आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घोटाळेच अधिक बाहेर येण्याची भीती लक्षात घेऊन तलवारी म्यान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सन 2014 मधील राजकीय महासंग्रामाच्या मोहिमेवर निघालेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या राज ठाकरे यांनी ऐकमेकांच्या विरोधात युद्धाचा शंख पुकारून भात्यातील कमरेखालची शब्दशस्त्रे वापरली. सत्तेची स्वप्ने पाहणारे राज ठाकरे आणि मुख्यमंत्री पदाचे स्वप्न दिवसा पाहणारे अजित पवार यांनी सुरू केलेल्या शब्द युद्धातून महाराष्ट्रातील जनतेची करमणूक थोडीफार झाली, पण आगामी निवडणुकांमध्ये प्रचाराची रणधुमाळी नेमकी कशी असेल याचा ट्रेलरही पुरोगामी म्हणवणार्‍या महाराष्ट्राने पाहिला. अशांत झालेला हत्ती कसा धुमाकूळ घालतो, त्याप्रमाणे अशांत झालेल्या राजकारणातील दोन सरदारांनी युद्धबंदीची अचानक घोषणा करून शांतीला कसे धरले याचे गौडबंगाल मात्र महाराष्ट्राच्या सुजाण पण मतदानापासून चार हात दूर राहणार्‍या जनतेला अद्याप कळले नसल्याचे दु:ख अनेक पातळ्यावरून व्यक्त होत आहे.
खरे तर सध्याची राजकारणातील देश आणि राज्यातील स्थिती पाहता, कोणत्याही पातळीवर विश्वासाचे वातावरण राहिलेले नाही. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवण्याची ट्रिक सापडलेल्या कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीला आता कळून चुकले की पंधरा वर्षांची सत्ता उपभोगल्यानंतर येणारी यंदाची निवडणूक ही आपल्याला सरळसोपी नाही. त्यातच भर म्हणजे केवळ सत्तेसाठी एकत्र आलेल्या कॉँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये विस्तव आड जात नसल्याचेही अनेक प्रकार जनतेने पाहिलेले आहेत. बत्तीस शिराळा येथे नागपंचमीला एकत्र येणार्‍या प्रसिद्ध प्राण्यांमध्ये नसेल इतका अविश्वास या दोन पक्षांमध्ये असल्याचे स्पष्ट होते आहे.
आगामी निवडणुकीत सत्ता समीकरणे बदलू शकतात हे जाणलेल्या राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचाराचे रणशिंग वेळेअगोदरच पुकारले खरे, पण वेळेअगोदर सुरू झालेल्या युद्धाचा लाभ आपल्याला कमी आणि इतर पक्षांनाच अधिक मिळेल, हे लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादी आणि मनसे यांनी आपल्या भूमिकेत तातडीने बदल केले. दोन युवा नेत्यांच्या अर्वाच्य भाषणांनी राजकीय लाभ मिळण्याऐवजी फटकाच बसण्याची आणि आपल्या मंत्र्यांनी केलेले घोटाळेच अधिक बाहेर येण्याची भीती लक्षात आल्यानंतर राजकारणातील पितामह भीष्म यांनी दोन्ही युवा नेत्यांना कानमंत्र देऊन तलवारी म्यान करण्यास भाग पाडल्यानेच दोन्ही अशांत नेत्यांनी शांतीला धरल्याचे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज नाही. राज आणि अजितदादा यांच्यात सुरू झालेल्या शब्द युद्धामुळे जनतेची करमणूक होत असून महाराष्ट्रातील सुजाण जनता याबाबी कधीही माफ करणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोलापूर दौर्‍यावर असताना दिला. पृथ्वीराज बाबांच्या या कानपिचकीचा संदेश थेट पितामहांपर्यंत बरोबर पोहोचला. कारण, पृथ्वीराजबाबा जेव्हा राज व अजितदादांना इशारा देत होते. त्या वेळी त्याच्या बाजूच्या खुर्चीत देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे हे बसलेले होते. एकूणच वेळ चुकलेल्या दोन्ही युवा नेत्यांनी सध्या जरी आपल्या तलवारी म्यान केल्या असल्या तरी प्रत्यक्षात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूक प्रचाराची रंगत असणार आहे. त्या वेळी पुन्हा युद्धबंदी संपवून हे दोन्ही नेते प्रचाराच्या रणांगणात उतरणार, हे निश्चित आहे. महाराष्ट्रातील कॉँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, भाजप, मनसे या प्रमुख पक्षांंच्या वाढत्या ताकदीमुळे राज्यात कोणा एका पक्षाला सत्ता मिळेल अशी तसूभरही शंका कोणाला असण्याचे कारण नाही. प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाचे आमदार वाढवून सत्तेची चावी आपल्या हाती ठेवण्याचा प्रयत्न करणार हे नक्की आहे.
गेल्या दहा ते पंधरा वर्षांतील देशाच्या ज्या-ज्या राज्यांची निवडणूक झाली. त्या-त्या राज्यामधील जनतेने कोण्या एका पक्षाला स्वबळावर सत्तेची संधी दिल्याने त्या राज्यांचा विकास गतीने होत असल्याची वस्तुस्थिती सर्वांसमोर आहे; परंतु महाराष्ट्रातच पाच पक्षांचे राजकारण प्रभावी असल्याने कोणालाही स्वबळावर सत्ता मिळत नाही. त्यामुळे आघाडी व युतीचे राजकारण करून सत्तेची मनमानी करणार्‍यांमुळे महाराष्ट्राची सर्वच पातळ्यांवर अधोगती होत आहे. नुकतेच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पावरूनच महाराष्ट्राची आर्थिकस्थिती लक्षात येण्यसारखी आहे. सत्ताधार्‍याकडून आता दुष्काळाच्या भांडवलावर आगामी निवडणूक जिंकण्याचे मनसुभे रचले जात आहेत, पण स्वत:ला शहाणे समजून मतदानापासून दूर राहणार्‍या उंटावरील शहाण्या मतदारांनी यंदा तरी मतदानात सहभागी होऊन सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून मतदान केले तरच महाराष्ट्राला उज्ज्वल भविष्याची अपेक्षा आहे, अन्यथा आपली पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही, हे नक्की आहे.