आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parimal Maya Sudhakar's Artical On Nelson Mandela's Life

एका क्रांतिसूर्याचा अस्त!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदविरोधी लढ्याचे अध्वर्यू नेल्सन मंडेला यांच्या निधनाने विषमता आणि भेदभाव यांच्या विरोधात लढणारी जगभरातील आंदोलने पोरकी झाली आहेत. 20व्या शतकात जगभरातील समतावादी आंदोलनाचे आदर्श असलेल्या नेत्यांच्या यादीत मंडेलांचे स्थान वरचे आहे. म. गांधी, मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) आणि डॉ. आंबेडकर यांच्याप्रमाणे नेल्सन मंडेला हे जागतिक स्तरावर समानतेच्या आदर्शांनी भारावलेल्या कोट्यवधी लोकांचे प्रेरणास्थान होते.
नेल्सन मंडेलांचा जीवनकाळ म्हणजे द. आफ्रिकेतील कृष्णवर्णीय समाजाच्या सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्याचा इतिहास आहे. पहिल्या महायुद्धाच्या काळात, म्हणजे 1918 मध्ये झोशा-भाषिक थेंबू जमातीत मंडेलांचा जन्म झाला. त्यांच्या कुळाचे नाव ‘मदिबा’ असल्याने त्यांना या नावानेसुद्धा ओळखले जाई. पुढे शाळेतील बार्इंनी त्यांचे नामांतर ‘नेल्सन’ असे केले. शिक्षण घेणा-या अनेक आदिवासींप्रमाणे नेल्सनला लहान वयातच ख्रिस्ती धर्माची दीक्षा देण्यात आली. 1942 मध्ये त्यांनी आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे सदस्यत्व घेतले आणि कृष्णवर्णीयांच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले. मंडेलांनी आपल्या आजूबाजूला जहाल तरुणांचा गट गोळा केला आणि त्याद्वारे आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे मवाळ धोरण बदलवण्यासाठी दबाव आणला. 1956 मध्ये गो-या सरकारने मंडेला आणि त्यांच्या 155 सहका-यांवर राजद्रोहाचा खटला भरला; पण चार वर्षांच्या सुनावणीनंतर त्यांच्यावरील आरोप मागे घेतले. या काळात मंडेला आणि त्यांच्या सहका-यांचा कल शांततापूर्ण आंदोलनावरच होता. मात्र, 1960 मध्ये सरकारने आफ्रिकन नॅशनल काँग्रेसवर बंदी घातल्यावर मंडेलांनी आपले आंदोलन अधिक उग्र केले. याच वेळी आंतरराष्‍ट्रीय पटलावर उदयास आलेल्या अलिप्ततावादी देशांच्या चळवळीने आफ्रिकन नॅशनल काँग्रेसला पाठिंबा देऊ केला. त्यानंतर आर्थिक कोंडीत सापडलेल्या गो-या राजवटीच्या अडचणी वाढवण्यासाठी मंडेलांच्या सहका-यांनी चळवळ अधिक जोमाने सुरू ठेवली.
1961 मध्ये गो-या सरकारने मंडेलांना अटक करत त्यांच्यावर पुन्हा राजद्रोहाचा खटला भरला. न्यायालयात आपली बाजू मांडताना मंडेलांनी म्हटले होते, ‘मी लोकशाहीतील मुक्त समाजाचा आदर्श स्वीकारला आहे, ज्यामध्ये सर्व व्यक्तींना समान संधी उपलब्ध असतील आणि सर्व लोक गुण्यागोविंदाने नांदतील. आवश्यकता पडल्यास या आदर्शासाठी मृत्यूस सामोरे जाण्याचीही माझी तयारी आहे.’ 1964 मध्ये मंडेलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली व त्यांना 18 वर्षे रोबिन बेटावर आणि 1982 मध्ये पोल्समूर तुरुंगात हलवण्यात आले. आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या इतर अनेक नेत्यांनासुद्धा तुरुंगात डांबण्यात आले, तर काही जण देशाबाहेर जाण्यात यशस्वी झाले. नेतृत्वाअभावी कृष्णवर्णीय तरुणांनी मंडेलांना प्रेरणास्थान मानत छोट्या छोट्या गटांच्या माध्यमातून वर्णद्वेषाविरोधात आंदोलन सुरूच ठेवले. परदेशात गेलेल्या नेत्यांनी जगभर आपले जाळे विणत 1980 मध्ये वर्णभेदाविरुद्ध जागतिक स्तरावर अभियानाची सुरुवात केली. या अभियानाची एक-कलमी मागणी होती नेल्सन मंडेलांची मुक्तता! या अभियानात जगभरातील आंदोलनकारी, पुरोगामी साहित्यिक आणि कलावंत सहभागी झाल्याने सर्वच देशांनी मंडेलांच्या सुटकेसाठी द. आफ्रिकेवरील निर्बंध अधिक कडक केले. अखेर गो-या सरकारने अनेक अटी लादत मंडेलांच्या सुटकेची तयारी दर्शवली होती; पण या अटी झिडकारत मंडेला म्हणाले होते, ‘स्वतंत्र असलेली व्यक्ती वाटाघाटी करू शकते. तुरुंगात बंदिस्त असलेल्यांना करार करण्याचा अधिकार नसतो.’ अखेर 11 फेब्रुवारी 1990 रोजी द. आफ्रिकेचे तत्कालीन राष्‍ट्राध्यक्ष डी क्लार्क यांनी मंडेलांची विनाशर्त सुटका केली आणि आफ्रिकन नॅशनल काँगे्रसवरील बंदी उठवली. वर्णद्वेषी राजवटीचे रूपांतर समतामूलक राज्यात करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलल्याबद्दल 1993मध्ये डी क्लार्क आणि नेल्सन मंडेला यांना संयुक्तपणे शांततेचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले.
1994 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या खुल्या व सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राष्‍ट्राध्यक्षपद झाल्यानंतर मंडेलांनी देशाची नवी राज्यघटना तयार करण्यासह द. आफ्रिकेची अर्थव्यवस्था, लोकशाहीव्यवस्था व आंतरराष्‍ट्रीय संबंध मजबूत करण्यावर भर दिला. द. आफ्रिकेत अल्पसंख्याकांमध्ये श्वेतवर्णीय आणि काही आदिवासी जमाती यांचा समावेश होतो. मंडेलांच्या मार्गदर्शनात दक्षिण आफ्रिकेत ‘इंद्रधनुष्यी राज्यव्यवस्था’ प्रस्थापित झाली. परिणामी, देशाला स्थैर्य लाभले. भारताने नेल्सन मंडेलांच्या लढ्याला सुरुवातीपासून अखेरपर्यंत खंबीर साथ दिली. द. आफ्रिकेतील गो-या राजवटीवर आंतरराष्‍ट्रीय बहिष्कार घालण्यात भारताचा पुढाकार होता. भारताने सातत्याने संयुक्त राष्‍ट्राच्या व्यासपीठांवर मंडेलांच्या सुटकेची मागणी केली होती. तुरुंगातून सुटल्यावर काही महिन्यांच्या आतच मंडेलांनी भारताला भेट देऊन कृतज्ञता दाखवली होती. भारत सरकारने त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ने सन्मानित केले. मंडेलांच्या निधनाने भारताचा परममित्र आणि जगभरातील दीनदुबळ्या शोषितांसाठीचा लढवय्या काळाच्या पडद्याआड गेला आहे.