आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीर पंजाल बोगदा : अभियांत्रिकी आश्चर्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जम्मू आणि बारामुल्लादरम्यानच्या महत्त्वाकांक्षी काश्मीर रेल्वे प्रकल्पातील एक आव्हानात्मक टप्पा नुकताच यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे. या मार्गावरील पीर पंजाल पर्वतरांगेमधून जाणारा आशियातील दुस-या क्रमांकाचा बोगदा 26 डिसेंबर 2012 रोजी खुला होऊन त्यातून रेल्वेगाडीचे प्रायोगिक परिचालनही करण्यात आले आहे. कटरा-काझीगुंडदरम्यानच्या पीर पंजाल बोगद्यातून धावलेली रेल्वेगाडी हा भारतीय अभियांत्रिकीच्या इतिहासातील सुवर्णक्षण ठरला आहे. येत्या काही महिन्यांमध्ये या बोगद्यातून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू होणार आहे. काश्मीर खो-या ला लोहमार्गाने संपूर्ण देशाशी जोडणारा हा बोगदा अतिशय महत्त्वाचा दुवा ठरला आहे.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात या प्रकल्पाला राष्‍ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले होते. हिमालयाच्या रांगा ओलांडून काश्मीर खो-या त लोहमार्गाचा विस्तार करणारा हा प्रकल्पच भारतीय अभियंत्यांसाठी एक आव्हान ठरला आहे. हिमालयाचा एक भाग असलेली पीर पंजाल रांगेची उंची समुद्रसपाटीपासून 2900 मीटर असून त्यातूनच गेलेला रेल्वेचा बोगदा देशातील सर्वात मोठा बोगदा ठरला आहे. जम्मू-श्रीनगर राष्‍ट्रीय महामार्गावरील जवाहर बोगद्याच्या खाली 440 मीटरवर रेल्वेसाठी स्वतंत्र बोगदा खोदण्यात आला आहे. मात्र, जवाहर बोगदा 2.75 किलोमीटर लांबीचा आहे, तर लोहमार्गासाठीचा बोगदा 11.215 किलोमीटर लांबीचा आहे. हाच रेल्वेचा बोगदा आशियातील दुस-या क्रमांकाचा लांब बोगदा ठरला आहे. या रेल्वेच्या बोगद्याचे आरेखन करताना अत्याधुनिक साधनांची मदत घेण्यात आली होती. तसेच उपग्रहाकडून मिळालेली माहिती, प्रत्यक्ष सर्वेक्षणातून मिळालेली माहिती आणि भूकंपाबाबतच्या नोंदींचाही या वेळी बारकाईने अभ्यास करण्यात आला होता. बोगदा जाणार असलेल्या ठिकाणचे खडकाचे नमुने गोळा करून त्यांचा अभ्यास करण्यात आला होता.

इंडियन रेल्वे कन्स्ट्रक्शन कंपनी लि. ने या बोगद्याचे खोदकाम करण्यासाठी न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथडचा उपयोग केला आहे. या पद्धतीत खोदकाम करताना बोगद्याच्या भोवतीच्या खडकाचा वापर करून संपूर्ण बोगद्याला आधार दिला जातो आणि त्याच वेळी संपूर्ण बोगद्याला स्थिरताही दिली जाते. या बोगद्यात लोहमार्गासाठीही वेगळ्या तंत्राचा वापर करण्यात आला आहे. त्यानुसार बोगद्यातील लोहमार्गाखाली कुशनिंगसाठी नेहमीप्रमाणे खडीचा वापर करण्यात आलेला नाही. त्याऐवजी काँक्रीटचे कुशनिंग केल्यामुळे गाडी जात असताना आरामदायक प्रवास अनुभवता येणार आहे. याचा उपयोग गाडीचा वेग कायम राखण्यासाठीही होणार आहे. रेल्वे बोगद्याची लांबी अधिक असली तरी या मार्गावरून ताशी 100 किलोमीटर वेगाने गाडी धावणार असल्याने ती सात मिनिटांमध्ये हा बोगदा पार करू शकेल.
समुद्रसपाटीपासून सुमारे 1760 मीटर उंचीवर खोदण्यात आलेल्या पीर पंजाल बोगद्याच्या बांधणीत साडेसात हजार टन पोलाद, तीन लाख 28 हजार क्युबिक मीटर काँक्रीटचा वापर करण्यात आला आहे. एकेरी लोहमार्गाचा हा बोगदा 7.39 मीटर उंच आणि 8.40 मीटर रुंद आहे.

भविष्यात या मार्गाचे विद्युतीकरण होण्याची शक्यता विचारात घेऊनच बोगद्याची ही उंची ठरवण्यात आली आहे. याच्या आतील लोहमार्गाची देखभाल करणे तसेच आणीबाणीच्या काळात मदत पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरणारा 3 मीटर रुंदीचा रस्ताही बोगद्यात तयार करण्यात आला आहे. देशातील अभियांत्रिकी कौशल्याचा एक उत्तम नमुना ठरलेल्या या बोगद्यात आगीसारख्या दुर्घटनेच्या वेळी उपयोगी पडणारी यंत्रणाही कार्यरत ठेवण्यात आली आहे. संपूर्ण वॉटरप्रूफिंग करण्यात आल्याने बोगद्यात पाणी न झिरपता स्वतंत्र वाटेवरूनच खाली जाईल. सध्या या बोगद्यातून डिझेल ट्रक्शनवरच वाहतूक होणार आहे. त्यामुळे डिझेल इंजिनाचा धूर बोगद्यात साठून प्रवाशांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी व्हेंटिलेशनची खास सोय करण्यात आली आहे. हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगरदरम्यानचा महामार्ग वाहतुकीसाठी बराच काळ बंद असतो. मात्र या दोन शहरांदरम्यान रेल्वे वाहतूक सुरू झाल्यावर लोकांना एक स्वस्त, खात्रीलायक आणि वेगवान पर्याय उपलब्ध होणार आहे. या नव्या बोगद्याने (बोगदा क्र. 80) पीर पंजालच्या दोन्ही बाजूंला वसलेल्या काझीगुंड आणि बनिहालदरम्यानचे अंतर निम्म्याने कमी होऊन 17.5 किलोमीटर झाले आहे.

काश्मीर रेल्वे प्रकल्पातील आणखी एक आव्हानात्मक प्रकल्प ठरलेल्या चिनाब नदीवरील पुलाचेही काम सध्या वेगाने सुरू आहे. हा जगातील सर्वात उंच कमानी पूल असून त्याची उभारणी कोकण रेल्वे महामंडळाद्वारे करण्यात येत आहे. या पुलाची लांबी 1,315 मीटर असेल. मुख्य भागाला लागून असलेल्या 650 मीटरच्या व्हायाडक्टचाही समावेश आहे. पुलाची मुख्य कमान 480 मीटर लांबीची असेल आणि तिची उंची नदीच्या पात्रापासून 359 मीटर वर असणार आहे. या पुलाच्या एका बाजूला बक्कल आणि दुस-या बाजूला कौरी ही गावे वसलेली आहेत. याचे काम 2015 मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. काश्मीर प्रामुख्याने क्रमांक पाचचा भूकंपप्रवण विभाग आहे. या प्रदेशात भूभागाच्या अंतर्गत भागात सतत होणा-या हालचाली लक्षात घेऊन पीर पंजाल बोगदा आणि चिनाब नदीवरील पूल उभारताना विशेष काळजी घेण्यात आली आहे.