आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरीची वारी : एक आनंद सोहळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आळंदी-पंढरीची वारी म्हणजे वारक-यांची दिवाळीच असते. आळंदीहून माउलींच्या पालखीबरोबर 150-200 दिंड्या असतात. देहमधून तुकाराम महाराजांची पालखी निघते. अनेक गावांतून पांडुरंगाच्या दर्शनाला दिंड्या अतिशय शिस्तीत निघालेल्या असतात. माउलींची पालखी निघणार म्हटले की पाऊस पडो अथवा न पडो, पेरण्या झाल्या तर उत्तमच, नाहीतर शेताची पेरणी व्यवसायातील कामे सोडून लोक विठुमाउलीच्या दर्शनाला पळत सुटतात. श्रीमंत अन्नदाते दिंडीतील वारक-यांना अन्नदान करतात. काही लोक पंढरपूरपर्यंत वारक-यांची पाण्याच्या टँकरची विनामूल्य सेवा देतात. श्री ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, कंधारचे साधू महाराज आणि इतर संतांनी पंढरीची वारी सुरू करून आपल्यावर उपकारच केले आहेत. कारण आळंदी-पंढरीची वारी हा आनंद सोहळा आहे. संतांनी वारीचे जे सुख अनुभवले तेच आपल्याला दिले.


पंढरीच्या वारीची परंपरा आमच्या साधू महाराज संस्थानात साधू महाराजांनी सुरू केली. आमचे वडील शंकर महाराज खंदारकर आणि मोठे काका उमरखेडचे मठाधिपती सीताराम महाराज यांनी अखंड 35 वर्षे कंधार ते पंढरपूर पायी वारी केली. साधू महाराजांचे निवासस्थान कंधार येथे तर समाधी उमरखेडला आहे. त्यामुळे दिंडी कंधारहून सुरू होते. आता आमचे भाऊ यशवंत महाराज आणि एकनाथ महाराज श्री ज्ञानेश्वर दिंडीचा वारसा चालवतात. पंढरपूरला माझी बहीण विठाबाई वांजरखेडकर हिच्याकडे सर्व व्यवस्था असते. एखादे कार्य सुरू करणे सोपे असते, पण त्यात सातत्य ठेवणे महाकठीण काम असते. मातीच्या ढेकळावर सतरंजी टाकून झोपावे लागायचे. जेवणाची शिदोरी बरोबर असूनही नुसत्या कण्या, पिठलं-भाकरी खाऊन मैलोन्मैल पायी चालावे लागत असे, असे माझी आई सांगते.

कंधारच्या काही श्रीमंत मंडळींनी दिंडीसाठी निधी जमा केला. त्या पैशातून ट्रकचे भाडे देणे, आचा-याचा खर्च आणि इतर खर्चासाठी निधीचा वापर होत गेला. मला आठवते, एका वर्षी ठरवलेला ट्रक दिंडी निघेपर्यंत आलाच नाही. त्या वेळी फोनची सोय नव्हती. शंकर महाराजांनी आपले सामान नव्या वाड्यात ठेवले. दिंडीतील सर्व लोकांचे सामानही तेथेच ठेवले आणि ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम’ असा हरिनामाचा गजर करत दिंडी पंढरपूरचा दिशेने मार्गस्थ झाली. दिंडीचा पुढचा मुक्काम लोह्याला होता. तेथे पोहोचल्यावर ट्रक मागाहून आला. पांडुरंग सगळ्यांना सांभाळून नेतो, अशी सर्व वारक-यांची श्रद्धा असते. विठुनामाचा गजर करत वारक-यांचे मार्गक्रमण होत असते.


पंढरीच्या वारीचा आनंद सोहळा अवर्णनीय असतो. तिथे संसाराचा विसर पडतो. दु:खाचा लवलेशही नसतो. सगळीकडे आनंदीआनंद असतो. संसारात आल्यानंतर विठ्ठलभक्ती करणे, नामस्मरण करणे यातच खरे सुख आहे. शिवाय पाप जळून जाते, असा दुहेरी लाभ आहे. त्यासाठी वनात जाऊन तपस्या करण्याची गरज नाही. एवढे सोपे असून आपण नामस्मरण करत नाही. काम करताना, जाता-येता, उठता-बसता, जेवताना, पाणी पिताना, प्रवासात, अगदी झोपेपर्यंत नामस्मरण करावे. पाप-पुण्य समान होते. आपले अनेक जन्मांतील पाप घालवण्यासाठी नामस्मरणाची गरज आहे. श्रीमंताला वाटते, माझ्याकडे आयुष्यभर पुरेल इतका पैसा आहे. मी सुखाने जगेन. अगदी शंभरात एखादाच सुखाने जगतो. इतरांना सुख-दु:खमिश्रित आयुष्य आहे. नामस्मरणाने दु:ख सहन करण्याची शक्ती येते, हा संतांचा अनुभव आहे. आपण संसार किती अट्टहासाने करतो. स्वयंपाकघर नीटनेटके ठेवतो. घरातील सर्व वस्तू व्यवस्थित ठेवल्याच पाहिजेत. रोजचे जेवण रुचकर झालेच पाहिजे. त्यासाठी मसाले तयार करून ठेवतो. लग्नकार्यात जेवणाचे मेनू, पाहुण्यांची सरबराई ठेवतो. कोठेही कमतरता येणार नाही, याची काळजी घेतो. पण नामस्मरण किती वेळ घेतो? गाथा, ज्ञानेश्वरी किती वेळ वाचतो? गाथा वाचूनच विठ्ठलभक्तीचे संस्कार होतात. ज्ञानेश्वरी वाचून सात्त्विक गुणांची वाढ होते. ज्ञानेश्वरीत संपूर्ण ब्रह्मांडाचे ज्ञान आहे. परमार्थाच्या वाटेवर वाटाड्या विठ्ठलच आहे.


पंढरपूरच्या वारीचा प्रवास 15 दिवसांचा असतो. पुढे द्वादशी किंवा पौर्णिमेपर्यंत लोक राहतात. एवढ्या 20-22 दिवसांत भजन, कीर्तन, प्रवचन श्रवणाचा लाभ वारक-यांना मिळतो. भजनाच्या चाली कळायला लागतात. म्हणून वारीसाठी तुकाराम महाराज पुन्हा-पुन्हा जन्म मागतात. भिकारी झालो तरी पंढरीचा वारकरी होईन. म्हणून घरच्या अडचणी दूर करून जे पंढरीला जातात, त्यांची वारी सफल होते. नुसत्या देहाने पंढरीला जाऊन उपयोग नाही. मन घराकडे लागते म्हणून त्यालाही वारीला घेऊन जावे. पंढरपूर भक्तांचे माहेरघर आहे. तिथे आपले मायबाप वाट पाहत उभे आहेत. मग प्रेमाला आणि सुखाला काय कमी आहे!