आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parag Purohit About Fight Ship, Editorial Article Divya Marathi

स्वदेशी युद्धनौकांची मुहूर्तमेढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय नौदलात काही दिवसांपूर्वी आयएनएस कोलकाता आणि आयएनएस कामोर्टा या दोन अत्याधुनिक स्टेल्थ युद्धनौका समाविष्ट करण्यात आल्या आहेत. या युद्धनौकांमुळे भारतीय नौदलाच्या सामरिक शक्तीत वाढ होणार आहे. त्याबरोबरच याद्वारे भारताची स्वदेशातच अत्याधुनिक युद्धनौका बांधण्याची क्षमताही सिद्ध होणार आहे. या युद्धनौकांच्या सामिलीकरणाकडे जगातील महत्त्वाच्या देशांचे लक्ष लागले आहे. आयएनएस कोलकाता ही या श्रेणीतील पहिली विनाशिका असून आयएनएस कामोर्टा ही त्या श्रेणीतील पहिली पाणबुडीविरोधी युद्धनौका आहे. या प्रकारच्या अत्याधुनिक स्टेल्थ युद्धनौकांची प्रथमच स्वदेशात बांधणी करण्यात आली आहे.

भारतीय नौदलात 1998 पासून स्वदेशी बनावटीच्या दिल्ली श्रेणीतील तीन अत्याधुनिक विनाशिका सामील करण्यात आल्या. या विनाशिकांच्या कार्यक्षमतेने प्रभावित होऊन नौदलाने या श्रेणीतील आणखी सात विनाशिकांची मागणी नोंदविली होती. मात्र, त्या नव्या विनाशिकांमध्ये भविष्यातील गरजांनुरूप काही सुधारणा सुचवण्यात आल्या होत्या. त्यांच्यापैकी आयएनएस कोलकाता पहिली. कोलकाता श्रेणीच्या स्टेल्थ विनाशिकांच्या बांधणीचा प्रकल्प ‘प्रोजेक्ट-15 ए’ नावाने राबवला जात आहे. त्यानुसार कोलकाता, कोची आणि चेन्नई या विनाशिकांची बांधणी मुंबईच्या माझगाव गोदीत सुरू असून पुढील टप्प्यातील ‘प्रोजेक्ट-15 बी’अंतर्गत आणखी चार स्टेल्थ विनाशिकाही तेथे बांधल्या जात आहेत. ‘प्रोजेक्ट-15 ए’ राबवत असताना तंत्रज्ञांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. परिणामी, यातील पहिली विनाशिका नौदलात सामील होण्यास चार वर्षांचा विलंब झाला आहे आणि संपूर्ण प्रकल्पाचा खर्चही तब्बल 225 टक्क्यांनी वाढला आहे.
आयएनएस कोलकाता ही स्टेल्थ गायडेड मिसाइल डिस्ट्रॉयर आहे. या श्रेणीतील सर्व विनाशिकांवर 16 अत्याधुनिक स्वनातीत ब्रह्मोस क्षेपणास्त्रे 16 आणि बराक-1 व बराक-8 ही जमिनीवरून हवेतील लक्ष्यांवर मारा करू शकणारी प्रत्येकी चार-चार क्षेपणास्त्रेही बसवण्यात आलेली आहेत. बराक-1 सुमारे बारा किलोमीटरवरील, तर बराक-8 हे 70 किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदू शकते. या क्षेपणास्त्रांना रडारद्वारे दिशादिग्दर्शन करून लक्ष्याचा अचूक वेध घेण्यास मदत करता येते. शत्रूच्या पाणबुड्या आणि युद्धनौकांवर हल्ला चढवण्यासाठी यावर पाणतीर (टोर्पेडो) आणि पाणबुडीविरोधी रॉकेटही बसवलेली आहेत. या शस्त्रास्त्रांमुळे कोलकाता श्रेणीतील युद्धनौकांची प्रहार तसेच स्वसंरक्षणाची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही विनाशिका 7200 टन वजनाची असूनही खुल्या सागरातील तिची चपळता कोणाच्याही नजरेत येणारी आहे. आयएनएस कोलकाता गॅस टर्बाइनवर चालत असल्यामुळे तिच्यातून धुराचे उत्सर्जन होणार नाही. त्यामुळे दूर सागरात संचार करत असताना मानवी नजरेपासून दूर राहण्यास या युद्धनौकेला मदत होणार आहे. अत्याधुनिक संपर्क साधनांच्या मदतीने हिंदी महासागर किंवा त्याही पलीकडे संचार करत असताना या विनाशिकेचा उपग्रहाच्या साहाय्याने मुख्यभूमीवरील मुख्यालयाशी संपर्क राखणे शक्य होणार आहे. या संपर्क यंत्रणेत शत्रूला शिरकाव करता येऊ नये, याचीही विशेष काळजी घेण्यात आली आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक युद्धप्रणाली बसवण्यात आल्यामुळे कोलकाता श्रेणीतील विनाशिका आधुनिक युद्धातही तग धरू शकणार आहेत. या विनाशिकेचे आरेखन वैशिष्ट्यपूर्ण असून त्यावरून रडारच्या लहरी, इन्फ्रारेड आणि सोनार लहरींचेही अतिशय कमी परावर्तन होते. त्यामुळे शत्रूचे रडार, पाणबुड्या आदींच्या नजरेपासून दूर राहण्यास आयएनएस कोलकाताला मदत होणार आहे. आयएनएस कोलकातावर स्वदेशी बनावटीचे दोन ध्रुव किंवा रशियन बनावटीची कामव-31 हे पाणबुडीविरोधी हेलिकॉप्टर ठेवण्याची सोय करण्यात आली आहे. ही विनाशिका दूर सागरात दीर्घकाळ संचार करत राहणार असल्याने त्यादरम्यान या हेलिकॉप्टरच्या देखभालीसाठी एक हँगर यावर बनवण्यात आला आहे.

आयएनएस कोलकाताबरोबरच भारतीय नौदलात आयएनएस कामोर्टा ही पाणबुडीविरोधी स्वदेशी अत्याधुनिक युद्धनौका दाखल झाली आहे. या युद्धनौकेमुळे भारतीय नौदलाच्या पाणबुडीविरोधी शक्तीत मोठी वाढ होणार आहे. शत्रूच्या पाणबुड्यांमुळे सागरी सुरक्षेला मोठा धोका असतो. म्हणूनच शत्रूच्या पाणबुड्यांचा वेळीच शोध घेऊन त्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पाणबुडीविरोधी खास युद्धनौका नाविक ताफ्यात बाळगणे आवश्यक बनते. हिंदी महासागरात भारताचे सामरिक हितसंबंध गुंतलेले आहेत. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही या महासागराला महत्त्व आहे. भारतीय नौदल या क्षेत्रातील सर्वात प्रबळ नौदल म्हणून ओळखले जाते. मात्र, सध्या चीन आणि पाकिस्तानच्या नौदलांच्या या महासागरातील वाढत्या हालचालींमुळे भारताच्या वर्चस्वाला आव्हान मिळू लागले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलात येणारी आयएनएस कामोर्टा महत्त्वाचे अस्त्र ठरणार आहे.

कामोर्टाची बांधणी कोलकात्यातील गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्सने केलेली आहे. नौदलाच्या प्रोजेक्ट-28 अंतर्गत तेथे कामोर्टासारख्या आणखी तीन युद्धनौका बांधल्या जात आहेत. कामोर्टाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही स्टेल्थ युद्धनौका आहे. त्यामुळे दूर सागरात शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध घेत फिरत असताना त्या शत्रूच्या रडारच्या नजरेपासून दूर राहू शकतील. तसेच टेहळणीच्या कामी कामोर्टाला त्यावर ठेवण्यात आलेले कामोव्ह-28 किंवा कामोव्ह-31 हे पाणबुडीविरोधी कारवाई करणारे हेलिकॉप्टरही मदत करेल. सुमारे 3400 टन वजनाच्या कामोर्टाला स्वदेशी बनावटीची चार डिझेल इंजिने बसवलेली आहेत. त्यांच्या मदतीने ती ताशी 25 सागरी मैल (सुमारे 30 किलोमीटर) वेगाने सागरात संचार करू शकते. सागरी पृष्ठभाग आणि हवाई क्षेत्रावर बारीक नजर ठेवण्यास उपयुक्त असा रेवती रडार यावर बसवण्यात आलेला आहे. ही युद्धनौका स्टेल्थ असल्यामुळे तिच्या बांधणीसाठी विशेष दर्जाचे पोलाद आवश्यक होते. या दर्जाच्या पोलादासाठी भारताला परदेशावर अवलंबून राहावे लागत होते. मात्र, अलीकडे त्याच्या आयातीत अडथळे येऊ लागल्याने भारताने स्वदेशातच तसे पोलाद तयार करण्याचा निर्णय घेतला.

कामोर्टा स्टेल्थ युद्धनौका असल्याने तिच्या आरेखनात काही वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. सागरातून संचार करत असताना तिच्यातून कमीत कमी ध्वनिकंपने निर्माण होतील आणि शत्रूच्या रडारच्या लहरींचे परावर्तन कमीत कमी राहील अशा प्रकारे तिचे आरेखन करण्यात आले आहे. आधुनिक काळातील आण्विक, जैविक आणि रासायनिक युद्धातही तग धरू शकेल अशी व्यवस्था युद्धनौकेवर करण्यात आली आहे. सागरात संचार करत असताना स्वसंरक्षणासाठी या युद्धनौकेवर 76 मिलिमीटर व्यासाच्या मुख्य तोफेबरोबरच बराक क्षेपणास्त्रे बसवण्यात आली आहेत. अशा 16 बराक क्षेपणास्त्रांबरोबरच अन्य काही शस्त्रास्त्रांमुळे शत्रूवर प्रभावी हल्ला करणे कामोर्टाला शक्य होणार आहे.

याआधी भारताने स्वदेशातच शिवालिक श्रेणीतील स्टेल्थ लढाऊ नौकांची (फ्रिगेट) यशस्वीपणे बांधणी केली आहे. मात्र, स्टेल्थ विनाशिका (कोलकाता) आणि कामोर्टासारखी स्टेल्थ पाणबुडीविरोधी युद्धनौका स्वदेशात बांधण्याचे भारतीय तज्ज्ञांचे हे पहिलेच प्रयत्न होते. कोलकाता आणि कामोर्टा श्रेणीतील युद्धनौकांच्या आरेखनाला जगभरातील नौदल तज्ज्ञांनी नावाजलेले आहे. या युद्धनौकांच्या आरेखनातील सुबकतेनेही त्यांना प्रभावित केले आहे. आयएनएस कोलकाता भारतीय नौदलातील सर्वात अत्याधुनिक आणि शक्तिशाली युद्धनौका गणली जाणार आहे. कोलकाता आणि कामोर्टा स्वदेशी बनावटीच्या युद्धनौका असल्या, तरी त्यांच्या बांधणीसाठी परदेशातून काही उपकरणे आयात केलेली आहेत. आज अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची निर्मिती अतिशय किचकट आणि खर्चिक झाली आहे. म्हणूनच अशा शस्त्रास्त्रांची निर्मिती मित्रदेशांच्या सहकार्याने करण्याकडे जगातील सर्वच प्रमुख देशांचा कल राहिलेला आहे. या दोन्ही अत्याधुनिक युद्धनौकांच्या बांधणीद्वारे भारताने नौदलाच्या स्वदेशीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
(Parag12951@gmail.com)