आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफी कायमस्वरूपी उपाय नाही!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या सगळीकडे कर्जमाफीची चर्चा सुरू आहे, परंतु कर्जमाफी हा कायमस्वरूपी उपाय नाही. त्यापेक्षा सरकारने काही दीर्घकालीन उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असे आम्हाला वाटते. पूर्ण कोरडवाहू असलेल्या, उजाड झालेल्या हिवरेबाजारसारख्या गावात आम्ही शेती सुधारणेच्या उपाययोजनांद्वारे दरडोई ८३२ रुपये असलेले वार्षिक उत्पन्न ३० हजारांच्या घरात नेले आहे ते नियमित कर्जफेड आणि शेतीविकासाच्या योजना या त्रिसूत्रीच्या बळावर.  
 
महाराष्ट्राचा ५२ टक्के प्रदेश अवर्षणप्रवण आहे. त्यामुळे शेतीत कर्जबाजारीपणाचे संकट ओढवले आहे. ते एकवेळच्या कर्जमाफीने भरून निघणारे नाही. त्यामुळे शेती विकासासाठी तीन तातडीच्या योजना सरकारने करण्याची गरज आहे, असे आम्हाला वाटते. पहिली गरज म्हणजे सरकारने येत्या खरिपाच्या हंगामासाठी तत्काळ शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे उपलब्ध करून देणे. अनेकदा बियाण्यांतच फसवणूक झाल्याने शेतकऱ्याचे पूर्ण वर्षाचे गणित विस्कळीत होते. दुसरा मुद्दा आहे तो खते आणि औषधांच्या किमतींबाबत. शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्ज दामदुप्पट होण्यात आणि त्याचा उत्पादन खर्च वाढविण्यास कारणीभूत ठरणारा दुसरा घटक आहे तो खते आणि औषधांच्या अनिर्बंध किमती. अनेकदा ऐन गरजेच्या वेळी शेतकऱ्यांना दुप्पट-चौपट दराने खते आणि औषधे खरेदी करावी लागतात.
 
खते आणि औषधे विकणाऱ्यांकडे त्याच्या उधारीची यादी लंबी-चौडी झालेली असते. त्यामुळे सरकारी मदत किंवा उत्पन्न मिळाले तरी त्यातील बहुतांश खर्च खते आणि औषधांच्या उधारीची परतफेड करण्यात जातो. त्यामुळे हातात पैसा आला तरी शेतकऱ्याचे अर्थकारण बिघडलेले असते. पिकाला खते आणि औषधे देण्याची वेळ अत्यंत नाजूक असते. त्यात शेतकरी हलगर्जी करत नाही. त्यामुळे त्याची यातच जास्त आर्थिक पिळवणूक आणि फसवणूक होताना दिसते. त्यामुळे सरकारने  खते आणि औषधांच्या किमती नियंत्रित राखून पुरवठा नियमित करावा. तिसरी सूचना आहे ती महात्मा गांधी रोजगार हमी योजनेसोबत शेतीच्या कामाला जोडावे. शेतकऱ्याचे संपूर्ण कुटुंब शेतावर राबत असते, परंतु त्यांचे मनुष्य दिवस पकडले जात नाहीत. रानातले खळ्यात आणि खळ्यातले बाजारात जाईपर्यंत शेतकऱ्याच्या घरात पैशाची आवक राहत नाही. त्यामुळे दैनंदिन खर्चासोबत आयत्यावेळच्या तातडीचे खर्च कर्जाच्या रकमेतूनच शेतकऱ्यांना करावे लागतात.

त्यामुळे शेतीसाठीचे नांगरणी, पेरणी, खुरपणी, निंदणी आणि कापणी असे दिवस निश्चित करून रोजगार हमीशी त्यांना जोडून त्यातून शेतकऱ्याला त्याच्या शेतावर राबण्याच्या या दिवसांमध्ये रोज दिला जावा, अशी सूचना मी नीती आयोगाकडे केली आहे. त्यामुळे शेतीच्या मशागतीच्या दिवसांत शेतकरी आणि त्याचे कुटुंब शेतात राबत असताना त्यांना रोजगार मिळेल आणि कर्जाचे गणित बिघडणार नाही.  

चौथा मुद्दा आहे तो अर्थातच हमी भावाचा. शेतकऱ्याने कितीही प्रतिकूल परिस्थितीत पिकविले तरी बाजारात माल नेल्यावर त्याच्या हातात काहीच पडत नाही. दुसरीकडे मातीमोल भावाने शेतकऱ्याकडून खरेदी केला जात असलेला माल ग्राहकाला चढ्या भावाने विकला जातो. त्यामुळे सध्याच्या बाजार व्यवस्थेत शेतकरी आणि ग्राहक हे दोघेही भरडले जाताना दिसत आहेत. शेतीमालाची ही बाजार व्यवस्था बदलणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्याला हमी भाव मिळणे ही त्याची सुरुवात आहे. त्यामुळे हमी भावाचा मुद्दा त्वरित मार्गी लावणे गरजेचे आहे.  
 
आज शेतकऱ्याला जगवणे हे खूप गरजेचे आहे. सरकारने युद्धपातळीवर त्याचे नियोजन करणे अत्यावश्यक आहे. कर्जमाफी किंवा कर्जाचे पुनर्गठण हे फसवे उपाय आहेत. शेतकरी कर्जबाजारी झाला तर १० ते १२ टक्क्यांनी व्याज भरत राहतो. त्यामुळे आम्ही हिवरेबाजारमध्ये शून्य टक्के थकबाकी हे सूत्र अवलंबिले आहे. त्यासाठी गावातील प्रत्येक शेतकऱ्यास आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शेती विकासाच्या मुख्य योजनांसह दूध संस्थांसारख्या जोड उद्योगांना प्रोत्साहन देत आहोत. गावातील दूध संस्था, विविध कार्यकारी संस्था, कृषी सेवा केंद्र या संस्था जगल्या तर त्या शेतकऱ्यास जगवतील. शेतकरी कर्जबाजारी झाला की सोसायटी बुडवतो. बँकांचे हप्ते भरू शकत नाही. अशावेळी संस्थात्मक पतपुरवठ्यापासून तो दूर फेकला जातो. तो खासगी सावकारीत अडकतो किंवा नको ते करून बसतो. हे होऊ नये याची खबरदारी गावाने गावाच्या पातळीवर घेणे गरजेचे आहे, शक्य आहे.  गावातील कोणीही थकबाकी ठेवायची नाही, गैरव्यवहार करायचे नाहीत, गावातील संस्था वाढवायच्या आणि शेतकरी जगवायचा असे गावाने ठरविले तर हे शक्य आहे. आम्ही हिवरेबाजारच्या माध्यमातून गावातील संस्था जगवल्या, व्यसने कमी केली. उत्पादन खर्च वाढविला आणि नियमित कर्जफेड केली. हिवरेबाजारला जे जमले ते महाराष्ट्रातील प्रत्येक गावाला करणे शक्य आहे. गरज आहे ती उचित नियोजनाची आणि ते करण्याच्या इच्छाशक्तीची.

popatrao.hiwarebazar@gmail.com
 
बातम्या आणखी आहेत...