आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजस एक्स्प्रेस: रेल्वेचे आभासी भविष्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय रेल्वेवरील प्रवासी वाहतुकीचे भविष्य कसे असेल, याची झलक दाखवणारी ‘तेजस एक्स्प्रेस’ नुकतीच मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून गोव्यातील करमाळीपर्यंत धावू लागली आहे. ताशी २०० किलोमीटर वेगाने धावू शकणारी ही गाडी ५५२ किलोमीटर अंतर साडेआठ तासांमध्ये कापेल. केंद्रातील मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असतानाच ‘तेजस एक्स्प्रेस’ प्रवाशांच्या सेवेत आली आहे. मात्र, त्याच वेळी अलीकडील काळात ‘रेल्वेचा विकास’ याचा अर्थ वेगवान रेल्वेगाड्यांची सुरुवात आणि झगमगाट एवढ्यापुरताच मर्यादित झालेला असल्याचे दिसत आहे.
 
‘तेजस एक्स्प्रेस’ ही सेमी-हाय स्पीड रेल्वेगाडी आहे. या गाडीमध्ये प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा पुरवून त्यांचा प्रवास आरामदायक करण्याकडे लक्ष देण्यात आले आहे. ‘एलएचबी’ तंत्रज्ञानावर आधारित कपूरथळ्याच्या रेल्वे डबे कारखान्यात ‘तेजस एक्स्प्रेस’चे अत्याधुनिक डबे घडवले गेले आहेत. हे डबे ताशी २०० किलोमीटर वेगाने धावू शकत असले तरी ‘तेजस एक्स्प्रेस’चा वेग ताशी १३० किलोमीटरपर्यंत असेल, असे सांगण्यात येत आहे. एखाद्या गाडीची जितक्या वेगाने धावण्याची क्षमता असते, तितकेच तिच्या वेगावर नियंत्रण राखणेही महत्त्वाचे ठरते. त्यामुळे वेगाने धावणाऱ्या ‘तेजस एक्स्प्रेस’मध्येही सुरक्षित प्रवासासाठी स्टील ब्रेक डिस्क, सिंटर्ड पॅड आणि इलेक्ट्रो-न्यूमॅटिक असिस्ट ब्रेक सिस्टिम बसवली गेली आहे. या सर्व यंत्रणांच्या मदतीने वेगावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवणे शक्य होते.
 
पाण्याचा कमीत कमी वापर करून जास्त स्वच्छता राखणारे बायो-व्हॅक्यूम टॉयलेट, टचलेस वॉटर टॅप्स, डब्यांच्या अंतर्गत बाजूंवर संगमरवराप्रमाणे डिझाइन, स्वयंचलित दरवाजे, आगीची पूर्वसूचना देणारी यंत्रणा, सीसीटीव्ही, जीपीएस यंत्रणा, वायफाय, प्रवाशांसाठी मासिके अशी अनेक वैशिष्ट्ये ‘तेजस एक्स्प्रेस’मध्ये समाविष्ट केली गेला आहेत. ‘तेजस एक्स्प्रेस’मध्ये प्रवाशांच्या मनोरंजनासाठीही विशेष सोय करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रत्येक प्रवाशाच्या आसनासमोर स्वतंत्र एलईडी टीव्ही स्क्रीन बसवण्यात आला आहे. त्यावर प्रवाशांना आपल्या आवडीनुसार मनोरंजनाचे विविध कार्यक्रम पाहता येतील. त्याचबरोबर या स्क्रीनवर रेल्वेगाडीसंबंधीची इतर माहितीही दाखवली जाते.
‘तेजस एक्स्प्रेस’मध्ये प्रवाशांच्या खाण्यापिण्यासाठी खास सोय करण्यात आली आहे. चहा-कॉफीसाठी व्हेंडिंग मशीन बसवलेली आहेत. तसेच ही गाडी ज्या प्रदेशांमधून धावणार आहे, त्या प्रदेशांचे वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थ पुरवले जातील. सेलिब्रिटी शेफनी तयार केलेला विशेष मेनूही प्रवाशांसाठी उपलब्ध असणार आहे.
 
‘तेजस एक्स्प्रेस’मध्ये चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह कार तसेच जनरेटर कार या प्रकारच्या डब्यांचा समावेश आहे. भविष्यात या गाडीला एक ‘स्मार्ट कोच’ जोडण्याची योजना असून त्यामध्ये एक्झिक्युटिव्ह श्रेणीपेक्षा जास्त सुविधा पुरवल्या जाणार आहेत. सध्या या डब्यांची बांधणी सुरू आहे. यूपीए सरकारच्या काळात ‘राजधानी’ आणि ‘शताब्दी’ रेल्वेगाड्यांसाठी ‘अनुभूती’ या नव्या श्रेणीच्या डब्यांची निर्मिती करण्याची योजना होती. मात्र, ती योजना पुढे सरकू शकली नाही. त्याच ‘अनुभूती’च्या डब्याला आता ‘स्मार्ट कोच’ नावाने ‘तेजस एक्स्प्रेस’मध्ये समाविष्ट केले जाणार आहे.
 
भारतीय रेल्वेचे भविष्य दाखवण्याचा प्रयत्न ‘तेजस एक्स्प्रेस’च्या माध्यमातून करण्यात आला असला तरी येथे काही गोष्टींकडेही पाहणे तितकेच गरजेचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे रेल्वेचा विकास याचा अर्थ केवळ वेगवान रेल्वेगाड्या आणि झगमगाट एवढा मर्यादित स्वरूपात घेता येणार नाही. भारतीय रेल्वेचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर अगदी तळापासून सुरुवात करण्याची गरज आहे. मात्र, केवळ देखाव्यासाठी काही गोष्टी करायच्या असतील तर त्याचे परिणामही कालांतराने दिसू लागतात. जसे, आपल्याकडे गेल्या काही वर्षांपासून वेगवान रेल्वेगाड्या चालू तर होत आहेत; पण त्याच वेळी ज्याच्या आधारावर रेल्वेगाडी धावणार आहे, त्या लोहमार्गाच्या देखभालीकडे गांभीर्याने पाहिले जात आहे की नाही, अशी शंका यायला लागते. गेल्या एक-दीड वर्षामध्ये रेल्वेगाड्या रुळांवरून घसरण्याचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. लोहमार्गाप्रमाणेच इंजिने, डबे यांच्या देखभालीचेही तसेच होत आहे. हाय-स्पीड गाड्या सुरू करत असताना निव्वळ डब्यांची क्षमता वाढवून चालत नाही, तर सिग्नलिंगप्रमाणेच लोहमार्गांचे मजबुतीकरण, इंजिनांचे आधुनिकीकरण अशा सर्वच बाबींवर काम आवश्यक ठरते.
 
‘तेजस एक्स्प्रेस’ अत्याधुनिक असली तरी तिची या मार्गावरून धावणाऱ्या ‘दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस’शी तुलना करून पाहू. सरासरी वेगाच्या बाबतीत ‘जनशताब्दी’ ही रेल्वेगाडी ‘तेजस’पेक्षा थोडी जास्त वेगवान ठरत आहे. ‘तेजस’बाबत असे सांगितले जाते की, या गाडीच्या अत्याधुनिक डब्यांची क्षमता ताशी २०० किलोमीटर वेगाने धावण्याची आहे, पण आपल्याकडील लोहमार्गाच्या वेगमर्यादांमुळे ती १३० ते १६० किलोमीटर वेगाने धावेल. पण प्रत्यक्षात ‘तेजस’चा वेग जेमतेम ९० किलोमीटरपर्यंतच राहण्याची शक्यता आहे. एकीकडे कोकण रेल्वेमार्ग १६० किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने रेल्वेगाड्या धावू शकतील अशा पद्धतीने बांधला गेला आहे. आता २०० किलोमीटर वेगाने धावू शकणारे डबे बांधले गेले आहेत. मात्र, प्रत्यक्षात त्या क्षमतांचा पुरेसा उपयोग करून न घेतल्यामुळे रेल्वेचे नुकसान होऊ लागते.
 
गेल्या तीन वर्षांमध्ये एक ‘गतिमान एक्स्प्रेस’ सोडली, तर एकाही रेल्वेगाडीचा वेग वाढलेला नाही. रेल्वेने गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी ‘मिशन रफ्तार’ हाती घेतले असले तरी सध्या सुरू होणाऱ्या अत्याधुनिक रेल्वेगाड्या पूर्वीच्या रेल्वेगाड्यांपेक्षा कमी वेगाने धावत आहेत. विविध सोयी-सुविधा असलेल्या आरामदायक हमसफर, तेजस रेल्वेगाड्यांपेक्षा राजधानी, शताब्दी, दुरंतो अगदी मेल/एक्स्प्रेस यांसारख्या रेल्वेगाड्यांचा वेग जास्त आढळत आहे. म्हणजेच एका बाजूला भारतीय रेल्वेचे भविष्य कसे असेल, याचा आभास निर्माण केला जात असतानाच अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज (ज्यातील काही सुविधांना अत्याधुनिक म्हणावे का, असाही प्रश्न पडतो.) रेल्वेगाड्या संथगतीनेच धावताना दिसत आहेत. गेल्या तीन वर्षांमध्ये सुरू झालेल्या काही सुपरफास्ट रेल्वेगाड्यांच्या बाबतीतही तीच परिस्थिती पाहायला मिळते आहे. एकीकडे रेल्वेगाडी अत्याधुनिक सुविधांनी युक्त आहे, असे सांगत प्रवाशांकडून जास्त भाडे आकारले जाते. मात्र, त्याच वेळी त्या गाडीचा वेग साध्या गाड्यांपेक्षाही कमी राहतो आहे याकडे फारसे लक्ष दिले जात नाही.
 
एकूणच सध्या रेल्वेचे भविष्य कसे असेल, याचा वर्तमानात आभास निर्माण करण्यावरच जास्त भर दिला जाताना दिसत आहे. स्वच्छतेच्या बाबतीत रेल्वेची कामगिरी चांगली होत असल्याचे मान्य करावेच लागेल. पण रेल्वेचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी वर्तमानात अन्य बऱ्याच गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. सुलभ वाहतुकीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी रेल्वेच्या गरजा, प्रवाशांच्या गरजा-अपेक्षा, नियोजनपूर्वक जमाखर्चाचा ताळमेळ घालून वर्तमानातच पायाभूत संरचनेची उभारणी करण्याची खरी गरज आहे. नुसतेच वेगवान रेल्वेगाड्या आणि अनावश्यक सुविधा पुरवण्यावर भर राहिल्यामुळे रेल्वेचे उत्पन्न आणि खर्च यातील तफावत वाढत असल्याचे दिसत आहे. त्याचाच परिणाम म्हणून २०१६-१७ या वर्षात रेल्वेचे संचालन गुणोत्तर (ऑपरेटिंग रेशो) ९२ पर्यंत राखण्याचे अर्थसंकल्पीय उद्दिष्ट साध्य न होता ते ९६.९ पर्यंत गेले आहे, जो गेल्या १६ वर्षांमधील उच्चांक ठरला आहे.

parag12951@gmail.com
 
बातम्या आणखी आहेत...