आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे राम!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील अन्य राजकीय पक्षांपेक्षा आपण वेगळे आहोत, असे दाखवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने नेहमीच केला आहे. पक्षाकडे स्वत:चे तत्त्वज्ञान आणि वैचारिक बैठक असल्याचा टेंभा मिरवण्याची एकही संधी भाजप नेते कधी सोडत नाहीत. मात्र नजीकच्या काळात या पक्षातील घटनाक्रम पाहता सगळ्यांचेच पाय मातीचे असतात यावर जणू शिक्कामोर्तबच झाले आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतील रुसवेफुगवे असोत की, पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी ब्लॉगच्या माध्यमातून व्यक्त केलेली जाहीर नाराजी असो, तिकडे राजस्थानात वसुंधराराजेंचे राजीनामा नाट्य असो की, गुजरातेत नरेंद्र मोदी यांच्या राजवटीची आणीबाणीपेक्षाही वाईट अशा शब्दांत भाजप नेत्यांनीच केलेली संभावना असो, हा सगळाच घटनाक्रम भाजप हा पक्ष एकसंध राहिलेला नाही याचेच द्योतक आहे. या सगळ्याच वाद-प्रवादांची बीजे भाजप नेत्यांच्या सत्तालोलुपतेच्या महत्त्वाकांक्षेत रुजलेली आहेत.
लालकृष्ण अडवाणींना खरे तर केंद्रात एनडीएची सत्ता आली तेव्हाच पंतप्रधान व्हायचे होते; पण ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या थोरवीपुढे त्यांना आपल्या या महत्त्वाकांक्षेला मुरड घालावी लागली होती. त्यानंतर झालेल्या दोन निवडणुकांत एनडीएला बहुमतच मिळाले नसल्यामुळे अडवाणींचा पुन्हा स्वप्नभंग झाला. केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचे एकामागून एक पुढे आलेले घोटाळे, वाढती महागाई, भ्रष्टाचार यामुळे देशभर संपुआविरोधी वातावरण असल्याचे चित्र दिसू लागले आहे. त्यातच उत्तर प्रदेशसह काही राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये संपुआतील प्रमुख घटक पक्ष काँग्रेसचा सपाटून पराभव झाल्यामुळे 2014 मध्ये होणाºया निवडणुकीनंतर केंद्रात येणारे सरकार हे एनडीएचेच असेल, असा पक्का (गैर)समज भाजपच्या आघाडीच्या नेतृत्वाने करून घेतला आहे. त्यामुळेच आयुष्याच्या उत्तरार्धात तरी पंतप्रधान होण्याच्या महत्त्वाकांक्षेची पूर्तता होण्याची चिन्हे अडवाणींना दिसू लागली असतानाच पंतप्रधानपदासाठी मध्येच गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचे नाव पुढे करण्यात आल्याने अडवाणींचा चांगलाच मुखभंग झालेला दिसतो. त्यातच नितीन गडकरींची दुसºयांदा अध्यक्षपदी झालेली निवडही त्यांना रुचलेली नाही. परिणामी त्यांना नैराश्याने ग्रासले आहे. त्यामुळेच त्यांनी आपल्या ब्लॉगवर भाजपचे कार्यकर्ते आणि समर्थकांचा भ्रमनिरास झाल्याची जाहीर टीका करून मनात खदखदत असलेल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
अडवाणींनी केलेल्या ग्लोबल पंचनाम्याच्या धक्क्यातून भाजपचे नेते, कार्यकर्ते आणि त्यांच्याच भाषेतील समर्थक किंचितही सावरले नसतानाच भाजपचे मुखपत्र ‘कमल संदेश’च्या अग्रलेखातूनही पक्षाच्या नेत्यांना चांगलेच फैलावर घेण्यात आले. मी म्हणतो तेच आणि मी सांगेल तसेच होईल, अशी प्रवृत्ती भाजपमध्ये बोकाळली असल्याचे या अग्रलेखातून ध्वनित होते. काही जणांना भलतीच घाई झाली असल्याची टीका करतानाच विद्यार्थी बिघडला तर समजण्यासारखे आहे, येथे तर शिक्षक आणि मुख्याध्यापकच पातळी सोडून वागायला उतावीळ झाले असल्याचे पक्षांतर्गत परंतु विदारक चित्र या अग्रलेखातून मांडण्यात आले. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीपेक्षा संघटना मोठी आहे, असे बजावण्याची वेळ ‘कमल संदेश’च्या संपादकांवर आली. याचाच अर्थ भाजप हा अनुशासनशील वगैरे काही राहिलेला नाही. अन्य राजकीय पक्षांत चालतात तशाच लाथाळ्या, कुरघोड्या आणि पाय ओढण्याची स्पर्धा भाजपमध्येही जोरात सुरू आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. परिणामी दुसºयांना पक्षांतर्गत लोकशाही आणि संघटनात्मक पारदर्शकतेचे धडे देण्याचा अधिकार आता भाजपकडे शिल्लक राहिलेला नाही.
भाजपकडून कार्यकर्ते आणि समर्थकांचा भ्रमनिरास झाला हे सांगण्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे किंवा चार भिंतीआड चालणाºया केडर कॅम्पचे व्यासपीठ न वापरता संघटन आणि पक्षबांधणीचा प्रदीर्घ अनुभव असलेला अडवाणींसारखा नेता ब्लॉगसारखे ग्लोबल व्यासपीठ का वापरतो ? पक्षाची ध्येयधोरणे कार्यकर्ते आणि जनतेपर्यंत पोहोचवून पक्षाचा जनाधार व्यापक करण्याची मुख्य जबाबदारी असलेले मुखपत्र आपल्याच नेत्यांना जाहीरपणे फैलावर का घेते? त्यातून पक्षाच्या बाबतीत कोणता चांगला संदेश दिला गेला? हे आणि असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. त्याची उत्तरे भाजप आणि त्याच्या नेत्यांना ‘आत्मचिंतन’ करून द्यावीच लागतील.
ज्या गोष्टींवर चार भिंतीआड बसून चर्चा होणे अपेक्षित होते त्याबाबत अशी जाहीर टीकाटिप्पणी होणे हे पक्ष म्हणून भाजपसाठी तोट्याचे आणि या वाद-प्रवादाचा थेट लाभार्थी म्हणून काँग्रेसच्या फायद्याचेच ठरणार आहे. 2014 मध्ये होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीला असा चेहरा घेऊन भाजप सामोरे जाणार असेल तर एनडीएची सत्ता येण्याच्या आणि पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या कोणाच्याही स्वप्नांची पूर्तता होण्याची सुतराम शक्यता नाही. ‘दगडांपेक्षा वीट मऊ’ निवडण्याचा पर्याय देशातील जनतेपुढे नेहमीच खुला राहिलेला आहे, हे भाजप नेत्यांनी नीट ध्यानात घेतले तर भविष्यातील तोटे टाळता येऊ शकतील. अन्यथा ‘हे राम’ म्हणत कपाळावर हात मारण्याशिवाय त्यांना दुसरा पर्यायच उरणार नाही, हे मात्र नक्की!