आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकीय अस्वस्थतेचे ‘ओबीसी कार्ड’!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुरोगामी म्हणवणा-या महाराष्ट्राचे राजकारण यूपी-बिहार वगैरे राज्यांच्या तुलनेत तसे जातीआधारित नसले तरी ते अगदीच जातविरहित आहे असे म्हणता येत नाही. विशेषत: राज्याच्या निमशहरी आणि ग्रामीण भागात निवडणुकीप्रसंगी जात हा फॅक्टर नक्कीच महत्त्वाचा समजला जातो. परिणामी अनेक नेतेमंडळी त्या आधारे आपल्या राजकारणाला आकार देण्याचा प्रयत्न करताना दिसतात. आतादेखील नजीकच्या भविष्यात कोणतीही निवडणूक नसताना छगन भुजबळ आणि गोपीनाथ मुंडे या दोघा दिग्गजांनी एकाच व्यासपीठावरून पुढे केलेले ‘ओबीसी कार्ड’ हे त्याचेच निदर्शक म्हणायला हवे.
भुजबळ आणि मुंडे ही दोन्ही राज्यांच्या राजकारणातली बडी प्रस्थे. वास्तविक पाहता उभयतांचे पक्ष भिन्न, विचारसरणी सुद्धा भिन्न. पण अलीकडे दोघांनीही आपल्या राजकारणाचा पाया विस्तारण्यासाठी कटाक्ष ठेवला आहे तो ओबीसी हिताचा. अर्थात त्यामध्ये वावगे तसे काहीच नाही. कारण प्रत्येकच जण आपापल्या जाती अथवा वर्गसमूहाचे हीत पाहत असतो. पण नुकत्याच झालेल्या अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त एकत्र आलेल्या भुजबळ आणि मुंडे यांनी समस्त ओबीसींना राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याचे केलेले आग्रहाचे आवाहन त्यांच्यातल्या अस्वस्थतेवरही प्रकाश टाकल्याखेरीज राहत नाही. कारण आतापर्यंत आपापल्या पक्षात उभयतांच्या शब्दाला जे वजन होते त्यामध्ये सध्या ब-याच अंशी घट झाली आहे हे अनेक उदाहरणांवरून सहजपणे दिसून येते. त्यातसुद्धा भुजबळ यांचे राजकारण कायम आक्रमक स्वरूपाचे राहिले आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीसारख्या पक्षात राहूनदेखील भुजबळ वेळोवेळी सत्तेचा मोठा वाटा आपल्याकडे राखण्यात यशस्वी झाले आहेत. दोन वेळा उपमुख्यमंत्रिपदाची संधी देतानाच गृह, सार्वजनिक बांधकाम यासारख्या महत्त्वाच्या खात्यांची धुरा भुजबळांवर सोपवली गेली. दरम्यानच्या काळात राजकीय वातावरण तपासून भुजबळांनी आपल्या राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईतून नाशिकमध्ये हलवला. त्यातसुद्धा येवल्यासारख्या निमशहरी भागावर लक्ष केंद्रित केले. तेथे अल्पावधीतच बस्तान बसवल्यावर पुतण्या समीर यांच्या रूपाने त्यांनी नाशिकच्या खासदारकीवर दावा सांगितला. पाठोपाठ येवल्याशेजारच्याच नांदगाव मतदारसंघातून पुत्र पंकज यांनाही ते विधानसभेत घेऊन गेले. तोपर्यंत भुजबळ यांच्या यशाची कमान चढती होती. पण नंतर मात्र स्वपक्षातूनच त्यांचे पंख छाटण्यास सुरुवात झाली. प्रथम उपमुख्यमंत्रिपदावर पाणी सोडावे लागले आणि त्यानंतर स्थानिक राजकारणातसुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणावर शह-काटशहांना सामोरे जाणे भाग पडू लागले. बरे त्याला फोडणीसुद्धा धाकट्या बारामतीकरांचीच असल्याचे वारंवार बोलले गेले आणि त्याला मूकसंमती असल्यागत कधी प्रतिवाद करण्याचा प्रयत्नदेखील संबंधितांनी केला नाही.
विधान परिषदेसाठी नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या निमित्ताने तर ते अधिकच स्पष्टपणे अधोरेखित झाले. कारण भुजबळांनी आपले खंदे समर्थक असलेल्या जयवंत जाधव यांच्यासाठी प्रतिष्ठेची केलेली ही लढत त्यांच्या चांगलीच अंगाशी आली. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे या मतदारसंघात असलेले प्राबल्य तसेच सर्वार्थाने त्यांच्याकडे असलेले ‘इलेक्टोरल मेरिट’ पाहता जाधव सहज मैदान मारतील अशी स्थिती होती.
प्रत्यक्षात मात्र जाधव आणि त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले शिवसेनेचे शिवाजी सहाणे तुलनेने कमकुवत असूनही आतून-बाहेरून झालेल्या रसदपुरवठ्यामुळे दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडून सामना टाय झाला. चिठ्ठीच्या आधारे जाधव यांचे नशीब उघडले असले तरी घडल्या प्रकाराने भुजबळ आणि त्यांच्या कॅम्पला चांगलाच हादरा बसला. ज्या पद्धतीने हे सारे झाले ते पराजयापेक्षासुद्धा अधिक जिव्हारी लागणारे होते. या निकालाचा जायचा तो मेसेज संपूर्ण राज्यात गेल्याने भुजबळांच्या अस्वस्थतेत भर पडणे स्वाभाविक आहे. दुसरीकडे मुंडे यांचीसुद्धा स्वपक्षात फारशी वेगळी स्थिती नाही. त्यातच नितीन गडकरी यांची पक्षाध्यक्षपदी झालेली फेरनिवड मुंडे यांना मनापासून रुचणे अशक्य आहे.
या पार्श्वभूमीवर प्राप्त परिस्थितीत आपल्या अस्वस्थतेला वाट करून द्यायची कशी, हा या दोघांसमोरही प्रश्न होता. अशा वेळी अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त हे दोघे एकाच व्यासपीठावर आले म्हटल्यावर ओबीसींचा मुद्दा पुढे येणेसुद्धा अपरिहार्य होते. त्यानुसार समस्त ओबीसींनी एकत्र येण्याची हाक देण्यात आली अन् त्या माध्यमातून पुन्हा एकदा जातीकेंद्रित राजकारणाचे तरंग उठवण्याचा प्रयत्न झाला. पण त्यामुळे फार काही साध्य होण्याजोगी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही. कारण राज्याच्या राजकारणाचा बाज बदलायचा असल्यास त्यासाठी स्वत:च्या पडत्या काळात नव्हे, तर सत्तेच्या भरात असतानाच त्या दिशेने पावले उचलायला हवीत हे नाकारून कसे चालेल ?