आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींच्या शिक्षणहक्काची क्रांतिदूत : मलाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मलालाचा जन्म 12 जुलै 1997 रोजी पाकिस्तानातील धोकादायक स्वात व्हॅलीतील मिंगोरा या खेड्यात झाला. तिथेच ती आईवडील व दोन छोट्या भावंडांसोबत राहत होती. वडील झियाउद्दीन युसूफजाई एक प्रतिभावंत कवी व सक्रिय शैक्षणिक कार्यकर्ते आहेत. ते शाळा चालवतात. मलालामध्ये जन्मत:च काही अंगभूत गुण आहेत याची त्यांना खात्री पटली होती. मोठेपणी डॉक्टर व्हावे, असे मलालाचे स्वप्न होते; परंतु तिने उत्तम समाजसेवक राजकारणी बनून बिघडत चाललेल्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणावे, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. आणि हे कार्य मलाला निश्चितपणे पार पाडू शकेल, असा त्यांना विश्वास होता. ते स्वत: मलालाबरोबर तालिबान्यांनी निर्माण केलेल्या परिस्थितीविषयी सतत चर्चा करीत असत.तालिबान्यांनी स्वात व्हॅलीवर ताबा मिळवून तेथे टेलिव्हिजन, संगीत, मुलींचे शिक्षण व मुली व स्त्रियांनी खरदेसाठी घराबाहेर पडण्यावर बंदी घातली. मुली ज्या शाळेत शिकत त्या इमारतीसुद्धा उद्ध्वस्त केल्या. स्वात प्रांतातील सामान्य जनांच्या मनात भीती निर्माण व्हावी म्हणून रात्रभर तोफांचा गडगडाट ते करीत. त्यांच्या या कृत्यामुळे जनतेच्या मनात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. या बिघडलेल्या परिस्थितीचे आकलन सर्वांना व्हावे यासाठी मलाला ब्लॉगवर सतत लिहू लागली. सुरक्षेच्या दृष्टीने तिला ‘गुल मकाई’ या नावाने संबोधण्यात येऊ लागले व तिच्या डायरीतील पाने वेबसाइटवर पाठवत राहिली.


स्वात व्हॅलीतील शाळा बंद पाडल्यामुळे शिक्षणाचा हक्क आपल्यापासून हिरावून घेतला जात आहे या जाणिवेमुळे तिच्या मनामध्ये दडलेली अग्निशिखा जागृत होत गेली. त्यातच तिच्या जिवलग मैत्रिणी भयग्रस्त होऊन स्वात प्रांत सोडून त्यांच्या कुटुंबीयांसमवेत लाहोर, पेशावर, रावळपिंडी इत्यादी ठिकाणी निघून गेल्यात. केवळ निर्भय मलाला सतत मुलींचे शिक्षण व इतर हक्कांबाबत वेबसाइटवर आपल्या डायरीतील पाने ब्लॉगवर पाठवत राहिली. तालिबान्यांच्या गैरकृत्यांचा निषेध वाढू लागल्यामुळे तालिबान्यांनी एक फतवा काढून चालू शैक्षणिक सत्र पूर्ण करण्याची मुभा पण काही अटीसह दिली. मुली व स्त्रियांनी घराबाहेर पडताना बुरखा घालूनच घराबाहेर पडावे. झियाउद्दीन युसूफजाई यांनी स्वात प्रांतातील चिघळत चाललेल्या परिस्थितीचा निषेध नोंदवल्यानंतर त्यांनाही जिवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्यात. मलालाचे लिखाण वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध होऊ लागले. टेलिव्हिजनवर ती दिसू लागली. ब्लॉगवर मुलींच्या शिक्षणाबाबत लिहिणारी ‘गुल मकाई’ म्हणजेच मलाला युसूफजाई याची ओळख पटली.


मलालाच्या आग्रही मागणीमुळे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी राष्ट्रीय पातळीवर आयटी कॅम्पस इन द स्वात डिग्री कॉलेज फॉर वुमन व मलालाच्या नावाने सेकंडरी स्कूल फॉर वुमनची स्थापना केली. याशिवाय ‘मलाला एज्युकेशन फाउंडेशन’ निर्माण करून गरीब मुलींच्या शिक्षणाची सोय करण्यात आली. मलालाच्या वाढत्या प्रसिद्धीमुळे तिच्यापुढे जास्त संकटे उभी राहिली. तिला ठार मारण्याच्या धमक्या वारंवार येऊ लागल्या. 9 ऑक्टोबर 2012 मलालाच्या आयुष्यातील काळा दिवस. परीक्षेचा पेपर संपवून मलाला मैत्रिणींसोबत स्कूल बसमधून घरी निघाली होती. वाटेतच एक बंदूकधारी अतिरेकी बसमध्ये चढला. मुलींमध्ये मलाला कोण आहे, असे दरडावून त्यानं विचारले, अन्यथा सर्वच मुलींना ठार करण्यात येईल, असे त्याने धमकावले. मलालाची ओळख पटल्यावर त्याने तिच्यावर बंदुकीतून गोळी झाडली. गोळी डोक्यावरून, मानेला स्पर्श करून खांद्यामध्ये घुसली.


गोळी लागल्यामुळे मलालाला त्वरित पेशावरच्या सैनिकी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या चमूने सतत तीन तास ऑपरेशन करून खांद्यामध्ये घुसलेली गोळी बाहेर काढली. त्यानंतर तिला रावळपिंडीतील रुग्णालयात व पुढे सर्वोत्तम उपचारांसाठी इंग्लंडमधील बर्मिंगहममधील ‘क्वीन एलिझाबेथ रुग्णालयात’ पाठवण्यात आले. तिच्या उपचारांचा सर्व खर्च सरकारी निधीतून करण्यात आला. तिच्या मेंदूला इजा न पोहोचता किंवा कोणतीही शारीरिक त्रुटी न राहता ती पूर्वीसारखी सक्षम बनावी म्हणून तिच्यावर पुन्हा पाच तासांची एक शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांच्या पराकाष्ठेच्या प्रयत्नांमुळे मलाला शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम झाली. तालिबान्यांच्या एका दहशतवादी गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली व समर्थनही केले. मलालावर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा वर्षाव झाला. संपूर्ण जगातील 100 मान्यवर व्यक्तींमध्ये तिच्या नावाचा समावेश करण्यात आला. मलालाच्या कार्याची दखल युनोनेसुद्धा घेतली व तिने अंगीकारलेले कार्य पुढे नेण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ कटिबद्ध राहील, असा निर्वाळा दिला. अशा या सोळावर्षीय शूर युवतीला 6 सप्टेंबर 2013 रोजी आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार 2011चे शांततेचे नोबेल पुरस्कार विजेते तवाकूल कारमान यांच्या हस्ते, डच किड्स राइट फाउंडेशनतर्फे देण्यात येणार आहे. आपण सर्व तिचे मन:पूर्वक अभिनंदन करूया.