आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कविवर्यांची ग्रेसफुल भेट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाण्यातल्या येऊरसारख्या निसर्गरम्य ठिकाणी एका सायंकाळी कविवर्य ग्रेस यांच्यासोबत गप्पा आणि भोजन अशा कार्यक्रमासाठी निवडक साहित्यिकांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यात आम्ही दोघे होतो. निरंजन ग्रेसना अनेकदा भेटले होते. नागपूरच्या त्यांच्या घरी केव्हाही येण्याचे अगत्याचे दुर्मिळ निमंत्रण निरंजनना होते. माझ्यासाठी मात्र पाठ्यपुस्तकात अभ्यासलेल्या एवढ्या मोठ्या कवीला भेटण्याचा तो पहिलाच प्रसंग होता. आम्ही दोन-अडीच तास एकमेकांसमोर होतो. पण त्यांनी एकदाही माझ्याकडे चुकूनही पाहिले नाही. माझी तशी अपेक्षाही नव्हती. मी तेव्हा कविता लिहिणारी म्हणून कोणाला फारशी माहीतही नव्हते.


कवी ग्रेस आत्ममग्न होऊन अखंड बोलत होते. मराठी, हिंदी, इंग्रजी असे भाषांचे पाट बेमालूमपणे बदलत त्यांचा शब्दप्रवाह अविरत वाहत होता. आम्ही सगळे दिङ्मूढ होऊन भारावलेल्या अवस्थेत ऐकत होतो. जेवणानंतर सगळे जायला निघाले. आम्हीही ग्रेसना नमस्कार करून आमच्या गाडीकडे निघालो. त्यांनी निरंजनना हाक मारून थांबवले. पण त्यांना निरंजनशी नाही, तर माझ्याशी बोलायचे होते. प्रथमच त्यांनी माझी दखल घेतली होती. तेव्हा थेट माझ्या डोळ्यात रोखून पाहत त्यांनी मला म्हटलं, ‘मुठीत आलेली चिमणी कधीच सोडायची नाही बरं का, समोर कितीही मोठ्ठा वाघ आला तरीही नाही!’


एवढे बोलून ते जायला वळलेसुद्धा. मी जमिनीला खिळल्यासारखी उभी. ग्रेस माझ्याशी बोलले हाच माझ्यासाठी आश्चर्याचा एक फार मोठा धक्का होता! मी गोंधळून गेले होते. त्यामुळे ते काय बोलले याचा मला अजिबात अर्थबोध झाला नाही. मी निरंजनना विचारलं, ‘काय म्हणाले ते?’ निरंजन म्हणाले, ‘त्यांनी ललितमध्ये आलेल्या तुझ्या कवितेवर अभिप्राय दिलाय!’ ज्या कवितेविषयी कविवर्य ग्रेस यांनी अभिप्राय दिला ती कविता होती माझ्या काव्यनिर्मिती प्रक्रियेविषयीची. ती कविता अशी होती -
बंद खिडकीतून आत येण्यासाठी
चिमणीनं टकटक करावं
तशी दर प्रवासात
माझ्या मनाच्या खिडकीवर
कविता टकटक करते
जिवलग मैत्रिणीच्या ओढीनं मीही सामोरी जाते
मनाची सात कवाडं उघडून तिला आत घेते
तिच्या स्वागतानिमित्त मला खूप काही बोलायचं असतं
पण खुंट्याला बांधलेल्या शब्दांचं दावं सुटत नाही
माझ्या आत आत पडत जाणारा पीळ
जीवघेणा घट्टावत जातो पण तुटत नाही
मग तीच पुढे होते
रेशमाचे पेड अलगद सोडवावेत
तसे ते पीळ सोडवते
काही क्षणांची तिची भेट
माझी ओटी भरून जाते
पुढच्या प्रवासातल्या नव्या वाणासाठी
मी पुन्हा तिची वाट पाहते
कवी ग्रेस यांच्या कवितेत अनेकदा चिमणी डोकावताना दिसते, हे नंतर लक्षात आले. ‘मुठीत आलेली चिमणी कधीच सोडायची नाही बरं का, समोर कितीही मोठ्ठा वाघ आला तरीही नाही!’ ग्रेस बजावून गेले. त्यानंतर काही दिवसांनी अकल्पितपणे काळ नावाचा एक मोठ्ठा वाघ आला आणि होत्याचे नव्हते करून गेला. निरंजन गेल्यानंतर माझा फोन नंबर मिळवून त्यांनी माझी विचारपूस केली. म्हणाले, ‘तुम्हाला आठवतं का, मी येऊरला तुमच्याशी काय बोललो होतो ते?’ मी म्हटलं, ‘हो सर.’ ग्रेस आठवणीचे फार पक्के होते. त्यांनी पुन्हा तेच वाक्य कानामात्रेचा फरक न करता उच्चारलं, ‘मुठीत आलेली चिमणी कधीच सोडायची नाही बरं का, समोर कितीही मोठ्ठा वाघ आला तरीही नाही!’ कवी द्रष्टा असतो म्हणतात. ते खरे असावे. ग्रेस द्रष्टे होते की भविष्यवेत्ते, ठाऊक नाही!


मुंबई साहित्य संघाच्या ‘साहित्य’ या दिवाळी अंकाचे (2010) संपादन करताना मी त्यांना कविता पाठवण्याची विनंती फोनवरून मोठे धैर्य उराशी बाळगून केली. त्यांनी परखडपणे सांगितले, ‘मी ठरावीक अंकांनाच कविता देतो.’ मी अर्थातच आशा सोडून दिली. पण लगेचच त्यांच्या सुरेख हस्ताक्षरातले पत्र आणि एक नाही, दोन नाही, तीन कविता त्यांनी मला पाठवल्या. खाली झोकदार सही होती त्यांची! माझा आनंद गगनात मावेना! त्या कविता मी स्कॅन करून ‘साहित्य’च्या दिवाळी अंकात छापल्या. त्यांचे हस्ताक्षर हा आज मौलिक ठेवा त्या रूपाने जतन करता आला. मुंबई साहित्य संघाने ‘एका पिढीचे आत्मकथन’ या ग्रंथानंतर साहित्यिकांच्या ‘दुसºया पिढीचे आत्मकथन’ हा ग्रंथ संपादित करायला घेतला, तेव्हा त्यांच्याशी संपर्क साधण्याची कामगिरी माझ्यावर होती. मी फोनवर कविवर्यांशी संपर्क साधला. ‘शुद्धलेखनाची जबाबदारी तुम्ही घेणार असाल तरच...’ या अटीवर त्यांनी लेख देण्याची तयारी दर्शवली. लहान लहान दुरुस्त्या होत्या. त्या फोनवरून ते मला सांगू शकले असते. एखाद्या आज्ञाधारक विद्यार्थिनीसारख्या मी त्या लिहून घेतल्या असत्या. पण नाही! स्वत:चे समाधान होईपर्यंत ते स्वस्थ बसले नाहीत. चौथ्या वेळी त्यांनी ‘आता छापा, पण शुद्धलेखन मात्र तुम्ही स्वत:च अवश्य बघा’ असे निक्षून सांगितले. दुर्दैवाने शुद्धलेखनाची जबाबदारी माझ्यापर्यंत आली नाही. त्यामुळे मला दिलगिरी व्यक्त करण्याखेरीज काहीच करता आले नाही. त्यांनीही ते समजून घेतले. त्या ग्रंथाची प्रत देण्यासाठी मी दादरला झालेल्या एका कार्यक्रमानंतर त्यांना भेटायला पुढे गेले, तेव्हा गर्दीत ते मला इतक्या वर्षांनी ओळखणार नाहीत म्हणून मी नमस्कार करून माझं नाव सांगितलं, तर ते म्हणाले, ‘अहो, लक्षात आहे माझ्या.’ आणि त्यांच्यासाठीच जमलेल्या गर्दीला हटवत माझ्याकडे येत ते माझ्या पाया पडण्याच्या बेतात असतानाच मी अवाक् झाले! पटकन मागे सरकत मी त्यांना म्हटलं, ‘सर, आम्ही आपल्या पाया पडायचं...’ तर ते म्हणाले, ‘मी स्त्रीचा आदर करतो. म्हणूनच माझ्या मुलीच्याही मी पाया पडतो.’


कविवर्यांचे अधूनमधून फोन येत. त्यांच्याशी काय बोलायचे, हा प्रश्न मला नेहमीच पडे आणि मी बावरून जात असे. अलीकडेच एकदा एका कवयित्रीने त्यांची कविता थोडी फेरफार करून स्वत:च्या नावावर प्रसिद्ध केली होती. ती त्यांच्या वाचनात आल्यावर त्यांनी तिला फोन केला. तर तिने फोनवर अतिशय उद्धटपणे दुरुत्तर केल्याचे त्यांना जे दु:ख झाले, जो संताप आला, जे काही वाटले ते ज्या मोजक्या लोकांजवळ त्यांनी व्यक्त केले त्यात एक मीही होते. ग्रेस पुण्यात अ‍ॅडमिट असल्याचे कळले, पण एकटीने भेटायला जाण्याचा संकोच वाटला. मी मनाशी पुण्याला जाऊन त्यांना भेटण्याचे निश्चित करत त्यांना ‘लवकरच नक्की येईन’ म्हणाले खरी; पण नांदेडहून परतीच्या प्रवासात असताना मला ‘प्रतिक्रिया’ विचारायला म्हणून एका वर्तमानपत्राकडून फोन आला तर ग्रेस सांध्यपर्वाच्या प्रवासाला गेल्याचे ऐकून मी अवाक्च झाले. प्रत्यक्षात पहिल्या भेटीत त्यांनी मला माझ्या कवितेविषयी दिलेली प्रतिक्रिया ऐकून झाले होते तशी.