आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्याच्या शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामान्य शेतकरी घराण्यात जन्मलेल्या विनायकराव पाटील यांच्या घराण्यात शैक्षणिक वातावरण होते. त्यांचे आजोबा पुंडलिक जाधव हे शिक्षणाचे महत्त्व ओळखून होते. त्यांचे चुलते जनार्दनराव जाधव हे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात आदर्श शिक्षक म्हणून प्रसिद्ध होते. विनायकराव यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात सरस्वती भुवन संस्थेत शिक्षकाच्या माध्यमातूनच केली. उपेक्षितांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक स्वतंत्र शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून त्यांनी मराठवाड्याच्या शैक्षणिक विकासाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे कार्य सिद्धीस गेल्याचे चित्र आज दिसत आहे.
मराठवाड्यातील ग्रामीण विभागात आणि बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार व्हावा हीच या संस्थेच्या स्थापनेमागची प्रेरणा होती. सामान्यांच्या झोपडीपर्यंत ज्ञानाची गंगा पोहोचली पाहिजे, अशी तळमळ होती. ही जबाबदारी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने स्वीकारली आहे. लोकजीवनातल्या उणिवा भरून काढणे, लोकजीवन समृद्ध जीवन, दुर्दम्य उत्साहाने कार्य करण्याचे मंडळाचे धोरण आहे. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचा विस्तार मराठवाडाभर केलेला आहे. संयुक्त महाराष्टÑाचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते 22 जून 1960 रोजी औरंगाबाद शहरात देवगिरी महाविद्यालय आणि बीडला बलभीम महाविद्यालयाची सुरुवात करण्यात आली. 1961 मध्ये परभणी येथे शिवाजी महाविद्यालय स्थापन करण्यात आले. जून 1968 मध्ये विनायकराव पाटील यांच्या प्रेरणेने वैजापूर येथे महाविद्यालय सुरू करण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर, बीड जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव, किल्लेधारूर, अंबाजोगाई येथे मंडळाने महाविद्यालयाची स्थापना केली. शालेय स्तरावरील शिक्षण प्रसारासाठी मराठवाड्यात 53 हायस्कूल्स सुरुवात करण्यात आली आहेत.
मराठवाड्यातील ग्रामीण भागाचे शैक्षणिक चित्र बदललेले दिसत आहे. त्यात मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचा मोलाचा वाटा आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचा शैक्षणिक वारसा मराठवाड्यात चालवणारे विनायकराव पाटील यांच्या ध्येय स्वप्नांना मूर्तरूप देण्याचा मंडळ सातत्याने प्रयत्न करत आहे. पश्चिम महाराष्टÑात कर्मवीर भाऊराव पाटील, विदर्भात पंजाबराव देशमुख यांनी ग्रामीण विभागाकरिता अहोरात्र कष्ट घेऊन हजारो बुद्धिमान तरुण तयार केले.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे एक वैशिष्ट्य म्हणजे संस्थेच्या सर्व शाळा-महाविद्यालयांतून अध्ययन करणारा विद्यार्थी प्रामुख्याने ग्रामीण भागातला आहे. मंडळाच्या विद्यार्थी संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने केवळ शिक्षण संस्थांच्या विस्तारावरच भर दिलेला नसून शालेय व महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांची उज्ज्वल परंपरा निर्माण केली आहे. शालेय तसेच विद्यापीठीय परीक्षांत विशेष प्रावीण्य घेतलेले विद्यार्थी शेती, व्यापार, उद्योग, समाजसेवा, सहकार, राजकारण, अर्थकारण, शिक्षण अशा विविध क्षेत्रात मोठ्या संख्येने चमकदार कामगिरी करत आहेत. शिक्षणाच्या विस्ताराबरोबरच गुणवत्तेतही मोठ्या प्रमाणावर फरक जाणवतो आहे. ग्रामीण परिसराशी आणि बहुजन समाजाशी बांधिलकी मानून ज्ञानदान करणारा शिक्षक, कर्मचारी आणि प्राध्यापकवर्ग हा मंडळाचा अभिमानबिंदू आहे. शिक्षण क्षेत्राशिवाय शिक्षण पूरक सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने मंडळाची प्रतिष्ठा आणि नावलौकिक वाढवण्यात मोठा हातभार लावलेला आहे. विनायकरावांनी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे लावलेले इवलेसे रोपटे आज विशाल वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. संस्थेच्या वतीने आज 63 हायस्कूल्स, 2 कन्या प्रशाला, 12 कनिष्ठ महाविद्यालये, 2 विधी महाविद्यालये चालवली जातात. मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांतील ग्रामीण भागातील कानाकोप-यात मंडळाच्या कार्याचा विस्तार झालेला आहे. त्याचे बरेचसे श्रेय विनायकराव पाटील यांच्या कार्यकर्तृत्वास द्यावे लागेल. मराठवाड्याच्या शिक्षण प्रसाराचे प्रणेते म्हणूनच इतिहासात त्यांच्या कार्याची गौरवाने नोंद घेतली जाणार आहे. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळास शैक्षणिक चळवळीचे केंद्रस्थान म्हणून मान्यता मिळवून देण्यात विनायकराव पाटील यांचा महत्त्वाचा वाटा आहे. हे प्रांजळपणे नमूद के ले पाहिजे. त्यांचे कार्य बहरात आलेले असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. 28 डिसेंबर 1968 रोजी काळाने त्यांच्यावर झडप घातली. विनायकराव पाटील यांच्या रूपाने महाराष्टÑाचे नेतृत्व करण्याची मराठवाड्याची पहिली संधी नियतीने हुकवली.