आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजपथावरील नवलाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजधानी नवी दिल्लीतील राजपथावर दरवर्षी प्रजासत्ताकदिनी पार पडणारे भव्य संचलन म्हणजे देशाची लष्करी ताकद, विविध क्षेत्रांतील प्रगती, सांस्कृतिक वारसा आदींविषयी थोडक्यात पण प्रभावीपणे जाणून घेण्याचे एक महत्त्वाचे साधन असते. यंदाच्या संचलनातही विविध प्रकारची शस्त्रसामग्री पहिल्यांदाच जगासमोर सादर करण्यात आली होती. त्यात स्वदेशी बनावटीचा मुख्य युद्ध रणगाडा ‘अर्जुन मार्क-2’, स्वदेशी बनावटीची ‘अरिहंत’ ही अणुपाणबुडी तसेच ‘अस्त्र’आणि ‘हेलिना’ क्षेपणास्त्रे या भारताच्या सैन्यदलामध्ये लवकरच येऊ घातलेल्या शस्त्रास्त्रांचा समावेश होता.


यंदा राजपथावरील संचलनात भारतीय नौदलात या वर्षाच्या अखेरीस सामील होणा-या स्वदेशी बनावटीच्या पहिल्या अणुपाणबुडीच्या-‘आयएनएस अरिहंत’च्या प्रतिकृतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. येत्या काही दिवसांमध्ये या अणुपाणबुडीच्या प्रत्यक्ष चाचण्या सुरू होणार असून त्यावर पाण्याखालून 700 किलोमीटर दूरवरच्या लक्ष्यावर मारा करू शकणा-या ‘के-15’ क्षेपणास्त्राची चाचणीही घेण्यात येणार आहे. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्रवाहक असणार आहे. ‘अरिहंत’च्या चित्ररथावर या क्षेपणास्त्राचाही समावेश करण्यात आला होता. ‘अरिहंत’वर 12 ‘के-15’ क्षेपणास्त्रे बसवण्यात येणार आहेत. ही क्षेपणास्त्रे डागण्यासाठी ‘अरिहंत’ला पाण्याच्या वर येण्याची आवश्यकता भासणार नाही. या दोन्हीमुळे भारताच्या सामरिक क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. या पाणबुडीच्या आरेखनात विशेषत: अणुभट्टीच्या निर्मितीमध्ये रशियाकडून महत्त्वाचे सहकार्य मिळाले आहे. ही पाणबुडी शंभर दिवस दूर महासागरात राहून शत्रूच्या नजरेत न येता भारताच्या राष्‍ट्रहिताच्या रक्षणात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याचे तत्त्व भारताच्या आण्विक धोरणात समाविष्ट करण्यात आलेले आहे. मात्र, शत्रूकडून आण्विक हल्ला झालाच आणि मुख्य भूमीवरील आण्विक आस्थापनांनाही त्यात लक्ष्य करण्यात आले, तर त्याला प्रत्युत्तर देण्याची क्षमता टिकवून ठेवण्यात अणुपाणबुडीवर तैनात केलेली अण्वस्त्रे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.


‘सी-17 ग्लोबमास्टर-3’ हे अवजड मालवाहू विमान अलीकडेच भारतीय हवाई दलात सामील झाले आहे. या विमानाच्या प्रतिकृतीबरोबरच ख-या विमानाचा समावेश संचलनातील आणखी एक नावीन्य ठरले. भारतीय हवाई दलाची मालवाहन क्षमता आणि सामर्थ्य मोठ्या प्रमाणात वाढवणारे हे विमान असून युद्धक्षेत्राच्या अगदी जवळ अवजड सामग्री पोहोचवण्याची याची क्षमता आहे. दोन आघाड्यांवर एकाच वेळी दोन शत्रूंशी लढावे लागण्याची शक्यता गृहीत धरून त्या दृष्टीने हवाई दल तयारी करत आहे. त्या पाश्र्वभूमीवर ‘सी-17’ विमान सामील होण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे विमान तब्बल 75 टन वजनाची साधनसामग्री सुमारे 3,800 किलोमीटर दूर असलेल्या ठिकाणी एका दमात पोहोचवू शकते. हवेत उडत असतानाच या विमानात इंधन भरण्याची सोय करण्यात आली असल्याने याचा पल्ला दुपटीने वाढू शकतो.


संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेद्वारे विकसित करण्यात येत असलेला ‘अर्जुन मार्क-2’ पहिल्यांदाच संचलनात सहभागी झाला होता. स्वदेशी बनावटीचा मुख्य युद्ध रणगाडा विकसित करण्याचा प्रकल्प तीस वर्षांहून अधिक काळ रखडलेला आहे. या प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात आलेल्या ‘अर्जुन मार्क-1’ रणगाड्यात भूदलाला अनेक त्रुटी जाणवत होत्या. त्यामुळे त्या रणगाड्यातील त्रुटी दूर करतानाच भूदलाच्या भविष्यातील गरजांनुरूप ‘अर्जुन मार्क-1’च्या आरेखनात बदल करून ‘अर्जुन मार्क-2’ विकसित करण्यात येत आहे. सध्या याही रणगाड्याच्या चाचण्या सुरू आहेत.
संचलनात सामील झालेले ‘हेलिना’ हे रणगाडाभेदी क्षेपणास्त्र पहिल्यांदाच सार्वजनिकरीत्या प्रदश्रित करण्यात आले होते. भारताच्या एकीकृत दिशानिर्देशित (गायडेड) क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या ‘नाग’ क्षेपणास्त्राची ही पुढची आवृत्ती आहे. ‘नाग’ क्षेपणास्त्रात काही सुधारणा करून ते हेलिकॉप्टरवरून वाहून नेण्यायोग्य बनवण्यात आले आहे. म्हणूनच हेलिकॉप्टर आणि नाग यांतील आद्याक्षरे घेऊन ‘हेलिना’ हे नाव तयार करण्यात आले आहे. हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने विकसित केलेल्या चार किलोमीटर पल्ल्याच्या या क्षेपणास्त्राच्या अलीकडे काही चाचण्या घेण्यात आल्या आहेत. ‘नाग’ जमिनीवरून जमिनीवरील लक्ष्यावर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. पण ‘हेलिना’साठी त्यात काही बदल करून हवेतून जमिनीवरील लक्ष्याचा भेद करण्यासाठी त्याला सक्षम बनवण्यात आले आहे.