आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैठणीला सोन्याचे दिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठणीला जागतिक वारशाची मान्यता मिळाल्याने या व्यवसायातील विणकरांना शासन स्तरावरील योजनांचा आता लाभ मिळू शकेल. तसेच पैठणी उद्योगास चालना मिळेल.
सातवाहनकाळात सातासमुद्रापार गेलेल्या पैठणीला आता जागतिक वारसा आणि सांस्कृतिक संघटना (युनेस्को) ने जागतिक वारशाचा दर्जा दिला. ही ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल. पेशवाईच्या काळापासून गाजलेल्या या राजवस्त्राला आता पुन्हा वैभव मिळणार असल्याची आनंदवार्ता कानी पडल्यानंतर पैठणी निर्मात्यांत साहजिकच उत्साह पसरला आहे. पैठणी साडी आपल्या संग्रहात असावी, असे प्रत्येक महिलेचे स्वप्न असते. पैठणी रेशमी धाग्यापासून आणि त्यावर कलाकुसर जरीपासून तयार केली जाते. पैठणीत सोन्याच्या तारेचाही वापर केला जातो. पेशव्यांच्या लग्नसमारंभात 300 हून अधिक पैठण्या पैठणहून गेल्याचा दाखला आहे. एकेकाळी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणला घराघरातून पैठणी निर्मिती होत असे. येथील साळी समाज या व्यवसायात होता. एक पैठणी बनवण्यास सहा महिने ते वर्षाहून अधिक कालावधी लागत असे. पैठणी तयार करण्यास लागणार्‍या मेहनतीमुळेच साडीची किंमत जास्त असते. ‘बोटभर पैठणी विणून पोटभर खाण्याची सोय होते’ अशी म्हण साळी समाजात पूर्वी प्रचलित होती. पण आता पैठणीला राजाश्रय नसल्याने विणकर साळी समाज देशोधडीला लागला. आजमितीस या समाजातील तरुण पैठणी विणण्याचा मूळ व्यवसाय सोडून नोकरीपेशात गुंतला गेला. पैठणमध्ये थोड्याफार प्रमाणात पैठणीचे उत्पादन होते. काही कुटुंबे आजही या व्यवसायात टिकून आहेत. आता या व्यवसायात मुस्लिम समाजासह अन्य समाजातील कारागीर अर्थार्जनासाठी स्थिरावले आहेत. आता नाशिक जिल्ह्यातील येवला येथे पैठणी निर्मितीचे केंद्र निर्माण झाले आहे. येवल्यात कोट्यवधींची उलाढाल या व्यवसायात होते. केवळ आपल्या देशाच्या विविध भागांतून नव्हे तर परदेशातूनही येवल्याच्या पैठणीला मोठ्या प्रमाणात वर्षभर मागणी असते. पैठणीला जागतिक वारशांची मान्यता मिळाल्याने या व्यवसायातील विणकरांना शासनस्तरावरील योजनांचा आता लाभ मिळू शकेल. या व्यवसायातील कारागिरांना उत्तम प्रशिक्षण मिळावे, त्यांना योग्य तो मोबदला मिळावा, अशी अपेक्षा आहे. पैठणी निर्मितीतील सर्व अडचणी दूर व्हाव्यात. पैठणीला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासनाने योग्य प्रयत्न करावेत. पैठणला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे आणि पैठणीचे जागतिक केंद्र निर्माण व्हावे, हीच अपेक्षा.