आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लष्कराच्या कामगिरीचा लेखाजोखा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंडमध्ये नुकत्याच आलेल्या महाप्रलयामुळे तेथे अडकलेल्या नागरिकांना तातडीने मदत पोहोचवून त्यांची सुटका करण्यासाठी भारतीय लष्कराने आजवरचे सर्वांत मोठे बचावकार्य राबवले. त्याद्वारे एक लाखाच्या वर नागरिकांची विविध भागांमधून सुखरूप सुटका करण्यात लष्कराला यश आले. संरक्षण मंत्रालयाद्वारे प्रकाशित होणा-या ‘सैनिक समाचार’ या पाक्षिकाच्या ताज्या विशेषांकात लष्कराच्या या अद्भुत कामगिरीविषयी सचित्र माहिती देण्यात आली आहे. लष्कराच्या या कामगिरीची दखल आंतरराष्‍ट्रीय पातळीवरही घेण्यात आली होती. उत्तराखंडवर 16 जून रोजी कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे हाहाकार माजला होता. ढगफुटीनंतर दरडी कोसळल्या, इमारती जमीनदोस्त झाल्या, पूल, रस्ते वाहून गेले आणि अनेक जण केदारनाथ, बद्रिनाथ, गौरीकुंड आदी भागांमध्ये अडकून पडले होते. या सर्व परिसराचा देशाशी संपर्क तुटला होता. निसर्गाच्या या रुद्रावतारामुळे अनेक ठिकाणी आठ-आठ दिवासांनंतरही अन्न-पाणी उपलब्ध नव्हते आणि वीजपुरवठा, दूरध्वनी सेवाही ठप्प होती. मात्र या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भारतीय जवानांनी तहानभूक विसरून बहुतांश भागात पीडितांपर्यंत मदत पोहोचवली. त्या सर्व परिसरात अडकून पडलेल्या नागरिकांची भूदल, हवाईदल आणि भारत तिबेट सीमा पोलिसांनी सुटका करण्यास सुरुवात केली. लष्कराच्या या संपूर्ण कामगिरीचा सचित्र आढावा सैनिक समाचारच्या 1 ते 15 जुलैच्या अंकात घेण्यात आला आहे.


भूदलाच्या मध्य विभागाचे प्रमुख आणि उत्तराखंडातील संपूर्ण बचाव मोहिमेचे समन्वयक असलेले लेफ्टनंट जनरल अनिल चैत यांचीही खास मुलाखत या अंकात प्रकाशित करण्यात आली आहे. त्यात त्यांनी या शोध व बचाव मोहिमेविषयी सविस्तर माहिती दिली. उत्तराखंडात मदत आणि बचावकार्य राबवण्यासाठी भूदल आणि हवाईदलाने अनुक्रमे ऑपरेशन ‘सूर्य होप’आणि ‘ऑपरेशन राहत’ या मोहिमा आखल्या आणि त्यानुसार अतिशय नियोजनपूर्वक आणि शिस्तबद्ध रीतीने प्रत्येक पाऊल टाकण्यात आले. त्यामुळे संपूर्ण मोहिमेत कोणत्याही प्रकारे संभ्रम निर्माण न होता समन्वय राखण्यास हातभार लागला, असेही लेफ्टनंट जनरल चैत यांनी म्हटले आहे.


डोंगराळ भागात अडकलेल्यांना हेलिकॉप्टरद्वारे लष्कराने उभारलेल्या विविध शिबिरांमध्ये आणण्याचे काम अहोरात्र सुरू होते. त्या शिबिरांमध्ये नागरिकांना अन्न-पाण्याची आणि वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आली होती. याचीही सचित्र माहिती अंकात देण्यात आली आहे. हवाईदलाने एकाच दिवसात 3100 जणांची सुटका केली होती, जी एक ऐतिहासिक कामगिरी ठरली होती. भूदलाच्या पॅराट्रपर्सनी हेलिकॉप्टरमधून दूरवरच्या प्रदेशात बचावकार्य सुरू केले. भूदल आणि हवाईदलाची साठ एम.आय.-17, एम.आय.-26, ध्रुव हेलिकॉप्टर मदतकार्यात गुंतली होती. अनेक खासगी हेलिकॉप्टरचीही मदत या वेळी घेण्यात आली होती. केदारनाथ-बद्रिनाथच्या दुर्गम प्रदेशात सर्वांना तातडीने मदत पोहोचवणे आवश्यक होते. त्यातच हवामान खात्याने पुन्हा जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केल्यामुळे विविध ठिकाणी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत अडकलेल्यांना ताबडतोब सुरक्षित स्थळी आणणे आवश्यक होते. त्यासाठी जगातील सर्वांत मोठे हेलिकॉप्टर अशी ओळख असलेल्या हवाईदलाच्या एमआय-26 हेलिकॉप्टर आणि सी-130 जे सुपर हर्क्युलीसह या मालवाहू विमानांचा वापर सुरू करण्यात आला.


एकीकडे बचावकार्य जोमाने सुरू असताना सीमा रस्ते संघटनेने रस्त्यांची युद्धपातळीवर डागडुजी सुरू केली होती. यामुळे दुर्गम भागाशी लवकरात लवकर संपर्क स्थापन करण्यास मदत झाली. बचावकार्यासाठी मोठ्या प्रमाणात हेलिकॉप्टरच्या फे-या होऊ लागल्यावर त्यांच्यासाठी इंधनाची कमतरता भासू लागली होती. त्यामुळे हवाईदलाने एक धाडसी पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. इंधन आणि अन्य आवश्यक साहित्यासह दिल्लीजवळील हिंडन तळावरून निघालेली तीनैसी-130 जे सुपर हर्क्युलीसह विमाने उत्तरकाशीजवळच्या धारासू येथील अतिशय छोट्या धावपट्टीवर एकापाठोपाठ एक उतरवण्यात आली. डोंगराळ भागात वसलेल्या या छोट्या धावपट्टीवर हवामान फारसे अनुकूल नसताना हवाईदलाने ही विमाने उतरवून पार पाडलेल्या या कामगिरीची सर्वत्र दखल घेण्यात आली आहे. यादरम्यानच झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावलेल्या जवानांप्रती राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केलेला शोकही या अंकात प्रकाशित करण्यात आला आहे.
संरक्षण मंत्रालयाद्वारे प्रकाशित होणारे ‘सैनिक समाचार’ हे पाक्षिक दोन जानेवारी 1909 पासून प्रकाशित होत आहे. स्वातंत्र्यानंतर त्याचे नामकरण सैनिक समाचार असे झाले आणि आता इंग्रजीबरोबरच 12 भारतीय भाषांमधून हे पाक्षिक रूपात एकाच वेळी प्रकाशित होत आहे.