आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिझेल बचतीसाठी रेल्वे इंजिनात एपीयू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय रेल्वेने सध्या आपल्या ताफ्यातील इलेक्ट्रिक तसेच डिझेल-इलेक्ट्रिक इंजिनांमध्ये इंधन बचतीच्या हेतूने विविध प्रकारच्या यंत्रणा बसवण्यास सुरुवात केली आहे. देशाकडील परकीय चलन वाचवण्यात हातभार लावणारे आणि देशाच्या तांत्रिक प्रगतीतही वाटा उचलणारे हे प्रयत्न माध्यमांच्या नजरेत फारसे येत नाहीत आणि पर्यायाने त्यांची माहिती सामान्य जनतेलाही होत नाही. अलीकडेच रेल्वेने डिझेल-इलेक्ट्रिक इंजिनांमध्ये ऑक्झिलरी पॉवर युनिट बसवण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या मदतीने डिझेलची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.
आज भारतीय रेल्वेच्या एकूण खर्चात इंधनावरील खर्चाचा वाटा दुस-या क्रमांकावर आहे. मागील आर्थिक वर्षात रेल्वेला वीज खरेदीसाठी आठ हजार कोटी, तर हायस्पीड डिझेलसाठी 12 हजार कोटी मोजावे लागले होते. या दोन्हींच्या दरात या वर्षी झालेल्या वाढीमुळे या खर्चात सुमारे चार हजार कोटींची भर पडणार आहे. त्याचा रेल्वेच्या आर्थिक ताळेबंदावर विपरीत परिणाम होत आहे. म्हणून इंधनाच्या खरेदी दरांमध्ये काही प्रमाणात सवलत देण्यात यावी, अशी रेल्वेने पेट्रोलियम मंत्रालयाकडे मागणी केली होती. मात्र, त्याला अनुकूल प्रतिसाद न मिळाल्यामुळे गेल्या 7 ऑक्टोबरपासून प्रवासी आणि मालभाड्यात पुन्हा वाढ करावी लागली आहे.
दरम्यान, इंधनावर होत असलेला हा खर्च कमी करण्यासाठी रेल्वेने आपल्या परीने प्रयत्न सुरू केले आहेत. आपल्या ताफ्यातील इंजिनांमध्ये नव्या तंत्रज्ञानाचा समावेश करून कमीत कमी इंधनात त्यांची कार्यक्षमता कशी वाढेल, यावर संशोधन केले जात आहे. अशाच संशोधनातून डिझेल-इलेक्ट्रिक इंजिनांसाठी फ्युएल-सेल असिस्टेड ऑक्झिलरी पॉवर सप्लाय युनिट विकसित करण्यात आले आहे. इंजिन त्याच्या दर खेपेत जवळजवळ निम्मा वेळ गाडीबरोबर एकाच जागी उभे असते. विशेषत: मालगाड्यांच्या बाबतीत ही स्थिती दिसून येते. रेल्वे वाहतुकीत प्रवासी गाड्यांना प्राधान्य दिले जात असल्यामुळे मालगाड्यांना एकाच जागी चार-पाच तासांपर्यंत थांबवून प्रवासी गाड्यांना मार्ग उपलब्ध करून दिला जातो. अशा वेळी गाडी एकाच जागी बराच वेळ उभी असली तरी गाडीच्या ब्रेकमधील हवेचा दाब कायम ठेवण्यासाठी, इंजिनाच्या बॅटरी चार्ज होत राहण्यासाठी तसेच इंजिनाच्या टाकीतील थंड पाण्याचे तापमान कायम राखण्यासाठी इंजिन चालू ठेवावे लागते. कारण गाडीला जोडलेले इंजिन बंद केले, तर गाडीचे ब्रेक प्रेशर कमी होतेच, शिवाय इतर यंत्रणाही बंद पडतात. तसेच गाडी पुढे जाण्याच्या वेळी इंजिन पुन्हा सुरू केले, तर संपूर्ण गाडीत योग्य ब्रेक प्रेशर येण्यासाठी, इंजिनाच्या बॅटरी चार्जिंग आदींसाठी वेळ लागतो. दुसरीकडे इंजिन सतत चालू ठेवण्याने बरेच इंधन खर्च होतेच, शिवाय प्रदूषणही होत राहते. यातून मार्ग काढतानाच इंधनाची बचत व्हावी या हेतूने रेल्वेने ही नवी यंत्रणा विकसित केलेली आहे. फ्युएल सेल असिस्टेड ऑक्झिलरी पॉवर युनिट (एपीयू) ही यंत्रणा आता सर्व डिझेल-इलेक्ट्रÑीक इंजिनांमध्ये बसवण्यात येत आहे. या यंत्रणेच्या मदतीने दरवर्षी प्रत्येक इंजिनामागे 20 ते 25 टक्क्यांपर्यंत हायस्पीड डिझेलची बचत होणार आहे. ही यंत्रणा मायक्रो प्रोसेसरवर आधारलेली असून संगणकीकृत आहे. यासाठी विशेष आज्ञावली (सॉफ्टवेअर) तयार करण्यात आली आहे. त्याच्या साहाय्याने ही यंत्रणा इंजिन एकाच जागी बराच वेळ थांबले असेल, तेव्हा त्याच्या विविध यंत्रणांवर नजर ठेवते. त्या वेळी ही यंत्रणा चालकाच्या केबिनमधील विविध हँडल्सची स्थिती लक्षात घेते. सर्व हँडल्स योग्य स्थितीत असतील आणि आज्ञावलीत नोंद केल्यानुसार ठरावीक वेळ इंजिन एकाच जागी थांबलेले असेल, तर ही यंत्रणा कार्यान्वित होते. त्यानंतर चालकाला केबिनमध्ये इंजिन बंद होत असल्याचा इशारा मिळू लागतो. चालक बटन दाबून इंजिन बंद होण्याचा कालावधी काही मिनिटे पुढे ढकलू शकतो. अन्यथा काही क्षणांत इंजिन आपोआप बंद होते.
एपीयू यंत्रणेसाठी इंजिनात स्वतंत्र बॅट-या बसवल्या जातात. एकाच जागी थांबलेल्या गाडीचे इंजिन अशा पद्धतीने बंद झाल्यावर एपीयूच्या बॅट-यांच्या मदतीने ब्रेक प्रेशर, थंड पाण्याचे तापमान कायम राखले जाते. तसेच एपीयूमुळे इंजिनाच्या अन्य आवश्यक तेवढ्याच यंत्रणा कार्यरत राहतात. या कामासाठी अतिशय कमी ऊर्जेची गरज असल्याने मुख्य इंजिन बंद झाले तरी चालते. आजपर्यंत एपीयूसारखी यंत्रणा उपलब्ध नसल्याने संपूर्ण इंजिन चालू ठेवावे लागत होते. परिणामी, इंधनाचाही बराच अपव्यय होत असे. इंजिनाच्या सर्व यंत्रणा ते बंद होतानाच्या स्थितीत असल्यासच ते परत सुरू करता येते. त्यानंतर इंजिन धावू लागल्यावर एपीयू यंत्रणेतीलच ऑक्झिलरी जनरेटरच्या मदतीने या बॅट-या पुन्हा चार्ज होतात. सुरुवातीच्या टप्प्यातसाडेचार हजार अश्वशक्तीच्या मालगाड्यांसाठीच्या डब्ल्यूडीजी-4, डब्ल्यूडीजी-4 डी या इंजिनांमध्ये ही यंत्रणा बसवली जाणार आहे. या इंजिनांमधील सर्व यंत्रणा मायक्रो प्रोसेसरवर आधारलेल्या असल्याने त्यामध्ये एपीयू यंत्रणा एकीकृत करणे सोपे होणार आहे. अशा प्रकारची यंत्रणा इलेक्ट्रीक इंजिनांमध्येही बसवली जाणार आहे. त्यामुळे विजेचा वापरही कमी होऊन खर्चात कपात होईल.