आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात आणि घसरलेला कारभार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोकण रेल्वेच्या दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला रविवारी झालेला भीषण अपघात हा या रेल्वेमार्गावरील अडचणींची मालिका अजून संपलेली नाही, याचीच साक्ष देतो. रोहा स्थानकाच्या आधी निडी गावाजवळ या रेल्वेगाडीचे इंजिनासह चार डबे घसरून त्या अपघातात 19 ठार व 159 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे. एप्रिल-मे महिन्याचा हंगाम हा शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुटीचा. मुंबई शहरात आजही मोठ्या संख्येने कोकणातील लोक नोकरी-धंद्यासाठी येत असतात. होळी, गणेशोत्सव, उन्हाळ्याच्या सुटीत चाकरमान्यांची पावले कुटुंबकबिल्यासह आपापल्या गावी वळतात. पूर्वी कोकणात जाण्यासाठी एस.टी. किंवा खाजगी वाहन हे परवलीचे साधन असे; पण तो प्रवास खूप जिकिरीचा असे. मात्र कोकण रेल्वे सुरू झाल्यानंतर या प्रदेशाचा प्रवास अधिक सोयीचा झाला. अशाच प्रवासाला रविवारी निघालेल्या प्रवाशांपैकी काही जणांसाठी तो अंतिम प्रवास ठरला. अ. ब. वालावलकर, बॅ. नाथ पै यांनी पाहिलेले कोकण रेल्वेचे स्वप्न मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस यांनी सत्यात आणले. कोकण रेल्वे एकेरी मार्गावरून सुरू होऊन अनेक वर्षे लोटली; पण तिच्यासाठी दुसरा मार्ग बांधण्याचे केंद्र सरकारने अद्यापही मनावर घेतलेले नाही. दिवा-सावंतवाडी पॅसेंजरचा असो वा त्या आधी झालेले अपघात; त्या बिकट स्थितीत एकेरी मार्गामुळे कोकण रेल्वेची सर्व यंत्रणा ठप्प होते, तसेच मदतकार्यही तातडीने सुरू करता येत नाही. पावसाळ्यामध्ये कोकण रेल्वेच्या मार्गावर दरडी कोसळून रेल्वेसेवा बंद पडण्याचे किंवा निवसर रेल्वेमार्ग खचण्याचे प्रकार दरवर्षी नित्यनेमाने होतात. कोकण रेल्वेचे व्यवस्थापन या आपत्तींवर मात करण्याचा प्रयत्न करत असले तरी ते अपुरे आहेत. कोकणातील प्रवाशांनी उदंड प्रतिसाद दिलेल्या कोकण रेल्वेने आपल्या कारभारात आणखी सुधारणा करायला हवी, हे दिवा-सावंतवाडी पॅसेंजरच्या अपघातातून पुन्हा एकदा समोर आले आहे.