आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएमओ कार्यालयात संशयाचा धूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुढील आठवड्यात नरेंद्र मोदी सरकार आपले १०० दिवस पुरे करत असतानाच गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याविरोधात पक्षातीलच काही नेत्यांनी सुरू केलेली कुजबुज आघाडी
प्रत्यक्षात मीडियाच्या दारात येणे हे सरकारच्या प्रतिमेला शोभेसे असे नाही. त्याहूनही गंभीर बाब अशी की, देशात महागाई, दंगली, महिलांवरील अत्याचाराच्या घटना, पाकिस्तानकडून सातत्याने होणारा गोळीबार यासारख्या गंभीर समस्या असताना त्याविषयी पंतप्रधान कार्यालयाने ‘ब्र’सुद्धा काढलेला नाही, पण राजनाथसिंह यांच्या पाठीमागे आम्ही आहोत, असे स्पष्टीकरण तत्परतेने द्यावे लागले. याचा अर्थ असा की, या प्रकरणातील संशयाची सुई आपल्यावर येऊ नये म्हणून पंतप्रधान कार्यालयाला हा निर्णय घ्यावा लागला. वास्तविक मोदींनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नवे कॅबिनेट, आपल्या मर्जीतल्या आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती, अमित शहांची भाजपच्या अध्यक्षपदी केलेली निवड, अडवाणी-मुरली मनोहर जोशींना बाजूला सारून एकाच वेळी प्रशासन व पक्ष यांच्यावर अंकुश प्रस्थापित केला होता. यामुळे मोदींची प्रतिमा अधिक शिस्तबद्ध, कठोर, कणखर अशी तयार झाली होती. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान कार्यालयाने गृहखात्याची रचना बदलून राजनाथसिंह यांना शह दिल्याने वादळ उठले होते. हे वादळ शमते ना शमते तोच बुधवारी मुलावर लाचेच्या आरोपामुळे राजनाथसिंह यांनी व्यथित होऊन थेट राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय मीडियापुढे प्रकट करणे यावरून हे प्रकरण वर िदसते तेवढे सरळ नाही. त्यामुळे काँग्रेसने पंतप्रधान कार्यालयाने नेमके काय घडले आहे हे लोकांना सांगावे, ही िदलेली प्रतिक्रिया चातुर्याची आहे.
कारण काँग्रेसची सत्ता असताना पंतप्रधान कार्यालयातून बातम्या पसरवल्या जात होत्या. नितीन गडकरी यांच्या घरात संभाषण मुद्रित करणारी उपकरणे आढळल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. पण अशा कुजबुज आघाडीतून एकमेकांवर संशय व शह-कटशहाचे राजकारण केल्याने अंतिमत: सरकारची प्रतिमा मलिन होत आहे, हे भाजप व संघ परिवाराने समजून घेतले पाहिजे.