आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशी बनावटीची विमानवाहू नौका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय नौसेनेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिल्या जाणा-या एका अध्यायाचे आपण सर्व जण येत्या सोमवारी साक्षीदार होणार आहोत. कोची येथे 12 ऑगस्ट 2013 रोजी संपूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या I.A.C.विमानवाहू नौकेचे जलावतरण केले जाणार आहे. 40,000 टनांच्या या अजस्र विमानवाहू नौकेच्या प्राथमिक आराखड्यास व अन्य बाबींना 2007 मध्ये सुरुवात झाली होती.


नौका बनवण्याची प्रक्रिया एकूण तीन टप्प्यात पूर्ण होत असते. पहिल्या टप्प्यात नौकेचा पूर्ण सांगाडा बनवला जातो आणि इंजिन गिअरबॉक्स, अल्टरनेटर्स, जनरेटर्स यांसारखी पाण्याखाली राहणारी अवजड यंत्रे बसवली जातात
12 ऑगस्ट 2013 रोजी मैलाचा दगड ठरणारा हा प्रथम टप्पा पूर्ण होत आहे. या विमानवाहू नौकेला आता दुस-या गोदीमध्ये आणले जाईल. दुस-या टप्प्यात डेकच्या वरील भागाची निर्मिती, अत्यावश्यक गरजा आणि अन्य सुविधांची मांडणी एकत्रितपणे केली जाईल. तिस-या टप्प्यात मिसाइल, इलेक्ट्रॉनिक काउंंटरमेजर प्रणाली आणि रडार व अन्य इलेक्ट्रॉनिक यंत्रे व उपकरणे यांची रचना या नौकेवर करण्यात येईल. याप्रमाणे जवळजवळ तीन वर्षांनंतर ही विमानवाहू नौका आपल्या स्वत:च्या इंजिनाचा वापर करून पाण्यात जाईल आणि भारतीय नौसेनेच्या ताफ्यात आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी दिमाखाने सामील होईल. त्या वेळेस या नौकेचे नामकरण आयएनएस विक्रांत असे होणार आहे. सध्या हिला स्वदेशी बनावटीची विमानवाहू नौका असे म्हणण्यात येणार आहे. सन 2018 मध्ये ही स्वदेशी बनावटीची विमानवाहू नौका भारतीय नौसेनेचा एक हिस्सा बनेल. पूर्णपणे भारतीय आराखड्याने बनलेली व आपल्या स्थापत्य विशारद आणि अभियंत्याच्याबुद्धी आणि परिश्रम यांच्या गौरव पूर्ण कामगिरीने आकारास आलेली ही विमानवाहू नौका जगातील सर्वात स्वस्त विमानवाहू नौका म्हणून गणली जाईल. (अंदाजे किंमत 3000 कोटी रुपये) आयएनएस विशाल नामक दुस-या अशाच नौकेचे काम नुकतेच सुरू झाले आहे. विमानवाहू नौका बनवण्याच्या बाबतीत स्वावलंबनाची ही प्रथम पायरी आहे. स्वदेशी बनावटीची विमानवाहू नौका बनवणारा भारत हा जगातील पाचवा देश आहे.


या नौकेवर असलेल्या लढाऊ विमानांमुळे पाण्यात राहून प्रत्यक्ष युद्धाच्या परिस्थितीत आपण शत्रू सीमेजवळ जाऊ शकतो. एक प्रकारे ही नौका म्हणजे तरंगते विमानतळच असते, जिथून बॉम्ब वर्षाव करणारी मोठमोठी विमाने आणि हेलिकॉप्टर्स भरारी मारू शकतात आणि शत्रूंवर हल्ला करू शकतात. यामुळे वेळ आणि इंधन यांची बचत होते. कारण, आपण जमिनीवरून नव्हे तर पाण्यावरून उड्डाण करत असतो. आपण आणि शत्रू यामधील अंतर विमानवाहू नौकेमुळे खाडकन कमी होते. लढाईच्या साखळीतील एक मुख्य बिंदू म्हणून विमानवाहू नौका जेव्हा समुद्रात पुढे कूच करते तेव्हा तिच्या आजूबाजूला सुसज्ज अशा 6 - 8 जंगी विनाशिका, युद्ध नौका , इंधन टेंकर इत्यादी असतात. विमानवाहू नौकेवर जवळजवळ 1000 ते 1500 नौसैनिक / अधिकारी असतात. भारताच्या पहिल्या विमानवाहू नौकेचे नावसुद्धा आयएनएस विक्रांत होते. 3 नोव्हेंबर 1961 रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्या वेळी मुंबई बंदरात तीचे स्वागत केले होते. ती नौका आपण ब्रिटिश सरकारकडून खरेदी केली होती. तिचे पूर्व नाव एचएमएस हर्क्युलिस असे होते. 1971 च्या भारत पाक युद्धात बंगालच्या खाडीमध्ये आयएनएस विक्रांतने अतिशय मोलाची कामगिरी बजावली होती. त्यामुळेच 3 डिसेंबर 1971 रोजी ‘गझनी’ नामक पाक पाणबुडीला आपण जलसमाधी देऊ शकलो. 20,000 टन वजनाच्या त्या नौकेने 1987 पर्यंत आपले काम अतिशय चोखपणे बजावले आणि मुंबई गोदीमध्ये आता एका संग्रहालयाच्या रूपात ती उभी आहे.


आयएनएस विराटची उंची एखाद्या 13 मजली इमारतीएवढी आहे आणि लांबी 273 मीटर एवढी असून ही नौका सर्व प्रकारच्या सुख-सोयींनी युक्त आहे. यामध्ये विविध यंत्रे बसवलेली आहेत ज्यात स्वयंपाकघरातील ताशी 8000 पोळ्या करणारे यंत्र सामील आहे. नौकेवर उपग्रहाद्वारे अत्याधुनिक दळणवळण सेवा कार्यरत असून युद्ध किंवा अन्य विदेश भ्रमणाच्या वेळी दोन महिने पुरेल एवढी शिधासामग्री बरोबर घेऊन जाता येते. नौकेवर कवायतीनंतर साडेसहा वाजता नाष्टा आणि दुपारचे जेवण साडेअकरा वाजता देण्यात येते. नौसेना कवायतींच्या वेळी आणि विदेश भ्रमणाच्या वेळी या नौकेवर विराट टाइम्स नावाचे वृत्तपत्रसुद्धा छापण्यात येते.


भारताची दुसरी विमानवाहू नौका आयएनएस विक्रमादित्य येत्या काही महिन्यांत भारतात पोहोचेल. रशियाकडून ही नौका रु 93.4 कोटी अमेरिकन डॉलर्स इतक्या रकमेला घेण्याचा करार 20.1.2004 रोजीच झाला होता. खूप वाटाघाटीनंतर ही किंमत 2.33 अब्ज डॉलर एवढी मुक्रर करण्यात आली आहे. भारताच्या गरजेप्रमाणे यावर खूपच आधुनिकीकरण आणि बदल करण्यात आले आहेत. या नौकेची लांबी 273 मीटर एवढी आहे. रशियन बंदरामध्ये घेतलेल्या चाचण्यामध्ये या नौकेत काही त्रुटी आढळून आल्यानंतर सध्या या त्रुटी दूर करण्याचे काम चालू आहे. याच्या वाहतुकीमध्ये, किंमत ठरवण्यात आणि आधुनिकीकरण करण्यात बराच कालावधी लोटला आहे. भारताचे शूर वैमानिक या अत्याधुनिक विमानवाहू नौकेवरून मीग 21 के, सी हॅरियर, सी किंग हेलिकॉप्टर्स, पाणबुडी विरोधी के 28 हेलिकॉप्टर्स के एम 31 ए ई डब्ल्यू हेलिकॉप्टर्स, ए एल एच चिता हेलिकॉप्टर्स, शोध आणि मदत कार्य करणारी हेलिकॉप्टर्स दिमाखात उडवू शकतील.


गेल्या दोन दशकांमध्ये जगातील महासत्तांनी आपल्या विमानवाहू नौका बलामध्ये वाढ केली आहे, तर अलीकडच्या काळात संरक्षण खर्च कमी करण्याचे सूतोवाच केले आहे. एकीकडे अमेरिका आणि फ्रान्सचे आण्विक इंधनावर चालणा-या या यूएसएस निमित्ज आणि चार्ल्स दी गॉल वरून एफ 18 आणि राफेल टायफूनसारखी लढाऊ विमाने उडवत आहेत, तर दुसरीकडे ब्रिटन आपल्या युद्ध नौकांच्या साखळीत व्हीटीओएल विमाने विमानवाहू नौकावर समाविष्ट करत आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या समुद्री सीमांचा विचार करता आपल्याला कमीत कमी दोन तरी विमानवाहू नौकायुक्त युद्धनौकांची शृंखला असणे अत्यावश्यक आहे.
या समुद्राच्या लाटांवर वर्चस्व हवे, तर वर आकाश आणि खाली अथांग सागरात आपले अस्तित्व दाखवून द्यायलाच हवे.
( मराठी अनुवाद- वंदना कुलकर्णी)