आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parag Purohit Editorial Article About Rail Budget, Divyamarathi

प्रीमियम एसी स्पेशल - नवी संकल्पना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वी मुंबई-दिल्लीदरम्यान प्रीमियम एसी स्पेशल संकल्पनेनुसार प्रायोगिक तत्त्वावर हंगामी वेगवान रेल्वेगाडी चालवण्यात आली होती. त्यातून रेल्वेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळाले होते. त्यामुळे आता आणखी 20 मार्गांवर अशा प्रीमियम स्पेशल रेल्वेगाड्या व्हाव्यात, अशी मागणी वाढत होती; पण रेल्वेने 17 मार्गांवर प्रीमियम रेल्वेगाड्यांना हिरवा कंदील दिल्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकांसमोरही काही तरी नवे मांडल्याचे समाधान मिळतानाच रेल्वेचे उत्पन्नही वाढणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून रेल्वेची भाडेवाढ कृत्रिम पद्धतीने रोखून धरण्यात आली होती. त्याचा रेल्वेच्या आर्थिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला होता. गेल्या वर्षभरात मात्र रेल्वेने दोनदा भाडेवाढ करून तोटा कमी करण्याचा प्रयत्न केला होता. तरीही एकूण रेल्वेचा खर्च, सामाजिक बांधिलकी जपताना करावी लागणारी तडजोड, त्यामुळे तिजोरीवर पडणारा भार यामुळे रेल्वेचा तोटा भरून येत नसल्याचे सांगितले जात होते.

रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी रेल्वेला तातडीने तीन हजार कोटींची आवश्यकता आहे. ‘पैसे घ्या, पण सुविधाही द्या’ या प्रवाशांच्या मानसिकतेचा आणि गर्दीच्या काळात वाढत्या मागणीचा विचार करून रेल्वेने प्रीमियम एसी स्पेशल संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ही संकल्पना महागडी असली तरी प्रवाशांकडून त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या तसेच दिवाळीच्या सुटीच्या काळात भारतात पर्यटनाचा हंगाम असतो. त्या काळात रेल्वेकडून विविध मार्गांवर अनेक विशेष रेल्वेगाड्या चालवल्या जातात. मात्र, त्यांचेही आरक्षण मिळणे कठीण असते. त्यातच या रेल्वेगाड्या हंगामी रेल्वेगाड्या असल्यामुळे संपूर्ण प्रवासात त्यांना प्राधान्य मिळत नाही. परिणामी या रेल्वेगाड्या वेळापत्रकाच्या किती तरी मागे धावत असल्याचेच पाहायला मिळते. या बाबी लक्षात घेऊन रेल्वेने प्रीमियम एसी स्पेशल ही संकल्पना आणली आहे. त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर पहिली रेल्वेगाडी मुंबई सेंट्रल ते नवी दिल्ली या मार्गावर सोडण्यात आली. रेल्वेगाड्यांची सर्वांत जास्त वर्दळ असलेल्या मार्गांपैकी हा एक मार्ग आहे.

प्रीमियम एसी स्पेशलसाठीचे आरक्षण केवळ 15 ते 7 दिवस आधी सुरू करण्यात येईल. या गाड्यांचे सुरुवातीचे भाडे राजधानी एक्स्प्रेसच्या तत्काळच्या भाड्याइतके किंवा त्यापेक्षा जास्त ठेवण्याची शक्यता आहे. सध्या प्रवासी वाहतुकीच्या बाबतीतही रेल्वे व्यावसायिक दृष्टिकोन स्वीकारू लागल्यामुळे प्रीमियम एसी स्पेशलसाठी विमानांच्या तिकिटांसारखीच पद्धत अवलंबली गेली आहे. या गाडीत जसजसे आरक्षण संपत जाते आणि गाडी सुटण्याचा दिवस जवळ येतो, तसे उपलब्ध जागांचे भाडेही वाढत जाईल. परिणामी या गाडीचे प्रत्येक दिवसाचे भाडे वेगवेगळे राहील. ही हंगामी रेल्वेगाडी असली तरी ती राजधानी एक्स्प्रेसच्या धर्तीवर चालवली जाणार आहे. त्यामुळे तिच्यासाठी निश्चित वेळापत्रक असून संपूर्ण प्रवासात त्याचे काटेकोरपणे पालन केले जाईल. परिणामी ही गाडी राजधानी एक्स्प्रेसइतकाच वेळ घेणार आहे. या गाडीसाठी संबंधित दिवशी मार्ग राखीव ठेवला जाणार असल्याने तिला नियमित गाड्या पुढे सोडण्यासाठी थांबवले जाणार नाही. दुरंतो एक्स्प्रेसप्रमाणे या गाडीला वाटेत कोठेही व्यावसायिक थांबे देण्यात आलेले नाहीत. तसेच या गाडीसाठी डबे आणि चालक-गार्ड, पँट्री कर्मचारी कायमस्वरूपी नेमलेले आहेत. या सर्व कारणांनी प्रीमियम एसी स्पेशल रेल्वेगाड्या चालवण्याचा खर्चही जास्त असणार आहे. त्यामुळे या रेल्वेगाड्यांचे भाडेही जास्त ठेवण्यात आले असून त्या प्रवासी भाड्यात कोणत्याही प्रकारची सवलत देण्यात येत नाही.

अशा गाडीत वातानुकूलित 3-टियर आणि वातानुकूलित 2-टियरचेच डबे असणार आहेत. तसेच तिकिटातच जेवण, चहा-नाष्ट्यासाठीचे शुल्क आकारले जाणार आहे. गर्दीच्या काळात शेवटच्या क्षणी प्रवाशांची मागणी पूर्ण करण्याच्या हेतूने ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या गाडीला वेटिंग लिस्ट किंवा रिफंडही देण्यात येणार नाही. काही कारणांमुळे रेल्वेकडून गाडी रद्द झाली तरच प्रवाशांना पूर्ण परतावा मिळणार आहे. म्हणूनच प्रवाशांना या गाडीचा पर्याय विचारपूर्वक निवडावा लागणार आहे. मात्र, आरएसी आणि करंट बुकिंग या गाडीत उपलब्ध असणार आहे. या गाडीचे आरक्षण केवळ इंटरनेटद्वारेच करता येणार आहे. या वेळी करंट बुकिंगसाठी मात्र नेहमीपेक्षा किमान चौपट अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. अशा पद्धतीने हंगामी अंदाजपत्रकात काही तरी नवे केल्याचे दर्शवतानाच रेल्वेचेही उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केला गेला आहे.
(Parag12951@gmail.com)