आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रांतिकारी राजकारणाचे उत्तराधिकारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


राज्याचे विद्यमान महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे कालकथित कॉम्रेड भाऊसाहेब थोरात यांचे सुपुत्र होत. कालजयी अशी उपमा ज्यांच्या कालकथित होण्याला देता येईल, ते कॉम्रेड भाऊसाहेब थोरात कर्तृत्वाने आणि वयाने मोठे होते. आमच्यासाठी ते वंदनीय होते. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्याच्या चळवळीत ओढले गेले होते. राजकीय जाणीव परिपक्व झाल्यानंतर ते समाजसत्तावादी विचारसरणीचे अभ्यासाअंती पुरस्कर्ते झाले आणि कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली पक्षीय कामात कार्यमग्न झाले. त्यांचे समविचारी सहकारी त्यांच्यासोबत होतेच.

राजकारण-समाजकारणात निखालस समर्पणाच्या भावनेने त्यांनी संगमनेरची उभी पंचक्रोशी गाजवलीच; परंतु नगर जिल्ह्याच्या भूमीला उपरोक्त उद्दिष्टासाठी कर्मभूमी मानली. राजकीय हक्काच्या प्राप्तीसाठी जिल्हा. जिल्ह्याला लागून असलेल्या इतर जिल्ह्यांतील प्रदेशात बोकाळलेल्या सावकारीला पायबंद घालण्यासाठी शेतक-या ची लढाऊ आंदोलने उभी केली. ही आंदोलने लुटुपुटुच्या लढाईची नव्हती. ती जहाल आणि क्रांतिकारी संज्ञेत मोडणारी होती.

क्रांतिकारकांचे हे सैन्य रणांगणात वर्गशत्रूंशी पारतंत्र्याच्या काळातही प्राणाची बाजी लावून लढत होते. कडूपाटील, दत्ता देशमुख, अण्णासाहेब शिंदे, खताळ पाटील... किती रथी-महारथींची नावे घ्यावीत! स्वातंत्र्योत्तर काळातल्या पहिल्या दशकात मात्र पक्षीय शहकाटशहाच्या राजकारणाचा वीट येऊन अखेर भाऊसाहेब थोरात आणि त्यांचे जिवाला जीव देणारे सहकारी सहकाराच्या चळवळीत उतरले. पद्मश्री विखे पाटील, धनंजयराव गाडगीळ, मोठे साहेब यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र स्थापनेनंतर निर्माण झालेल्या सहकारी चळवळीचे अध्वर्यू होते. त्यांचे मार्गदर्शन घेत भाऊसाहेबांनी संगमनेरच्या पंचक्रोशीत आपल्या सहका-या च्या मदतीने स्वबळावर साखर कारखाना उभारून दिव्यत्वाची प्रचिती दिली. ही दिव्यत्वाची ज्योत भाऊसाहेबांच्या पश्चात जळतेच आहे. या ज्योतीचा समुद्र अखेर सूर्यरूपात अलंकृत झाल्याशिवाय राहणार नाही. वडलांचा हा क्रांतिकारक आणि रचनात्मक वारसा घेऊन आणि वडलांच्या अनुभवाचा, कष्टाच्या इतिहासाचा अभ्यास करून आपल्या मतदारांपुरतेच नाही तर उभ्या राज्यात दलित, शोषित वर्गाच्या शेतकरी, भूमिहीन, शेतमजूर, कारूनारू भटक्यांच्या, राष्ट्रीय उद्योग-व्यापा-यांच्या हितासाठी सत्तेत राहून बाळासाहेब कार्य करताहेत. कसल्याही आमिषाला, स्वार्थाला बळी न पडता ते समस्त कष्टकरी, शेतकरी समाजाच्या हितासाठी राबताहेत.

अल्पशा राजकीय कारकीर्दीत बाळासाहेब थोरातांच्या राजकारणाचा झेंडा डौलाने लहरतो आहे, हे ग्रेटच म्हटले पाहिजे. ‘फुल फ्लेज’ मंत्री असून आणि त्यातही महसूल खात्याचे मंत्रिपद स्वत:कडे असतानाही कसलाही बडेजाव नाही, दंभ, गर्व नाही. सर्वसामान्यांसारखे, पोशाखासारखेच चरित्राच्या अर्थानेही स्वच्छ राहण्याचे धाडस. सर्व शासकीय नियमांचा मुलाहिजा ठेवून त्यांचा अडसर वाटला तर त्यासाठी राजकीय, जनहिताचे काम करण्याची मनस्वी पद्धती. कायद्याच्या अडसरावर मार्ग शोधणे, मंत्रिमंडळाचे, घटनेने घालून दिलेले पथ्यपाणी पाळत, जनहितासाठी राबत राहणे. स्वत:भोवतालच्या आप्तेष्टांपेक्षा कष्टकरी-शोषित दलितांसाठी सत्ताधिकार राबवणे, अभ्यासाअंती एखादे काम करता येत नसेल तर त्यांच्याकडे दाद मागायला येणा-या व्यक्तीला स्पष्ट शब्दांत ‘काम करता येणार नाही. त्यात अमुकतमुक अडचणी आहेत’ हे स्पष्टपणे सांगणे. केवळ काम करायचे नाही म्हणून ही सबब ते पुढे करत नाहीत. खरेच अडचण असेल तर शासनांगाच्या आणि संविधानाच्या मर्यादा राखणे, बाळासाहेबांची मंत्री म्हणून काम करण्याची पद्धत, भांडवली लोकशाही सत्ताकारभाराला संवर्धित करणारी अशीच आहे.

कॅबिनेटला हजेरी लावल्यानंतर आणि शासकीय कामकाज पाहिल्यानंतर जिथे आदेश द्यायचे, कारवाया करायच्या त्या केल्यानंतर उर्वरित वेळ आपल्या मतदारसंघासाठी व्यतीत करायचा. सोबत राज्यातल्या विविध प्रदेशांत जाऊन समष्टीच्या हिताचे राजकारण करत राहायचे. यासाठी लागणारी बौद्धिकता, शारीरिक ऊर्जा बाळासाहेबांच्या ठायी सामावलेली आहे ती त्यांच्या वडलांच्या पुण्याईमुळे, हे नव्याने सांगणे नको. सत्तासंविधानाच्या राजकारणात त्यांनी लोकहिताच्या कामांचे डोंगर रचले. 1985मध्ये काँग्रेस पक्षाने तिकीट नाकारले तरीसुद्धा ते मोठ्या मताधिक्याने विधानसभेवर निवडून आले. तेव्हापासून ते आजच्या क्षणापर्यंत त्यांच्या कामाचा आलेख आपण तपासल्यानंतर अचंबित व्हायला होते. बाळासाहेब एवढे कर्तृत्वशाली निघाले ते त्यांच्या वडलांच्या लोकहितवादी राजकारणाच्या त्यांच्यावर झालेल्या संस्कारांमुळे.

भाऊसाहेबांच्या आत्मचरित्राच्या दुस-या भागात म्हणजे अमृतगाथेला आमचे आदरणीय मित्र यशवंतराव गडाखसाहेब यांनी प्रस्तावना लिहून भाऊसाहेबांच्या कर्तृत्वाचा नेमका आलेख जो शब्दबद्ध केलाय, तो मनस्वी म्हटला पाहिजे. भाऊसाहेब हे हाडाचे शेतकरी. शेतीचे सपाटीकरण असो की बांधबंदिस्ती, शेतावर चालवलेले गु-हाळघर असो की पुढे प्रवरेच्या पायाखालून पलीकडच्या शेतात नेलेली पाइपलाइन असो, प्रत्येक ठिकाणी चिवट प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांना करावी लागली. आज सोयीसाधनांची अनुकूलता आणि विपुलता यामुळे या गोष्टी सहजसाध्य वाटतात, परंतु 40-50 वर्षांपूर्वी तशी स्थिती नव्हती. या सर्व प्रयत्नांचे वर्णन भाऊसाहेबांनी अत्यंत बारकाव्याने ‘अमृतगाथा’मध्ये केलेले आहे.

संघर्ष हा भाऊसाहेबांच्या सार्वजनिक जीवनाचा एक अविभाज्य अंग बनून राहिल्याचे आपल्याला ‘अमृतगाथा’ वाचताना पदोपदी जाणवते. हा संघर्ष व्यक्तिगत मोठेपणासाठी कधी त्यांनी केलेला नाही. प्रत्येक संघर्षामागे समाजाचे व्यापक हित हेच मुख्य सूत्र होते. ‘अमृतगाथा’मध्ये जसे त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील त्यांच्या संघर्षमय जीवनाचे चित्रण केले आहे तसेच चित्रण ‘अमृतगाथा’मध्ये स्वातंत्र्योत्तर कालखंडातील संघर्षाचे केलेले आहे. भाऊसाहेबांनी वर्णन केलेला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यक्तिगत सभासत्वाच्या प्रश्नावरील लढा ही बँकेच्या सामुदायिक सार्वभौमत्वाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची घटना होती. समाजाच्या हिताच्या चळवळीसाठी कोणाच्या राजी-नाराजीची भीती न बाळगता संघर्ष करण्याची तयारी हा भाऊसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेगळा पैलू या आंदोलनाची आणि चळवळीची माहिती ‘अमृतगाथा’ वाचताना आपल्यामुढे येतो. अलीकडेच त्यांनी ‘शेतीस मोफत वीज मिळाली पाहिजे’ या मागणीसाठी नगरला आयोजित केलेला कार्यकर्त्यांचा मेळावा आणि काढलेला मोर्चा त्यांच्या संघर्षयुक्त जीवनाशी सुसंगतच आहे.

‘अमृतगाथा’ वाचताना भाऊसाहेबांच्या करारीपणाचा, स्वाभिमानाचा आणि स्पष्टवक्तेपणाचाही प्रत्यय हरघडी येतो. शेतक-यांना ‘चोर’ म्हणणा-या पाटबंधारे खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांच्या जिल्हाधिका-या च्या कार्यालयात जिल्हाधिका-या समोर त्यांनी परखड शब्दांत केलेल्या कानउघाडणीचा प्रसंग वाचकांना भाऊसाहेबांच्या या गुणांचा प्रत्यय देतो. सुपरवायझिंग युनियनच्या अध्यक्षपदाच्या निवडप्रसंगी आपल्या अनेक सहका-यांची नाराजी ओढवून घेऊन नारायणराव उंबरकरांना दिलेला शब्द पाळण्यास भाऊसाहेबांनी दिलेले महत्त्व हा आजकाल क्षणाक्षणाला शब्द फिरवणा-या राजकारणी मंडळींना निश्चित अंतर्मुख करायला लावणारा प्रसंग आहे. पुलोद स्थापनेच्या वेळी ‘प्रतिगामी जनता पक्षाबरोबर हातमिळवणी करून सरकार बनवणे ही राजकीयदृष्ट्या हाराकिरी आहे, मी त्या प्रयत्नांत तुमच्याबरोबर नाही’, असे ठणकावून सांगणा-या भाऊसाहेबांचा बाणेदारपणा क्रांतिकारकाचाच म्हटला पाहिजे! वडलांच्या कालकथित होण्यानंतर, वडलांचा हाच बाणेदारपणा सत्ताराजकारणात कार्यरत असताना बाळासाहेब थोरात जपताना दिसताहेत.