आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंतनशील प्रयोगांची तीन दशके

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आज 22 जानेवारी रोजी 30 व्या वर्षात पदार्पण करत आहे. या तीन दशकांतील म्हाळगी प्रबोधिनीची वाटचाल विलक्षण आहे. ‘आपल्याला जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा बांधायची नाही, तर ज्याला संलग्न होण्यासाठी विश्वभरातून आवाहने येतील अशी जागतिक स्तरावरील प्रशिक्षण आणि संशोधन संस्था उभारायची आहे,’ हे प्रबोधिनीचे शिल्पकार दिवंगत प्रमोद महाजन यांचे उद्गार आहेत. प्रमोदजींच्या या उद्गारातच प्रबोधिनी स्वत:ला कोणत्या स्तरावर पाहते आहे, ते स्पष्ट होते.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी काय करू शकत नाही? कॉर्पोरेट ट्रेनिंग, सामाजिक संस्थांच्या संस्थाजीवन विकासासाठी निरंतर चालवण्यात येणारे प्रशिक्षणवर्ग, मानवाधिकार मंच आणि विदर्भातील आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांसाठी चालवण्यात येणारा ‘अन्नदाता सुखी भव’ हा प्रकल्प, तसेच विश्वबंधुत्वाला समर्पित युनिव्हर्सल ब्रदरहुड प्रोग्राम - हे आणि असे बहुआयामी कार्यक्रम म्हाळगी प्रबोधिनीच्या समाजजीवनातील आवश्यक अस्तित्वाची साक्ष देतात. राजकीय कार्यकर्त्याला प्रशिक्षणाची काही गरज असते का, या प्रश्नवलयात वावरणा-या समाजजीवनात, वैचारिक अस्पृश्यतेचा लवलेशही आपल्या कार्यसिद्धीच्या आड न येऊ देता, राजकीय कार्यकर्त्यांना परिणामकारक प्रशिक्षण देणारी द. आशियातील एकमेव संस्था असा लौकिक म्हाळगी प्रबोधिनीने कमावला आहे. प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण मिळावे म्हणून उभारलेल्या म्हाळगी प्रबोधिनीने आपले जीवितकार्य कधीच संकुचित होऊ दिले नाही. यामुळेच शिवसेना, मनसे, शेतकरी कामगार पक्ष, राष्‍ट्र वादी काँग्रेस अशा विविध प्रमुख राजकीय पक्षांच्या वा त्या पक्षांच्या संबंधित संस्थांच्या (अपवाद - काँग्रेस व कम्युनिस्ट पक्ष) कार्यकर्त्यांचे प्रशिक्षणवर्ग अत्यंत उत्साहात आणि राजकीय नेतावर्ग साधारणत: ज्याला -आपणास हे लागू नाही असे मानतो- त्या वेळ व अनुशासन याच्या मर्यादेत होताना पाहणे, हा नक्कीच एक अनोखा अनुभव आहे.

1982 मध्ये मुंबईतील वडाळा येथील चंचल स्मृतीतील लहानशा कार्यालयात आपल्या कार्याची मुहूर्तमेढ उभारणारी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आता केशवसृष्टी येथे सुसज्ज हेलिपॅड आपल्या परिसरात वागवणा-या एका विशाल संकुलात आपले कार्य पुढे नेते आहे. राजकीय कार्यकर्त्यांना प्रशिक्षणाची गरज प्रथम ओळखली जनसंघाचे दिशादर्शक व एकात्म मानवतावाद या तत्त्वज्ञानाचे प्रणेते दीनदयाळ उपाध्याय यांनी. राष्‍ट्र ीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी म्हटले होते की, राजकीय क्षेत्र हे घरातील मोरीसारखे असते, तिथे घसरून पडण्याची शक्यता जास्त. जनसंघाची उभारणी करताना गुरुजींच्या या उक्तीचा अर्थ आणि महत्त्व लक्षात घेऊन दीनदयाळजींनी राजकीय कार्यकर्त्याची सामाजिक जबाबदारी व चारित्र्यवान व्यक्तिगत व्यवहार यांचा उत्तम मिलाफ साधत सध्याच्या काळात अव्यवहार्य वाटावी, अशी जनसंघाची कार्यपद्धती निर्माण केली आणि अत्यंत परिणामकारकपणे ती वास्तवात राबवलीसुद्धा!

2005 चा मुंबईतील जलप्रलय. जीवित व वित्तहानीची चर्चा, शासनाच्या अकार्यक्षमतेचे असंख्य पुरावे, चिडलेली जनता या नकारात्मक वातावरणात प्रबोधिनीचे कार्यकर्ते थोडा वेगळा विचार करतात. मुंबईच्या या महासंकटात कोणीतरी पुढे सरसावले असतीलच ना, लोकांचे प्राण कोणीतरी वाचवले असतीलच ना, प्रशासनाच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा प्रसंगावधान राखून कोणी वीरांनी आपले प्राण धोक्यात घालून इतरांना वाचवायचा प्रयत्न केला असेलच ना, हा विचार मनात आला आणि त्याला मूर्त रूप देण्याचे प्रयत्न सुरू झाले. या सर्वांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या रोमांचकारी करामतीची गाथा शब्दबद्ध करण्यात मदतीला आले बॉम्बे कॉलेज आॅफ जर्नालिझमचे (के. सी. महाविद्यालय, चर्चगेट) पत्रकारितेचे विद्यार्थी. ‘फक्त लढ म्हणा’ या वीर मुंबईकरांच्या वीरगाथांचे पुस्तक आकाराला आले आणि म्हाळगी प्रबोधिनीने एका भव्य कार्यक्रमात मुंबईच्या या सर्व वीरांना एकत्र आणून त्यांचा जाहीर सत्कार केला.

2009 ची सार्वत्रिक निवडणूक. एका बैठकीत मतदारांच्या जाणीव-जागृतीसाठी म्हाळगी प्रबोधिनीचे योगदान असावे, अशी चर्चा सुरू होते - मुख्य राजकीय पक्षांच्या निवडणूक जाहीरनाम्यांचे प्रदर्शन भरवता येईल, अशी कल्पना प्रबोधिनीचे महासंचालक डॉ. विनय सहस्रबुद्धे सुचवतात आणि या ‘वन लाइनर’वर प्रबोधिनीचे कार्यकर्ते कामाला लागतात. अपार कष्ट घेत जे साकार होते ते ‘जनतंत्र 2009’ हे राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्याचे अतीव सुंदर आणि माहितीपूर्ण प्रदर्शन. राजा शिवाजी विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमातील परिसंवादात आपले विचार मांडण्यासाठी कुमार केतकर, निखिल वागळे, सुधीर जोगळेकर यांसारखे अनुभवी व ज्येष्ठ पत्रकार तसेच कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड अजित अभ्यंकर, काँग्रेसचे अनंत गाडगीळ, भाजपचे बाळासाहेब आपटे असे विभिन्न राजकीय विचारधारांचे विचारक एकाच मंचावर येतात आणि भारतीय लोकशाही व मतदारांची प्रगल्भता कशी विकसित होईल याचे चिंतन करतात, हे दृश्यच किती आश्वासक! ही किमया म्हाळगी प्रबोधिनीच करू जाणे!

प्रबोधिनीचे मानवाधिकार जाणीव-जागृती व अध्ययन केंद्र आपला अभ्यासगट भिवंडीला पाठवते. घटनास्थळाला भेट देऊन आणि अनेक मुलाखती व दस्तऐवजांचा अभ्यास करून अभ्यासगट आपला अहवाल प्रकाशित करतो. ‘सर्वसामान्य नागरिकांच्या मानवाधिकारांचे रक्षण करणा-या पोलिसांना मानवाधिकार आहेत की नाही आणि त्याची जपणूक करण्याची जबाबदारी कोणाची?’ हा नवीन विचार प्रबोधिनीने समाजासमोर प्रसृत केला आणि मानवाधिकार आयोगालाही विचारला. महत्त्वाचे असे, की दीड वर्ष चाललेल्या सुनावणीनंतर मानवाधिकार आयोगाने या विचाराला दुजोरा दिला आणि योग्य ते निर्देश गृहमंत्रालयाला दिले. म्हाळगी प्रबोधिनीचे हे योगदान नि:संशयपणे महत्त्वाचे असेच आहे. ‘सामना’च्या विपणन विभागाचे तरुण आणि उत्साही प्रमुख दीपक शिंदे प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक रवींद्र साठे यांना भेटतात.

‘सामना’च्या विपणन विभागातील अधिका-यांचे एक प्रशिक्षण त्यांना घ्यायचे आहे आणि त्यांचे म्हणणे आहे की, म्हाळगी प्रबोधिनीनेच त्यातील विषय-वक्ते यांची मांडणी करावी. असे प्रशिक्षण आयोजित करणे हे प्रबोधिनीच्या कार्यक्रम विभागाचे आवडते काम. नियोजनपूर्वक झालेले हे प्रशिक्षण सर्वार्थाने अनोखे ठरते. संयुक्त राष्‍ट्र संघाच्या सामाजिक संस्थांच्या सल्लागार मंडळात मानांकन मिळवलेल्या म्हाळगी प्रबोधिनीच्या सर्वच कार्यकलापाचा आढावा एका लेखात घेणे अवघडच आहे. कारण प्रत्येक काम हे अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी विचार करून केलेले. स्थापनेपासून 30 वर्षांच्या कालावधीत म्हाळगी प्रबोधिनीने जे काही साधले आहे, ते साधलेल्या बहुआयामी कार्यकर्तृत्व असणा-या संस्था समाजात विरळाच आहेत. असे असतानाही म्हाळगी प्रबोधिनी मात्र आपले काम, सामाजिक दायित्व आणि समाजातील परिणामकारकता याबद्दल कायम असमाधानी राहिली आहे; ही सकारात्मक अस्वस्थताच म्हाळगी प्रबोधिनीच्या सातत्याने गुणात्मक उपक्रम राबवण्याचे गमक आहे.
गेली तीन दशके आपले विहित कर्म करतानाच समाजातील गुणात्मकतेचा, परिणामकारक प्रशिक्षणाचा एक प्रकारचा व्हॅक्युम भरून काढणा-या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया!