आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवाई दलात अत्याधुनिक ‘रफाल’ची भर (पराग पुरोहित)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय हवाई दलाने आपल्या कार्यकक्षा रुंदावतानाच आपल्या ‘व्यूहात्मक हवाई दला’ची शक्ती वाढवण्यासाठी २३ सप्टेंबर रोजी फ्रान्सकडून रफाल ही मध्यम पल्ल्याची बहुद्देशीय लढाऊ विमाने खरेदी करण्याचा करार केलेला आहे. १९९६ मध्ये रशियाशी सुखोई-३० विमानांच्या खरेदीसंबंधीच्या करारानंतर झालेला हा लढाऊ विमानांचा पहिला खरेदी करार आहे. रफालची ही खरेदी हवाई दलाच्या लढाऊ शक्तीच्या अत्याधुनिकीकरणाची सुरुवात ठरू शकते.
३६ रफाल लढाऊ विमाने खरेदी करण्यासंबंधीचा तब्बल ५९,००० कोटी रुपयांचा करार झाला आहे. या विमानांबरोबर आपण घेत असलेले शस्त्रास्त्रांचे पॅकेज आणि त्यामध्ये आपल्या गरजांनुरूप करून घेत असलेले बदल हे घटक या व्यवहाराची किंमत जास्त होण्यामागे कारणीभूत ठरले आहेत. या विमानातील मूळच्या काही यंत्रणांच्या जागी आपण आपल्याकडील इस्रायली बनावटीचे हेल्मेट माउंटेड डिस्प्ले, रडार वॉनिंग रिसिव्हर्स, लो बँड जॅमर्स, इन्फ्रा-रेड सर्च अँड ट्रॅकिंग सिस्टिम अशा आणखी काही यंत्रणाही बसवणार आहोत. फ्रान्समध्ये ही विमाने तयार होतानाच या यंत्रणा त्यात एकीकृत केल्या जाणार आहेत. त्यामुळे या विमानामध्ये गरजेनुसार फेरफार करावे लागणार आहेत. त्याचीही किंमत या व्यवहारात समाविष्ट झालेली आहे.
रफाल ४++ श्रेणीतील म्हणजे पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानाच्या जवळचे विमान आहे. हवेतून जमिनीवर आणि हवेतून हवेत हल्ले करण्यासाठी, टेहळणीसाठी, आकाशात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी, जमिनीवरील आपल्या सैन्याला हवाई छत्र पुरवण्यासाठी, जहाजविरोधी, शत्रूच्या प्रदेशात दूरवर हल्ला करण्यासाठी आणि अण्वस्त्रवाहक म्हणूनही भूमिका रफाल बजावू शकते. त्यामुळे या विमानावर आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्रे तैनात केली जाऊ शकतात. या विमानात डायरेक्ट व्हॉइस इनपुट बसवण्यात आलेला आहे. त्याच्या मदतीने वैमानिकाला विमानाच्या यंत्रणांना (शस्त्रास्त्रे डागण्याची सोडून) तोंडी सूचना देऊनही कार्यान्वित करता येते. रफालमधील ‘एईएसए’ रडारच्या मदतीने एकावेळी आकाशातील शत्रूच्या अनेक लक्ष्यांचा वेध घेऊन त्यांच्यावर हल्ला करता येईल. ही यंत्रणा भारतीय हवाईदलाच्या विमानांमध्ये पहिल्यांदाच बसवलेली असेल. रफालला उडत असताना स्थैर्य मिळवून देण्यासाठी त्याच्यावर डिजिटल फ्लाय-बाय-वायर ही उड्डाण नियंत्रण यंत्रणा बसवलेली आहे. हवेत असताना शत्रूप्रदेशातील माहिती मिळवण्यासाठी यावर अनेक संवेदक बसवलेले आहेत. त्याची एकत्रित माहिती वैमानिकासमोर असलेल्या मोठ्या होलोग्राफिक हेड-अप डिस्प्ले यंत्रणेवर दिसते.
रफालमध्ये ऑक्सिजन निर्मितीची यंत्रणा बसवलेली आहे. भारतीय हवाई दलातील इतर लढाऊ विमानांमध्ये ती सध्या बसवण्यात येत आहे. त्यामुळे रफालच्या कॉकपिटमध्ये ऑक्सिजन सिलिंडर नाही. परिणामी रफालचा उड्डाणाचा कालावधी जास्त झाला आहे. रफालमध्ये ऑटोपायलट यंत्रणा बसवलेली आहे. भारतीय हवाई दलातील लढाऊ विमानांमध्ये ही यंत्रणा सध्या बसवण्याचे काम सुरू आहे. ही यंत्रणा वैमानिकावरील कामाचा ताण हलका करते आणि आपत्कालीन परिस्थितीही सांभाळून घेते. रफालमधील ‘स्पेक्ट्रा’ या स्वसंरक्षण यंत्रणेद्वारे विमानाचे हवेतील आणि जमिनीवरील शत्रूपासून संरक्षण होते. ही यंत्रणा विमानाचे खास वैशिष्ट्य ठरली आहे. लिबियामधील नाटोच्या हल्ल्यांच्या वेळी या यंत्रणेची बरीच मदत झाली होती. विमानावर बसवलेल्या विविध यंत्रणांच्या मदतीने जमिनीवरील आणि हवेतील लक्ष्याविषयीची माहिती उपलब्ध होत राहते. तसेच शत्रूच्या प्रदेशाची टेहळणीही करता येते. मिळालेल्या माहितीचे विमानावरील ‘एमपीडीयू’ यंत्रणेकडून तातडीने विश्लेषण होते . ती माहिती जमिनीवरच्या सैन्याला, नियंत्रण कक्षाला आणि वैमानिकालाही लगेच उपलब्ध होऊ शकते. रफाल आपल्याला मिळालेली लक्ष्याची माहिती आपल्या आसपासच्या आपल्या इतर विमानांनाही पुरवू शकते, ज्यामुळे त्यांना लक्ष्यांची अचूक माहिती वेळोवेळी उपलब्ध होत राहते.
रफालवर १४ हार्ड पॉइंट्स आहेत. त्यावरून एकूण ९.५ टनाची शस्त्रास्त्रे हे विमान वाहून नेऊ शकते. याच्यावरील ३० मिलिमीटरची स्वयंचलित तोफ मिनिटाला १२५ गोळ्यांचा मारा करू शकते. तसेच मॅजिक-२, मायका, मेटिओर ही हवेतून हवेतील लक्ष्ये भेदणारी क्षेपणास्त्रे रफालवर बसवलेली आहेत. यापैकी मेटिओर या मानवी दृष्टीच्या पलीकडचे लक्ष्य भेदू शकणाऱ्या क्षेपणास्त्राचा पल्ला १५० किलोमीटर आहे. भारत रफालबरोबर ही क्षेपणास्त्रे खरेदी करणार आहे.
रफालमधील इंधनाच्या टाकीची क्षमता ४.७ टन आहे; पण मोहिमेच्या गरजेनुसार इंधनाचा अतिरिक्त साठा सोबत नेण्याची सोय (ड्रॉप टँक्स) या विमानात आहे. अशा ३ ड्रॉप टँक्सच्या मदतीने रफालचा पल्ला ३,७०० किलोमीटरपर्यंत जातो. त्याबरोबरच रफालमध्ये हवेत उडत असतानाच इंधन भरण्याचीही सोय उपलब्ध आहे. याच्यावर बडी-रिफ्युलर बसवण्याची सोय असल्यामुळे हवेत उडत असताना गरजेच्या वेळी एका रफालमधून दुसऱ्या रफालमध्ये इंधन भरणे शक्य होते. सुमारे १,८०० किमी त्रिज्येचे प्रभावक्षेत्र असलेल्या रफालचा वेग ताशी २,५०० किमी आहे. हवाई दलासाठी १२६ लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या निविदेतही रफालने पसंती मिळवली होती. त्यामागे राजकीय कारणेही होतीच. रफालचे आगमन हवाई दलाच्या व्यूहात्मक शक्तीमध्ये वाढ करणारे असणार आहे.
बातम्या आणखी आहेत...