आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतक-यांसाठी लढणारा समाजसेवक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे विदर्भातील एक लोकोत्तर व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे कार्यक्षेत्र मूलत: विदर्भ असले, तरी त्यांची दृष्टी मात्र राष्ट्रव्यापी नव्हे, तर वैश्विक होती. इंग्लंड येथील वास्तव्यात 1925 मध्ये भाऊसाहेबांचा आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा घनिष्ठ संबंध आला. क्रांतिकारी विचारांची देवाण-घेवाण झाली.
परदेशात शिक्षण घेत असतानाच पुढील कार्याच्या योजना त्यांच्या मनामध्ये घोळत होत्या. शिक्षणाच्या प्रसाराद्वारे ग्रामीण उत्थानाचे स्वप्न त्यांच्या नजरेसमोर तरळत होते. त्याचप्रमाणे भारतीय शेतक-यांच्या हलाखीच्या स्थितीने त्यांचे मन नेहमीच व्यथित होत असे. सावकारांच्या घशातून गरीब शेतक-यांच्या जमिनी कशा सोडवल्या जातील याचाच विचार त्यांच्या मनामध्ये सतत चाललेला असे. या विचारातूनच भाऊसाहेबांनी भारतीय शेतक-यांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी उपयोगी पडेल अशा वकिली व्यवसायाचा अंगीकार आपले उच्चशिक्षण पूर्ण करून मायदेशी आल्यानंतर केला. 1926 पासून अमरावतीला वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली. शेतक-यांच्या प्रश्नांकडे आता त्यांनी अधिक आत्मीयतेने लक्ष देणे सुरू केले. संघटितरीत्या शेतक-यांचे प्रश्न सोडवता यावेत यासाठी 1928 मध्ये ‘मध्य प्रांत आणि व-हाड शेतकरी संघ’ स्थापन केला. याच संघाच्या वतीने 1930 मध्ये डिस्ट्रिक्ट कौन्सिलमध्ये प्रवेश केला आणि 1930 मध्ये कौन्सिलचे अध्यक्ष झाले. भारतीय शेतक-यांच्या अडचणी आणि अनेक आर्थिक, सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी अविश्रांत परिश्रम घेतले. श्रीमद्भगवदगीतेची कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषुकदाचन, ही शिकवण त्यांनी आपल्या अंगी बाणवली. शेतक-यांच्या उन्नतीसाठी त्यांनी आजन्म लढा दिला.
भारत कृषक समाज : भारतीय शेतकरी जागा व्हावा. तो एका व्यासपीठावर एकत्र येऊन अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील व्हावा, यासाठी डॉ. भाऊसाहेबांनी एक समर्पक पाऊल उचलले आणि 1954 मध्ये भारत कृषक समाज, ही राष्ट्रीय संघटना स्थापन केली. भारत कृषक समाजाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले. त्यांनीच अखिल भारतीय युवा शेतकरी संघ स्थापन केला. भारतातील औद्योगिक कामगारांच्या प्रश्नांकडे जसे लक्ष आतापर्यंत देण्यात आले होते, तसे लक्ष शेतक-यांच्या प्रश्नाकडे दिले जात नव्हते. किंबहुना, या कृषिप्रधान देशातील 70 टक्के लोकांच्या प्रश्नांची उपेक्षाच होत होती. शेतक-यांच्या प्रश्नांकडे औद्योगिक कामगारांच्या प्रश्नांप्रमाणेच लक्ष दिले गेले पाहिजे याकरिता या विदर्भपुत्राने आवाज उठवला. औद्योगिक कामगारांना जसे संरक्षण दिले जाते, तसेच संरक्षण शेतक-यांनाही दिले गेले पाहिजे, असे मत त्यांनी मांडले आणि अशी तरतूद भारतीय राज्य घटनेतच केली जावी, असा आग्रह त्यांनी धरला.
घटना समितीचे सदस्य या नात्याने त्यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अनेक शैक्षणिक सवलती आणि कल्याणकारी योजना सादर केल्या आणि त्यांचा राज्य घटनेत समावेश करण्यात यावा, असा आग्रह धरला. त्यांचे हे मत क्रांतिकारी समजले गेले; पण त्याचा समावेश होऊ शकला नाही. ग्रामीण जनतेच्या कल्याणाच्या सूचना घटना समितीने स्वीकारल्या असत्या, तर भारतीय शेती आणि ग्रामीण जीवनाचे चित्रच आता बदलून गेलेलेदिसले असते.
शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे, तरुण-तरुणींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, त्यांच्यासाठी शाळा, प्रयोगशाळा आणि ग्रंथालयांची व्यवस्था करणे, गुणवत्ता विकासाकडे लक्ष देणे, या सर्व प्रक्रियांमधून समाजाचा स्वाभिमान वाढवला. भाऊसाहेबांनी हे कार्य आजीव कार्य मानले होते. डॉ. भाऊसाहेबांनी 1931 मध्ये अमरावतीला स्थापन केलेली श्री शिवाजी शिक्षण संस्था हे त्यांचे चिरंतन स्मारकच आहे. डॉ. भाऊसाहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या संस्थेने ग्रामीण शिक्षण, उच्च शिक्षण, कृषी शिक्षणाचे कार्य प्रगतिपथावर नेले. पारंपरिक शाळा आणि महाविद्यालय स्थापन करण्यासोबतच ग्रामीण तरुणांच्या गरजा पुरवतील अशा शिक्षण संस्था काढल्या गेल्या पाहिजेत, अशी त्यांना तीव्रतेने जाणीव झाली. शिवाजी शिक्षण संस्था आणि तिच्या अनेक शाखा पंजाबरावांच्या कार्याचे मूर्तिमंत प्रतीकच होत. त्या वेळच्या ब्रिटिश राजवटीतील मध्य प्रदेश विधानसभेवर 1930 मध्ये ते निवडून आले आणि त्यांच्याकडे शिक्षण, लोककर्म, कृषी आणि सहकार ही खाती सोपवण्यात आली. शेतक-यांचे भले झाल्याशिवाय या देशात सुख-समृद्धी येऊ शकणार नाही अशी त्यांची धारणा होती. त्यासाठी लोककल्याणाच्या अनेक योजना त्यांनी कार्यान्वित केल्या होत्या. स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री म्हणून त्यांनी ठसा उमटवला. धान्योत्पादन व त्यासाठी कृषी विकास त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. हा देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावा, यासाठी त्यांनी सदोदित प्रयत्न केले. त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन.
(लेखक डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील माजी ग्रंथपाल आहेत.)