडकरींनादेखील दोन्ही मुलांच्या लग्नप्रसंगी भपकेबाजी करण्याचा मोह आवरला नव्हता, अशा वेळी इतरांची काय कथा? आता कुणी म्हणेलही, की स्वच्छ चारित्र्य आणि शुद्ध विचार असलेल्यांनी थाटामाटात लग्नसोहळा आयोजित करू नये, असा काय नियम आहे? आणि थाटामाटात लग्न लावून दिले म्हणून एखाद्याचे स्वच्छ चारित्र्य आणि शुद्ध विचार लोप पावतात असे तरी कुठे लिहून ठेवले आहे ? असो. साहेबांनी जाधवांसारख्या तालेवार नेत्यांचे कान उपटले हे बरेच झाले, पण याच समान न्यायाने साहेबांनी आता स्वपक्षातल्याच ‘पजेरो’ आणि ‘लँड क्रुझर’ गाड्या उडवणा-या , ‘गोल्डमॅन’, ‘गोल्डविमेन’ या उपाधीला शोभणा-या तमाम ‘बॅनर’बाज पुढा-यांची जीवनविषयक शाळा घ्यावी, जेणेकरून दुष्काळात अन्नपाण्यावाचून तडफडणा-या सर्वसामान्य जनतेची त्यांना सदैव आठवण राहील. जनतेचे हालहाल पाहून त्यांचे काळीज हेलावेल. डोळ्यांत अश्रू उभे राहतील.

shekhar.d@dainikbhaskargroup.com