आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political Anylist Ramesh Patange Editorial Article About RSS Politics

संघाला ‘त्याची’ गरज नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संघाला मान्यता त्याच्या त्याग, तपस्या, समर्पण, अविरत कष्ट, साधी राहणी, श्रेष्ठ चारित्र्य या दैवी गुणांमुळे मिळणार आहे. कोणाची पालखी घेतल्याने नव्हे. हे सगळे महापुरुष महान आहेत. देशासाठी त्यांनी केलेल्या त्यागाला सीमा नाही, परंतु ते यच्चयावत भारतीयांना श्रद्धेय आहेत, वंदनीय आहेत, असे म्हणता येत नाही.

कॉ. भीमराव बनसोड यांचा "संघाला आंबेडकरांचा उमाळा' हा लेख खास कॉम्रेड शैलीतला आहे. म्हणजे एकापाठोपाठ एकेक भन्नाट आरोप करत जायचे, ते खरे आहेत की खोटे, याची चिकित्सा करायची नाही. संदर्भ द्यायचे नाहीत आणि हे सर्व आरोप स्वयंसिद्ध सत्य आहेत, अशा भूमिकेतून मांडायचे. "आरएसएस संचालित भाजपसह त्यांचा संपूर्ण परिवार हा आंबेडकरलिखित राज्यघटनेचा विरोधकच आहे. घटनेचे प्रारूप तयार होताना महिलांना हक्क देणाऱ्या हिंदू कोड बिलावरून या परिवाराच्या संघटनांनी जाहीरपणे विरोध केला होता. या कारणावरून आंबेडकरांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. राज्यघटना या परिवाराचा आदर्श ग्रंथ नसून चातुर्वर्ण्याचा पुरस्कार करणारी भगवद््गीता राष्ट्रग्रंथ करायचा विचार त्यांनी बोलून दाखविला आहे...' कॉम्रेड मंडळी आम्हा संघवाल्यांपेक्षा अधिक अभ्यासू असतात. (असा माझा समज होता.) पण त्याला जबरदस्त धक्का बसला. भगवद््गीता हा राज्य चालविण्याचा ग्रंथ नाही. भगवद्गीतेत बजेट कसे मांडावे, कर कसे आकारावेत, जनकल्याणाच्या योजना कशा आखाव्यात, व्यक्तीचे मौलिक अधिकार कोणते, राज्य आणि केंद्र यांचे संबंध कसे असावेत याविषयी शून्य शब्द आहेत. म्हणून घटनेऐवजी भगवद्गीता हे लोकांना उल्लू बनविण्यासाठी ठीक आहे. बनसोड यांच्या या व्यवसायाविषयी मला काही म्हणायचे नाही.

हिंदू कोड बिल तयार करण्याचे काम १९४५ पासून सुरू होते. त्या वेळी संघ परिवारातील एकाही संस्थेचा जन्म झालेला नव्हता. जनसंघ नव्हता, विश्व हिंदू परिषद नव्हती, मजदूर संघ नव्हता, विद्यार्थी परिषदही नव्हती. काँग्रेसच्या शक्तीपुढे तेव्हा संघाची शक्ती सिंहापुढे सशाच्या शक्तीसारखी होती. हिंदू कोड बिलाला विरोध राजेंद्र प्रसाद यांनी केला. काँग्रेसच्या वर्किंग कमिटीने केला. नेहरूंना या सर्वांनी सांगितले की, हिंदू कोड बिल आहे त्या स्थितीत पारित केले तर हिंदू मतदार बिथरतील. कॉम्रेड साहेबांनी भवानराव खैरमोडे यांचे खंड वाचावे. धनंजय कीर लिखित आंबेडकरांचे चरित्र वाचावे. त्यात याची तपशीलवार माहिती दिलेली आहे. संघ राखीव जागांचा कट्टर विरोधी आहे हा कॉम्रेड कंपूचा सिद्धांत आहे. तो सिद्ध करायचा तर, राखीव जागांचा गुरुजींनी कसा विरोध केला, बाळासाहेबांनी कसा केला, रज्जूभय्यांनी कसा केला, आता मोहनजी कसा करतात, यांच्या भाषणातील उतारेच्या उतारे पुराव्यासाठी द्यावे लागतील. संघाच्या महालेखागारात यापैकी एकही शब्द मिळणार नाही. संघ हिंदू माणसाचा विचार फक्त हिंदू म्हणून करतो. संघाची हिंदूची व्याख्या जो या प्राचीन देशावर, इथल्या संस्कृतीवर, इथल्या धर्मविचारावर (ज्याचे दुसरे नाव मानवधर्म आहे.) मूल्यपरंपरांवर, विश्वास ठेवतो, तसे आचरण करण्याचा प्रयत्न करतो, तो हिंदू. यामुळे संघाच्या हिंदूच्या परिभाषेत शीख, जैन, बौद्ध, आर्य समाज, सनातनी, उपासना पद्धती मानणारे, न मानणारे असे सर्वजण येतात. अब्दुल कलामांसारखे लाखो मुसलमान येतात आणि कुरियनसारखे लाखो ख्रिश्चनही. यामुळे संघाचा उल्लेख विषमतावादी, सांप्रदायिक अशा प्रकारे करणे हे संघाविषयीचे घोर अज्ञान प्रगट करणारे असते.

बनसोड यांना संघाने आंबेडकरांचे नाव घ्यावे, हे खटकलेले आहे. कॉम्रेड आंबेडकरभक्त झाले हे बघून माझ्यासारख्या आंबेडकरभक्ताला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांनी ज्या कठोरपणे हिंदू धर्मशास्त्राची चिकित्सा केली, तेवढ्याच कठोरपणे मार्क्सच्या वर्ग सिद्धांताची, आर्थिक सिद्धांताची, धर्मसंकल्पनेचीही केली. कम्युनिझम हा जंगल वणवा आहे आणि त्यापासून सावध राहा, आपले अनुयायी कम्युनिस्ट बनणार नाहीत याची त्यांनी प्रचंड काळजी घेतली होती. कॉम्रेड वाचन संस्कृतीत असल्यामुळे आंबेडकरांचे वाचन केल्यावर हे त्यांच्या लक्षात यायला हरकत नाही.

कॉम्रेड यांच्या म्हणण्याप्रमाणे "देशपातळीवर जनमनाचा ठाव घेऊ शकेल असे कोणतेच व्यक्तिमत्त्व संघ परिवाराकडे नाही.' आणि म्हणून त्यांना कधी गांधी, सरदार पटेल, तर कधी आंबेडकरांचा आधार घ्यावा लागतो. त्यांचे म्हणणे अर्धसत्य आहे. संघ गांधी, पटेल, आंबेडकर, सुभाषचंद्र अशांचा वेळोवेळी आधार घेतो, परंतु का घेतो? संघाला जनमान्यतेसाठी यापैकी एकाही महापुरुषाची कवडीची आवश्यकता नाही. कोणाच्या पालख्या खांद्यावर घेतल्यामुळे संघ जनमान्य होईल, हा कॉम्रेडी भ्रम असू शकतो; परंतु पाय जमिनीवर ठेवून काम करणारा संघ हवेतील मनोरे बांधत नाही. संघाला मान्यता त्याच्या त्याग, तपस्या, समर्पण, अविरत कष्ट, साधी राहणी, श्रेष्ठ चारित्र्य या दैवी गुणांमुळे मिळणार आहे. कोणाची पालखी घेतल्याने नव्हे, तरीही संघ त्यांच्या कार्याचा गौरव करतो. उदा. यंदा बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राष्ट्रपुरुष बाबासाहेब हा विषय देशपातळीवर घेऊन जाण्याचा कार्यक्रम संघाने आखला आहे. तो आंबेडकर अनुयायांना बरा वाटावा म्हणून नाही. त्यांना काय वाटते याची चिंता संघ करत नाही.

बनसोड यांनी त्यांच्या नकळत, परंतु संघाच्या दृष्टीने एक मूलगामी प्रश्न उपस्थित केला आहे. संघ व्यक्तिवादी संघटना नाही. व्यक्ती कितीही मोठी असली तरीही माणूस म्हणून तिच्या मर्यादा असतात. ती चिरकाल मार्गदर्शन करू शकत नाही. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी स्वत:ला संघाचे गुरू केले नाही. सरसंघचालकपद त्यांनी निर्माण केले नाही. त्यांच्या बरोबरच्या सहकाऱ्यांनी केले आणि या पदाचे दायित्व त्यांच्यावर टाकले. म्हणून सरसंघचालक हे प्रथम स्वयंसेवक असतात आणि सरसंघचालक पद ही त्यांची जबाबदारी असते. श्रीगुरुजी म्हणजे विवेकानंदांचे छोटे रूप होते. माझ्या मृत्यूनंतर माझे कुठलेही स्मारक नको असे त्यांनी सांगितले. बाळासाहेब देवरस म्हणजे आणीबाणी संपविणारे, लोकशाहीचे रक्षण करणारे युगप्रवर्तक नेते होते. त्यांनीही सांगितले की, निधन झाल्यानंतर माझे दहन सार्वजनिक स्मशानातच करावे. रेशीमबागेत नको. थोडक्यात, संघ ध्येयनिष्ठ संघटना आहे. राष्ट्र तिचे दैवत आहे, व्यक्तीला संघकार्यात सर्वोच्च स्थान नसते. नेता किंवा पुढारी उभा करणे म्हटले तर संघाच्या डाव्या हाताचा मळ आहे, इतके सोपे काम आहे ते. परंतु संघ ते जाणीवपूर्वक करत नाही. यामुळे प्रचंड क्षमता असलेली कार्यकारी मंडळी बिनचेहऱ्याची माणसे बनून संघात काम करतात. देश आणि समाज उभा करायचा असेल तर आणखी काही पिढ्या हे करावे लागेल, त्याला पर्याय नाही. या सर्व गोष्टी जे समजून घेतील, त्यांच्या ज्ञानात भर पडेल, त्यांना साक्षात्काराचा आनंद होईल; आणि ज्यांना हे समजूनच घ्यायचे नाही, अज्ञान, अविद्येत राहायचे आहे, त्यांनी राहावे. त्याला आपण काय करणार?
(ramesh.patange@gmail.com)