आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ANALYSIS: भगवानगडावरील वादाची ही आहेत कारणे, वाचा CM ची भूमिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्र्यांनी गडावरची सभा टाळावी, असा सल्ला पंकजा यांना देण्याचा प्रयत्न केला होता, अशीही माहिती समोर येते आहे. तेव्हापासून पंकजा यांनी भगवानगडावरच सभा घ्यायची असा चंग बांधला आहे आणि त्यामुळेच फडणवीस आणि महंतांमधलाही संवाद वाढला आहे, असे म्हणतात. त्यामुळे कोणी काहीही समजो आणि काहीही म्हणो, आता ही लढाई फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातील प्रतिष्ठेची लढाई झाली आहे, असे म्हणायला हरकत नाही.

साधारणपणे १९-२० वर्षांपासून गोपीनाथ मुंडे भगवानगडावर दसऱ्याच्या दिवशी सभा घेत होते. त्यांच्या निधनानंतर गेल्या वर्षी पंकजा यांनी ही सभा घेतली. पण यंदा गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी अशी सभा गडावर घ्यायला विरोध चालवला आहे. खरे तर नामदेवशास्त्री यांना या गादीवर बसवण्याचे श्रेय गोपीनाथ मुंडे यांच्याचकडे जाते. त्या वेळी महंतांना गड सोपवण्याला बऱ्यापैकी विरोध झाला होता; पण गोपीनाथरावांनी पुढाकार घेऊन नामदेवशास्त्री यांचे नाव लावून धरले आणि त्यांना गडाची सत्ता मिळाली. त्यांची नियुक्ती मुंडेंनी करवून घेण्याच्या दहा वर्षे आधीपासून (सन २००४ ला नियुक्ती) गडावर गोपीनाथरावांची सभा होत होती.
महंतांनीही पुढची दहा वर्षे त्या सभांना कधी विरोध केला नाही. आजही गोपीनाथराव असते तर सभा न घेण्याचा विषयच आला नसता. मग पंकजा यांनाच विरोध कशासाठी, असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्यावर महंतांचे उत्तर ठरलेले आहे. ते म्हणतात की डिसेंबर २०१५ मध्ये गोपीनाथगडाचे उद््घाटन झाले त्या वेळी पंकजा यांनीच आता राजकारण गोपीनाथगडावर आणि अध्यात्म भगवानगडावर, असे जाहीर केले होते आणि त्यामुळे त्यांनी तो शब्द पाळायला हवा. पंकजा यांनी दर्शनासाठी गडावर अवश्य यावे; पण सभा घेऊ नये, हा त्यांचा आग्रह आहे. तो आग्रह मोडून काढत सभा घ्यायचीच, असे पंकजा यांनी ठरवले तर परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि निर्माण होणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीला तुम्ही जबाबदार राहाल, अशा आशयाचे पत्र महंतांनी जिल्हाधिकाऱ्यांना देऊन ठेवले आहे. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी गडावर पोलिस आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात करण्याची तयारी चालली आहे.

पंकजा यांनीच यापुढे राजकारण गोपीनाथगडावर आणि अध्यात्म भगवानगडावर असे जाहीर केले असेल तर मग पुन्हा भगवानगडावर सभा घेण्याचा त्यांचा आग्रह कशासाठी, याचेही उत्तर सर्वसामान्य भगवानबाबा भक्तांना मिळत नाही. स्वत: पंकजाही या विषयावर बोलायला तयार नाहीत. पण काही बाबी या उघड गुपित असतात, तशी ही बाबदेखील आहे. पंकजा यांच्या आग्रहामागे वंजारी समाजाची भगवानबाबांवर असलेली श्रद्धा आहे. पंकजा यादेखील वंजारी समाजाच्या आहेत आणि श्रद्धेपोटी त्या भगवानगड सोडू इच्छीत नाहीत, असा याचा अर्थ नाही. दसऱ्यानंतर बहुतांश साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होतो. ऊसतोड मजूर जे बहुतांशी वंजारी समाजातले आहेत, दसऱ्यानंतर ऊसतोडणीला जातात आणि जाण्यापूर्वी भगवानबाबांचा आशीर्वाद मागण्यासाठी दसऱ्याला गडावर येतात.
वंजारी समाजाच्या दृष्टीने गोपीनाथ मुंडेदेखील देवासमानच होते हे खरे असले तरी त्यांच्यावर या समाजाने प्रेम केले आणि श्रद्धा जपली ती भगवानबाबांच्या पायाशी. त्यामुळेच दसऱ्याला वंजारी समाज भगवानगड सोडून गोपीनाथगडावर येईल, याची शाश्वती पंकजा यांना वाटत नसावी. शिवाय, पंकजा म्हणजे काही गोपीनाथ मुंडे नाहीत ज्यांच्या नावामुळे समाज सर्व काही सोडून धावत येईल, याचा अंदाजही पंकजा यांना गोपीनाथगडावर केलेल्या घोषणेनंतर आला असावा. गोपीनाथगडावर सभा घेतली आणि अपेक्षित गर्दी झाली नाही तर राज्याच्या राजकारणात गोपीनाथ मुंडेंनंतर वंजारी आणि ओबीसी समाजाची नेता पंकजा असल्याचे जे चित्र निर्माण करायचे आहे ते होऊ शकणार नाही, असेही पंकजा यांना वाटत असावे. त्यामुळेच सभा घ्यायची ती भगवानगडावरच, असा त्यांचा आग्रह दिसतो आहे.
पुढील स्लाईडवर वाचा... भगवानगडावरील सभेमागचे राजकारण.... कोणकोणते पक्ष यात गुंतले आहेत.... वाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका.....
बातम्या आणखी आहेत...