आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रायलशी वाढते संरक्षण सहकार्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत आणि इस्रायल हे केवळ दोनच देश असे आहेत की, जे दहशतवादाचा सर्वाधिक काळ सामना करत आहेत. त्यामुळे देशांतर्गत सुरक्षा, महत्त्वाच्या संवेदनशील आस्थापनांची सुरक्षा इत्यादी बाबतीतही दोन्ही देश सहकार्य करत आहेत. दहशतवादाच्या विरोधातील लढाईत इस्रायलकडून मिळालेले रडार व अन्य साहित्य भारतासाठी उपयुक्त ठरत आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच झालेला इस्रायल दौरा दोन्ही देशांमधील संबंधांच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला आहे. या दौऱ्यामध्ये दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंध व्यूहात्मक पातळीपर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा भारत आणि इस्रायल यांच्यातील संरक्षण क्षेत्रातील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी होणार आहे. आज संरक्षण क्षेत्रातील संबंध भारत-इस्रायल संबंधांचा सर्वांत महत्त्वाचा आधारस्तंभ ठरत आहे. 
 
भारत आणि इस्रायल यांच्यातील राजनयिक संबंधांना २५ वर्षे पूर्ण होत असतानाच भारताच्या पंतप्रधानांचा त्या देशाचा पहिलावहिला दौरा होणे ही बाब दोन्ही देशांमधील संबंधांच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय अनुकूल ठरली आहे. १९४८ मध्ये इस्रायलची निर्मिती झाल्यापासून त्याचा पॅलेस्टाइनशी भूमीच्या मालकीवरून सतत संघर्ष सुरू आहे. या वादामध्ये भारताने कायमच पॅलेस्टाइनची बाजू घेतली असली तरी १९५० मध्येच त्याने इस्रायलला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यताही दिलेली आहे. भारताचे इस्रायलशी १९९२ पर्यंत राजनयिक संबंध स्थापन झालेले नसतानाही दोन्ही देशांमध्ये संरक्षण क्षेत्रात देवाणघेवाण होत राहिली होती. इस्रायलने १९६५, १९७१ आणि १९९९ च्या युद्धांमध्ये भारताला आवश्यक असलेली संरक्षण सामग्री तातडीने पुरवली होती. 
 
गेल्या २५ वर्षांमध्ये भारत आणि इस्रायल यांच्यातील संबंधांमध्ये संरक्षण क्षेत्राला विशेष स्थान मिळत राहिलेले आहे. परिणामी अमेरिका, रशियापाठोपाठ इस्रायल आज भारताचा तिसरा सर्वांत मोठा संरक्षण साहित्य पुरवठादार झाला आहे. इस्रायलकडून भारताला मानवरहित विमाने, रडार, क्षेपणास्त्र यंत्रणा यांसारखी महत्त्वपूर्ण शस्त्रसामग्री मिळत आहे. मोदी यांच्या इस्रायल भेटीमध्ये संरक्षण सामग्री खरेदीचे मोठे करार झालेले नसले तरी त्या करारांच्या दिशेने काही पावले निश्चित पडली आहेत. त्याआधी एप्रिल २०१७ मध्ये भारत आणि इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीज (आयएआय) यांच्यात भारतीय भूदलासाठी जमिनीवरून हवेतील लक्ष्यावर मारा करू शकणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राच्या खरेदीसंबंधीचा करार झाला होता. या क्षेपणास्त्रामुळे शत्रूची विमाने आणि क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्याची क्षमता भारताकडे येणार आहे. हा व्यवहार २ अब्ज डॉलरचा असून इस्रायलच्या संरक्षण साहित्य निर्मिती उद्योगाला मिळालेले ते आजवरचे सर्वांत मोठे कंत्राट ठरले आहे. ही क्षेपणास्त्रे भारतीय नौदल आणि हवाई दलामध्ये याआधीच सामील करण्यात आलेली आहेत. भूदलासाठीच्या या क्षेपणास्त्राचा पल्ला ७० किलोमीटर असला तरी नौदलातील युद्धनौकांवर बसवण्यात आलेल्या या प्रकारच्या क्षेपणास्त्राचा पल्ला त्याहून जास्त आहे. 
 
इस्रायलकडून ‘स्पाइक’ ही रणगाडाभेदी गायडेड क्षेपणास्त्रे तसेच हवाई सुरक्षा यंत्रणा खरेदी करण्याला भारताने याआधीच मंजुरी दिलेली आहे. ‘स्पाइक’चा हा व्यवहार ३,२०० कोटी रुपयांचा असणार आहे. सध्या भारत आणि इस्रायल संयुक्तपणे ‘बराक-८’ क्षेपणास्त्र भारतीय नौदलासाठी विकसित करत आहेत. या क्षेपणास्त्रामुळे भारतीय नौदलातील आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू जहाजाची स्वसंरक्षण यंत्रणा भक्कम होण्यास मदत होणार आहे. अशा प्रकारची आणखी एक यंत्रणा भारतीय नौदलाच्या अन्य युद्धनौकांवरही बसवली जात आहे. आपल्या हवाई दलासाठी भारताने इस्रायलकडून ‘फाल्कन’ ही ‘ॲवॅक्स’ यंत्रणा खरेदी केलेली आहे. सध्या भारतीय हवाई दलात अशी यंत्रणा बसवलेली तीन विमाने कार्यरत असून गेल्या वर्षी अशा आणखी दोन यंत्रणा खरेदी करण्याच्या सुमारे ५ हजार कोटी रुपयांच्या व्यवहाराला मंजुरी मिळाली आहे. शत्रुच्या प्रदेशामध्ये ४०० किलोमीटर आतपर्यंत आकाशातून नजर ठेवतानाच आपली लढाऊ विमाने, जमिनीवरील सैन्य आणि अन्य यंत्रणांमध्ये समन्वय राखू शकणारी ही यंत्रणा आहे. या यंत्रणेमुळे शत्रूच्या हवाई हल्ल्यांची पूर्वसूचना मिळवता येते. सध्या भारतीय हवाई दलातील इतर विमानांवरही इस्रायली बनावटीच्या यंत्रणा बसवण्यात आलेल्या असून त्यामुळे हवाई दलाला बराच लाभ होत आहे. कारगिल संघर्षाच्या वेळी इस्रायलकडून घेतलेल्या यंत्रणांच्या मदतीनेच मिराज-२००० विमानांनी उंचावरील पाकिस्तानी सैन्याचे बंकर लेसर बॉम्बच्या सहाय्याने अचूकपणे नष्ट केले होते. आता फ्रान्सकडून घेतल्या जाणाऱ्या रफाल विमानांवरही काही इस्रायली यंत्रणा बसवल्या जाणार आहेत. 
 
भारत आणि इस्रायल हे केवळ दोनच देश असे आहेत की, जे दहशतवादाचा सर्वाधिक काळ सामना करत आहेत. त्यामुळे देशांतर्गत सुरक्षा, महत्त्वाच्या संवेदनशील आस्थापनांची सुरक्षा इत्यादी बाबतीतही दोन्ही देश सहकार्य करत आहेत. दहशतवादाच्या विरोधातील लढाईत इस्रायलकडून मिळालेले रडार व अन्य साहित्य भारतासाठी उपयुक्त ठरत आहे. 
 
मोदी यांच्या दौऱ्याच्या वेळी भारत आणि इस्रायल यांच्यात ‘हेरॉन-टीपी’ ही सशस्त्र मानवरहित विमाने खरेदी करण्यासाठीचा व्यवहार होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्याबाबत अजून चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. सीमेवर टेहळणीसाठी भारताने याआधी इस्रायलकडून ‘हेरॉन’ आणि ‘सर्चर’ ही मानवरहित टेहळणी विमाने खरेदी केलेली आहेत. 
 
भारत आणि इस्रायल यांच्यात संवेदनशील संरक्षण साहित्याच्या उत्पादनासाठी इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीज आणि राफाएल, तसेच भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारत डायनॅमिक्स, लार्स अँड टुब्रो यांसारख्या संस्था/कंपन्यामध्ये सहकार्य मोठ्या प्रमाणात होत आहे. इस्रायलकडून महत्त्वाच्या संरक्षण साहित्याच्या भारतातील निर्मितीमध्ये सहकार्य केले जात असल्यामुळे केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमालाही त्यातून बळ मिळत आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या वेळी दोन्ही देशांनी ४० दशलक्ष डॉलरचा ‘टेक्नॉलॉजी इनोव्हेशन फंड’ स्थापन करण्यासंबंधीचा करार केलेला आहे. याचाही लाभ भारतात संरक्षण साहित्याच्या संशोधनात नावीन्यता आणण्यासाठी होऊ शकेल. 
 
मोदी आणि इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या शिखर परिषदेनंतर प्रकाशित झालेल्या संयुक्त निवेदनात स्पष्टपणे नमूद केले गेले आहे की, भविष्यात दोन्ही देश संरक्षण साहित्याच्या संयुक्त विकासावर लक्ष्य केंद्रीत करतील. त्या अनुषंगाने शिखर परिषदेनंतर दोन्ही बाजूंच्या कंपन्यांनी संरक्षण साहित्याचे भारतात संयुक्तपणे उत्पादन करण्यासाठीचे करार केले आहेत. भारत फोर्ज आणि ‘आयएआय’ यांनी हवाई सुरक्षा यंत्रणा आणि विशेष उद्देशासाठीच्या हलक्या स्फोटकांच्या निर्मितीसंबंधीच्या सहमतिपत्रावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. तसेच मानवरहीत विमानांचे भारतात उत्पादन करण्यासाठी डॉनॅमॅटीक टेक्नॉलॉजीज, ‘आयएआय’ आणि एलकॉम यांच्यात महत्त्वपूर्ण करार झाला आहे. 
 
अडचणीच्या काळात इस्रायलने भारताला आवश्यक आणि संवेदनशील संरक्षण साहित्याचा तातडीने पुरवठा करून आपण एक खात्रीचा आणि विश्वासू पुरवठादार असल्याचे सिद्ध केलेले आहे. इस्रायलकडून मिळणाऱ्या रडार यंत्रणांमुळे भारताला भूभागावरील सीमेबरोबरच सागरी सीमेवरही टेहळणीचे जाळे उभारणे शक्य होणार आहे. हिंदी महासागरात वाढत असलेल्या चिनी नौदलाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी याची बरीच मदत होणार आहे. भारत आणि इस्रायल यांच्यातील संरक्षण साहित्य खरेदी-विक्री आणि संयुक्त निर्मिती क्षेत्रातील संबंध बळकट होत असताना त्यांच्या सैन्यदलांमध्येही देवाणघेवाण होऊ लागली आहे. भूमध्य सागरात तैनात असलेल्या भारतीय युद्धनौकांचा ताफा गेल्या काही वर्षांपासून इस्रायलच्या हैफा बंदराला नियमित भेट देत आहे. आता लवकरच इस्रायलमध्ये पार पडणाऱ्या ‘ब्ल्यू फ्लॅग’ या बहुराष्ट्रीय हवाई युद्धसरावांमध्ये भारतीय हवाई दल सहभागी होणार आहे. आता खरी गरज आहे ती इस्रायलकडून संरक्षण सामग्री खरेदी करण्यासाठी मंजुरी मिळालेल्या व्यवहारांवर वेगाने पुढील प्रक्रिया होण्याची. 
 
(संरक्षण अभ्यासक)
parag12951@gmail.com 
बातम्या आणखी आहेत...