आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्माद आणि दादागिरी (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘दादा’ या दोनअक्षरी शब्दाची दोन अगदी भिन्न रूपे आपल्या संस्कृतीत मान्यता पावलेली आहेत. पैकी एकामध्ये कौटुंबिक जबाबदारी, आस्था, आपुलकी याचे भान देणारे वडीलकीचे नाते आहे; तर दुसर्‍यामध्ये मनगटशाहीच्या जोरावरील टगेगिरी, झुंडशाहीचा अंतर्भाव आहे. समाजकारणाच्या पायावर जोपर्यंत राजकारण बेतले होते, तोपर्यंत राजकीय क्षेत्रातील जबाबदार व्यक्तिमत्त्वांना आदराने दादा असे संबोधले जायचे. पण गेल्या दीड-दोन दशकांत समाजकारणाऐवजी टगेगिरीवर आणि गुन्हेगारीकरणावर राजकारणाचा पाया घातला जाऊ लागला अन् दुसर्‍या प्रकारच्या दादांची चलती सुरू झाली. त्यातूनच मग सत्तेच्या जोरावर आपण वाट्टेल ते करू शकतो, अशी ‘एकच वादा.. काहीही लादा’ या चालीवरची बेपर्वा राजकीय संस्कृती राज्यात फोफावली. त्याहीपुढे जात दादागिरीचा उदो उदो सुरू झाला आणि अर्थातच उपमुख्यमंत्री अजित‘दादा’ पवार हे त्याचे ‘आयकॉन’ बनले. इंदापूरजवळच्या निंबोडी येथील जाहीर सभेत त्यांनी जी मुक्ताफळे उधळली, ती या प्रतिमेला साजेशीच आहेत. दुष्काळी भागातील एक आंदोलक मुंबईत पंचावन्न दिवसांपासून उपोषणास बसला आहे. लोकांच्या जीवनमरणाशी निगडित असलेल्या या प्रश्नावर खरे तर गांभीर्यपूर्वक तोडगा काढणे गरजेचे होते. गांभीर्य नाही, किमानपक्षी आपुलकी तरी दाखवायला हवी होती. पण त्याऐवजी उपमुख्यमंत्र्यांचे ‘पाणी नाही.. काय सोडता.. मुतता का तिथं आता?’ हे वक्तव्य फक्त मदमस्त हत्तीच्या गोष्टीची आठवणच करून देत नाही, तर त्या हत्तीच्या कृतीलादेखील लाजवते. बिचारा हत्ती मद आल्यामुळे मस्त होतो, नाहीतर तो सुसंस्कृतच असतो; पण सत्तेचा मद चढला की काय होते ते अजितदादांनी दाखवून दिले आहे. खुर्चीच्या मस्तीने सत्ताधारी कसे मदांध बनतात, त्याची प्रचिती यातून आल्याशिवाय राहत नाही. याच सभेत राज्यातील लोडशेडिंगचा मुद्दाही त्यांनी असाच कुचेष्टेत काढला. लोडशेडिंगमुळे पोरं जन्माला येण्याचे प्रमाण वाढल्याचे सांगताना वृत्तवाहिन्यांवर दिसलेली त्यांची शारीरभाषा आणि त्यांनी दिलेले संदर्भ केवळ बीभत्स या प्रकारात मोडणारे म्हणावे लागतील. आजवर शासकीय अधिकारी, राजकीय विरोधक, स्वपक्षीय सहकारी अशा वर्तुळात अजित पवारांच्या दादागिरीचे किस्से रंगवून रंगवून सांगितले जात. तथापि, आता हे वर्तुळ खूपच विस्तारत चालले आहे. मध्यंतरी जास्तीत जास्त आमदारांना अंकित करून घेत राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदावर कब्जा करताना त्यांनी या दादागिरीचा प्रत्यय साक्षात आपल्या काकांनाही दिला. अर्थात, खंजीर नीतीच्या राजकारणाची मुहूर्तमेढ याच काकांनी महाराष्ट्रात केली असल्याने त्याचे फारसे कुणी मनाला लावून घेतले नाही, हा भाग वेगळा. किंबहुना या काकांनीच जन्मास घातलेल्या अख्ख्या राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा आज जनमानसात मस्तवाल अशी बनण्याचे मूळ संदर्भही कदाचित त्याच खंजिरी राजकारणात दडले असावेत. कारण तोपर्यंत यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राची प्रतिमा आणि प्रतिभादेखील देशातील अन्य प्रदेशांसाठी आदर्शवत म्हणावी अशी होती. सभ्य व सुसंस्कृत राजकारणाचा पाया यशवंतरावांनी महाराष्ट्रात घातला. मात्र, त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होत नाही तोच महाराष्ट्राच्या राजकारणाचे असे मस्तवाल चित्र पुढे यावे, यासारखे दुर्दैव नाही. वास्तविक, यशवंतरावांच्या काळात जी माणसे मोठी झाली (म्हणजे वयाने वाढली) त्यामध्ये अजित पवारांचाही समावेश आहे. 1984 मध्ये यशवंतराव निवर्तले तत्पूर्वीच अजितदादा वयाने जाणते झाले होते. पण त्यांच्यावर संस्कार भलताच झालेला दिसतो. 1960 मध्ये महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर पहिली काही वर्षे वगळता पुढे राजकीय र्‍हासाची प्रक्रिया सुरू झाली आणि गेल्या दोन दशकांत तिने चांगलाच वेग पकडला. राजकीय क्षेत्रामध्ये कमीअधिक प्रमाणात सगळ्याच स्तरांवर त्याची जाणीव होत असली तरी टगेगिरी आणि दादागिरीमध्ये राष्ट्रवाद्यांनी इतरांना कित्येक योजने मागे टाकले आहे. सगळी ‘क्रीम’ खाती तीन टर्मपासून या पक्षाकडे असल्याचा तो परिणाम असावा. कारण सिंचन घोटाळा असो, टोल नाके असोत की मुंब्रा येथील इमारत दुर्घटना असो, या सगळ्यामध्ये ‘राष्ट्रवादी’च कसे असतात, असा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित होतो. त्यामुळे कोणताही मोठा प्रकल्प असो की एखादा मेगा इव्हेंट; त्यावर संशयाचे ढग लगेच जमतात. नाशिक येथे भरणार्‍या आगामी कुंभमेळ्यासाठी येणारे शेकडो कोटींचे फंड राष्ट्रवाद्यांच्याच खिशात जाण्याची सुरू झालेली चर्चा हे त्याचेच उदाहरण म्हणावे लागेल. बरे, एवढे होऊनही कुठल्याच दादा-बाबांना त्याचे सोयरसुतक दिसत नाही. युती शासनाच्या काळात तत्कालीन आरोग्यमंत्रिपदी असलेल्या भाजपच्या डॉ. दौलतराव आहेर यांनी (अल्पकाळासाठी तेदेखील राष्ट्रवादीत दाखल झाले होते) कुपोषित भागाचा दौरा करतेवेळी ‘आपण तिथे गेल्याने संबंधित जिवंत होणार आहेत काय?’ असे बेमुर्वत विधान केले होते. पण कालांतराने नेहमीप्रमाणे त्यावर पडदा पडला. हा संदर्भ आता देण्याचा उद्देश राज्यकर्ते उन्मत्त झाल्यास त्यांच्यात कशी बेफिकिरी येते ते दर्शवण्याचा आहे. आतासुद्धा या वक्तव्यावर काका-पुतण्यांचा माफीनामा आल्यामुळे अलगद पडदा पडण्याची चिन्हे आहेत. नाही म्हणायला राज आणि उद्धव यांनी अजितदादांना तशाच भाषेत उत्तर दिले असले तरी ठाकरी भाषेचे लेबल लावून त्याची बोळवण केली जाईल. एकंदर, मतीपासून सुरूझालेला महाराष्ट्राच्या राजकारणाचा बाज कालौघात मतापर्यंत आणि आता चक्क मुतापर्यंत येऊन ठेपल्याने सगळीच माती झाली आहे. पण मातीतूनच नवा अंकुर फुटत असतो. फक्त आपल्यासारख्या राजकीय व्यवस्थेत त्यासाठी जनतेला राज्यकर्त्यांवर चांगला अंकुश ठेवावा लागतो. मतदानाला न जाता ऊठसूट केवळ राजकारण्यांवर तोंडसुख घेणार्‍या तथाकथित पांढरपेशांनी या निमित्ताने हे लक्षात घेतले, तर अशा राजकीय दादागिरीचे समूळ उच्चाटन अवघड खचितच नाही.