आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकचे आव्हान आणि सरकारी काथ्याकूट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत-पाक सीमेवर मारले गेलेल्या आपल्या पाच जवानांवरून केंद्र सरकारची इतकी नाचक्की झालेली आहे की शासनाचे नेतृत्व कोणाकडे आहे की नाही, असा प्रश्न जनतेला पडलेला आहे. या जहाजाला कप्तान आहे की नाही? संरक्षण किंवा परराष्ट्र खात्याच्या धोरणाबाबत अनभिज्ञ आहेत म्हणून संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांनी इतक्या कोलांटउड्या नक्कीच मारलेल्या नाहीत. संसद आणि संपूर्ण देश सरकारवर तुटून पडल्यानेच त्यांनी अशा कोलांटउड्या मारल्या. शासनाचा प्रमुख प्रत्यक्षात एखादा कसलेला नेता असता तर परिस्थिती इतकी बिघडली नसती, परंतु हे शासन सरकारी बाबूंचे बनले आहे. मोठे नेते मोठे बाबू बनले आहेत तर नोकरशहा छोटे बाबू! हे या देशाचे दुर्दैव आहे. थोडीही फटकार लागायला उशीर की ते लगेच शेपटी घालून बसतात.

पाकिस्तान प्रकरणाच्या बाबतीत असेच झाले आहे. अँटनी यांनी पहिल्यादिवशी जे सांगितले तेच खरे होते. कारण, 21 बिहार रेजिमेंटने पूंछच्या पोलिस ठाण्यात 6 ऑगस्टला जी माहिती नोंदवली आहे (एफआयआर क्रमांक 113/2013) त्यात ‘दहशतवाद्यांनी आपल्या सीमेत घुसून जवानांना मारले आहे.’ असे स्पष्ट लिहिले आहे. संरक्षणमंत्री अँटनी यांनी हीच माहिती जशीच्या तशी संसदेसमोर ठेवली, परंतु एकदिवस आधी टीव्ही चॅनेलवाल्यांनी इतका गोंधळ घातला आहे, याचा बहुधा त्यांना अंदाजच आला नाही. नवाझ शरीफमियाँ बोलतात एक आणि करतात दुसरेच; लष्कर त्यांच्या हाताबाहेर गेले आहे. आता पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे. पाकिस्तानची दादागिरीच झाली, असे खासदारांनाही वाटले. त्यामुळेच उभय पंतप्रधानांची सप्टेंबरमध्ये होणारी बैठक रद्द करा आणि पाकिस्तानच्या काही सैनिकांना ठार करून भारतीय जवानांच्या हत्येचा बदला घ्यायला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. या दरम्यान दिल्लीत जिकडे-तिकडे पाकिस्तानच्या विरोधात निदर्शने झाली. असे होणेही स्वाभाविकच होते. पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणीही रास्त होती. जर खरोखरच पाकिस्तानी सैन्यांची ही आगळीक असेल तर त्यांना धडा शिकवणे आपल्या शासनाचे कर्तव्यच होते, पण शासनाची दातखीळ बसलेली होती. सप्टेंबरमध्ये बैठक होणार किंवा नाही, हेही त्यांना सांगता येईना. यासाठी आपल्या सेनाप्रमुखांना सीमेवर पाठवण्यात आले आणि संरक्षणमंत्र्यांनी त्यांच्याशी सल्लामसलत करून शीर्षासनाचा प्रयोग केला.

पाच जवानांची हत्या पाकिस्तानी सैनिकांच्या एका विशेष तुकडीने केल्याचा खुलासा संरक्षण मंत्र्यांनी आता केला आहे. त्यांच्या या निवेदनावर भाजप संतुष्ट झाले आहे. भाजप विरोधी पक्ष असल्याने सरकारला कात्री पकडणे त्यांचे कामच आहे, परंतु शाब्दिक युद्धांची खुमखुमी मोठ्या युद्धांचे स्वरूप धारण करू शकते याची जाणीव त्यांनाही असायला हवी. पाच जवानांच्या हत्येचे स्थानिक प्रकरण युद्धांच्या ठिणगीचे कारण बनू शकते.

पहिले महायुद्ध शेवटी कशामुळे सुरू झाले? तर 1914 मध्ये सरोयेवामध्ये आस्ट्रो-हंगेरियन राजकुमार फ्रांज फर्डिनंडच्या हत्येनंतर संपूर्ण युरोपला युद्धाच्या खाईत लोटले होते. भारत-पाक ही दोन्ही शेजारी राष्ट्रे असून अणुशक्तीने सुसज्ज आहेत. जेव्हा अँटनी यांनीच सांगितले की, पाकिस्तानी फौजेचाच हा दोष आहे तेव्हा भाजप किंवा सपासारख्या विरोधी पक्षांचे म्हणणे काय असेल? एका मुंडक्याच्या बदल्यात शंभर मुंडके कापून आणा किंवा पाचच्या बदल्यात पन्नासजणांना तरी ठार मारा, अशी मागणी करणे अयोग्य आहे.कारण पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी या घटनेबाबत खेद व्यक्त केला असून नियंत्रण रेषेच्या जवळपासच्या सैन्यांत शिस्त आणण्याची शिफारसही त्यांनी केली आहे. ज्यायोगे अशा घटनांना पायबंद घालता जाईल. आपल्या सैनिकांना कोणी मारले याची सरकारलाच धड कल्पना नाही, आणि आपण अतिरेकी पावले उचलण्याची मागणी करत आहोत.

सैन्यात आमनेसामने लढण्याचे प्रशिक्षण देण्यात येते, परंतु सीमेपलीकडून आलेले दहशतवादी किंवा दहशतवाद्यांच्या वेशात आलेले पाकिस्तानी सैनिक अचानक हल्ला करतात. अशावेळी आपल्या सैनिकांचे मारले जाणे, ही कोणत्याही सरकारसाठी लाजिरवाणी बाब आहे. दुसरी एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की, दहशतवादांमुळे आपण जितके त्रस्त आहोत, त्यापेक्षा कितीतरी पटीने पाकिस्तान त्रस्त आहे. नवाझ शरीफांच्या कार्यकाळात पाकिस्तानात कोठे ना कोठे दहशतवाद्यांनी हल्ला केलाच नाही, असा एकही दिवस जात नाही. अशा स्थितीत शरीफ सरकार आणि भारत सरकारने मिळून दहशतवाद्यांशी मुकाबला केला पाहिजे की, आपसांतच लढून मरायचे आहे? शत्रूचा शत्रू तो आपला मित्र ही चाणक्यनीती आपण विसरलो का? विसरलो नसूही; पण ती अमलात आणण्यासाठी इंदिरा गांधी किं वा अटलबिहारी बाजपेयीसारखा नेता तर हवा? शासनच मोठे बाबू आणि छोटे बाबू मिळून चालवत आहेत आणि त्यांना विरोधीपक्षाचे नेते कठपुतळ्यासारखे नाचवत आहेत. देश हतप्रभ होऊन सगळा तमाशा पाहतो आहे.

पाकिस्तानची भारताशी युद्ध करण्यासारखी परिस्थिती नाही, हे आपणास विसरून चालणार नाही.ओसामा बिन लादेनची हत्या, अकबर बुग्तीचा मृत्यू, लालमशीद प्रकरण, कराची नौसैनिक अड्ड्यावर अमेरिकेचा कब्जा आणि ड्रोन हल्ल्यामुळे पाकसैन्य तेथील जनतेच्या नजरेतून उतरलेले आहे. याशिवाय पुढच्याच महिन्यात जनरल कियानीच्या जागी नवीन सेनाप्रमुख येत आहे. पाकिस्तानची आर्थिकस्थिती अत्यंत नाजूक बनली आहे. याउपरही त्यांच्या सैन्याने अशी स्फोटक कारवाई केली तर हे आव्हान कसे संपुष्टात आणावे, हे त्या सरकारच्या हाताबाहेर जाईल, इतकी विचित्र परिस्थिती त्या शासनाची आहे. जर भारतात अर्धसत्य बातम्यांवरून युद्धांचा ज्वर भडकत असेल तर नवाझ शरीफ यांचे भारताबाबतचे धोरण अयशस्वी ठरेल. नवाझ शरीफ सरकारचे हात बळकट करायचे की, दहशतवाद्यांचे; आपले परराष्ट्र धोरण तयार करणार्‍यानी ठरवले पाहिजे.

मात्र, या सार्‍याचा अर्थ भारतीय जवानांच्या हत्येच्या बाबतीत आपण गप्प बसावे, असा मुळीच होत नाही. आपण बोलले तर पाहिजे, ठासूनही बोलले पाहिजे, पण त्यांचेही म्हणणे ऐकून घ्यावे, म्हणजे त्यांच्याशीही बोलले पाहिजे आणि सगळ्या बाबींचा उलगडा करून घ्यावा. जेव्हा अशा स्थानिक बाबतीत बोलाचाली बंद करणे योग्य नाही तर सप्टेंबरमध्ये होणार्‍या दोन देशातील पंतप्रधान पातळीवरील महत्त्वाच्या चर्चेलाही विराम देण्याची गरज आहे.
(लेखक भारतीय परराष्ट्र धोरणविषयक समितीचे अध्यक्ष आहेत)