आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कतारचे पंख कापण्याचा डाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अवघ्या तीन आठवड्यांपूर्वी अरब इस्लामिक अमेरिकन परिषदेमध्ये दहशतवादाला मूठमाती देण्याची ग्वाही देत विकासाचा संकल्प आखाती सहकार्य परिषदेतील देशांनी (जीसीसी) केला होता. त्यानंतर दहा दिवसातच जीसीसी देशांमधील थोरला भाऊ असलेल्या तेलसंपन्न सौदी अरेबियासह संयुक्त अरब अमिराती (यूएई), बहारिन व इजिप्त यांनी जीसीसी सदस्य देश असलेल्या कतारची इस्लामिक मूलतत्त्ववाद्यांना व दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप करत अनिश्चित काळासाठी त्याच्याशी असलेले राजनैतिक संबंध तोडले. पुढे सौदी, बहारिन व यूएईने कतारशी भूपृष्ठ, जल तसेच हवाईमार्ग बंद केला.
 
जगातील धनाढ्य देशांपैकी एक असलेल्या लहानशा कतारशी राजनैतिक संबंध तोडण्यासाठी दहशतवाद हा एक वरकरणी मुद्दा दिसत असला तरी एलएनजीमधील कतारची स्वयंपूर्णता त्याचबरोबर रशियामध्ये केलेली गुंतवणूक व इराणसोबत (नाॅर्थ आॅफशोअर फिल्ड) एलएनजी क्षेत्राचा विकास करण्यासाठी घेतलेला पुढाकार ही पडद्यामागील सर्वांत महत्त्वाची कारणे आहेत. तसेच हा संघर्ष शिया व सुन्नी यांच्यामधील वर्चस्वाच्या लढाईचा पण एक भाग आहे. जागतिक पटलावर कतारला मानाच स्थान मिळवून देणाऱ्या व अरबांसाठी डोकेदुखी ठरत असलेल्या कतारच्या अल-जझिरा या इंग्रजी व अरबी वृत्तवाहिनीचे काहीही करून पंख कापण्याचा कुटील डावही कतारचे राजनैतिक संबंध तोडण्यामागे आहे. अमेरिकेची मध्य पूर्वेतील बदललेली राजकीय गणितेही तितकीच कारणीभूत आहेत हे पण विसरून चालणार नाही. कतारवरील कारवाईचे समर्थन करताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मध्य पूर्वेतील सर्वांत मोठा एअरबेस कतारमध्येच असल्याचा विसर पडला हे आश्चर्यजनक आहे.
 
नेमके काय घडले
कतारचे राजे शेख तमीम बिन हमाद अल-थानी यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर प्रहार करत इराणची प्रशंसा केली होती. तसेच इस्रायलशी संबंध सलोख्याचे असल्याचे म्हटले होते. या संदर्भातील वृत्त अधिकृत कतारी न्यूज एजन्सीवर (क्यूएनए) प्रसिद्ध झाले आणि नेमकी हीच घटना सूडनाट्याला सुरवात करणारी ठरली. कतारचे परराष्ट्रमंत्री महंमद अल थानी यांनी क्यूएनए हॅक झाल्याचा आरोप अमेरिकेवर केला व कतारशी निगडित अमेरिकन माध्यमांमध्ये गेल्या पाच आठवड्यांत १३ लेख प्रसिद्ध झाल्याचा दावा केला. या सर्व घडामोडींनंतर सौदीने हे पाऊल उचलले.
 
कतारवरील आरोप
कतारची राजकीय नाकेबंदी करण्यामागची कारणेही या देशांनी दिली. मुस्लिम ब्रदरहुडला पाठिंबा देणे, येमेनमधील बंडखोर हौथी गटाला पाठिंबा देणे, सिरियामधील बंडखोर गटांना व इस्लामिक मूलतत्त्ववाद्यांना फूस लावणे, कतारी माध्यमांचा अतिरेक व खोटा प्रचार, हमासला पाठिंबा आदी मुद्यांवर कतारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. सौदी व युएई मुस्लिम ब्रदरहुडला दहशतवादी संघटना मानते पण याच संघटनेला आपली बाजू मांडण्यासाठी कतार व्यासपीठ उपलब्ध करून देत असल्याचा आरोप आहे. अल-कायदा व आयसिस तसेच मुस्लिम ब्रदरहुडचा वापर करून देशात अस्थिरता निर्माण करत असल्याचा आरोप सौदीचा आहे. सौदी, बहारिन व यूएई व इजिप्तने संयुक्तपणे ५९ व्यक्ती व १२ संघटनांची नावे जाहीर केली आहेत ज्यामध्ये कतार त्यांना दहशतवादासाठी पाठिंबा किंवा आर्थिक साहाय्य करत असल्याचा आरोप आहे.
 
रशिया-इराण-कतार त्रिवेणी संगमाने सौदीची पोटदुखी
जगाच्या पाठीवरील एकूण द्रवरूप नैसर्गिक वायूच्या (एलएनजी) तब्बल ३० टक्के उत्पादन अवघी २५ लाख (त्यातही वीस लाख परदेशी) लोकसंख्या असलेला कतार करतो. इतकेच नव्हे, तर अतिशय रास्त दरात कतार पाइपलाइनच्या माध्यमातून जगाला एलएनजीचा पुरवठा करत असून जपानला सर्वाधिक निर्यात करतो. कतारनंतर एलएनजीमध्ये रशियाची मक्तेदारी आहे. कतारची प्रस्तावित व्हाया सिरिया एलएनजी पाईपलाईनही अरब राष्ट्रांच्या रोषाला कारणीभूत ठरली आहे. युरोपला स्वस्तात एलएनजी पुरवठा करण्यासाठी कतार व्हाया सिरिया पाइपलाइन टाकणार होता. ही पाइपलाइन अस्तित्वात आली असती तर युरोपमधील रशियाच्या गॅझप्रोमची एकाधिकारशाही संपुष्टात येणार होती. त्यामुळे कतारच्या संभाव्य पाइपलाइनमुळे होणारे परिणाम लक्षात घेऊन रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी सुरुवातीपासूनच विरोध करत हा प्रकल्प उधळून लावण्यासाठीच खेळ्या केल्या.

त्यांनी सिरियामध्ये कठपुतळीप्रमाणे असाद सरकार कसे राहील याकडे लक्ष दिले होते. शक्तिशाली पुतीन यांच्यासमोर काहीच डाळ शिजत नसल्याने कतारसमोर नवीन पर्याय शोधल्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. त्यानुसार कतारने गेल्यावर्षी रशियन मालकीच्या रोसनेफ्ट ऑइलमध्ये पावणे तीन बिलियन डाॅलरची गुंतवणुक केली आहे. दोन महिन्यांपूर्वी कतारने २००५ मध्ये स्वतःवरच लादलेली बंदी उठवताना इराणच्या सहभागासह जगातील सर्वांत मोठ्या नैसर्गिक वायूचा क्षेत्राचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. इराणने गॅस कमतरतेमुळे साऊथ पार्स प्रकल्पातून उत्पादन जलद गतीने करण्यास सुरुवात केली आहे. इराणने एवढ्यावरच न थांबता वरील प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला गती देण्यासाठी प्राथमिक स्वरुपात करार फ्रान्ससोबत केला आहे. इराणवरील आर्थिक बंदी मागे घेण्यात आल्यानंतर पाश्चिमात्य देशांकडून इराणसोबत केलेला हा पहिलाच करार आहे.
 
सौदी व यूएई व बहारीनने २०१४ मध्येही कतारवर दहशतवादाचे आरोप करत राजदूतांना माघारी बोलावले होते व आठ महिन्यांनी राजनैतिक संबंध पूर्ववत केले होते. २००६ मध्येही सौदीने कतार ते कुवेत गॅस पाइपलाइनला विरोध केला होता. हाच प्रकार सौदीकडून ओमान व यूएईला पाइपलाइन टाकताना झाला होता. इतकेच नव्हे तर कतार ते यूएई व कतार ते बहारिन पूल बांधण्याच्या प्रकल्पात सौदीने आडकाठी केली होती.
 
अमेरिकेची संदिग्ध भूमिका
अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या कार्यकाळात सौदीशी दोन हात राखूनच संबंध ठेवले होते. इराणवरील आर्थिक निर्बंध त्यांनी मागे घेतले होते. दरम्यानच्या काळात सौदी शांत होता. अमेरिकेतील सत्तापालटानंतर सगळी समीकरणे बदलली आहेत व सौदीला मोकळीक मिळाली आहे. इस्लामिक दहशतवाद व मुस्लिम देशांविरुद्ध तुटून पडूनही अध्यक्ष झाल्यानंतर पहिला द्विपक्षीय दौरा डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदीचा केला. त्याचबरोबर प्रवेशबंदी केलेल्या इराणला सौदीमधून खडे बोल सुनावले होते. कतारची द्विपक्षीय संबंध तोडण्याच्या निर्णयाचे त्यांनी समर्थन केले होते व पेंटागॉनने सावध भूमिका घेत कतारमधील एअरबेसबद्दल त्यांचे आभार मानले होते. तर परराष्ट्र मंत्र्यांनी कतारला निर्णय शिथिल करण्याची विनंती केली. त्यामुळे अमेरिकेच्या विसंगत भूमिकेमुळे अडचणीत भर पडली आहे.
 
कतारवरील संभाव्य परिणाम : कतार सौदीशी तिन्ही मार्गांनी जोडला गेला आहे. जीवनावश्यक खाद्यपदार्थांसह लागणाऱ्या जवळपास सर्वच वस्तू सौदीकडून कतार घेतो. पण सीमा बंद झाल्याने त्यांच्या किमती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कतारी नागरिकांनी साठेबाजी सुरू केली आहे. कतारच्या सर्वं विमान कंपन्या जागतिक दर्जाच्या आहेत. हवाई मार्ग पण बंद करण्यात आल्याने त्यांना व्हाया आफ्रिका किंवा उत्तर अमेरिकेचा मार्ग शोधावा लागणार आहे. त्यामुळे वेळ, तिकीट खर्च कदाचित वाढू शकतात. कतार हा स्वतःच्या देशामध्ये अल्पसंख्याक असलेला देश आहे. कतारमध्ये तब्बल वीस लाख परदेशी नागरिक आहेत. २०२२ च्या फुटबाॅल विश्वकरंडक स्पर्धेची कतारमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. कदाचित द्विपक्षीय बंदी जास्त वाढत गेल्यास तयारीसाठी फटका बसू शकतो. पण आर्थिक आघाड्यांवर कतार भरभक्कम असल्याने कतारला फारशी अडचण नाही.

परशराम पाटील
दम्माम, सौदी अरेबिया. (लेखक दम्माममध्ये स्टार या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये कार्यरत आहेत)

parshrampatil1209@gmail.com
बातम्या आणखी आहेत...