आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभाकर कुंटे चळवळीतील एक धगधगता निखारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्य चळवळीत, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात आणि गोवा मुक्तिसंग्रामात धडाडीने पुढे जाणारे, संघर्षाची भूमिका घेणारे प्रभाकर कुंटे हे शेवटपर्यंत आपल्या परखड वक्तव्याने आणि भाष्याने जुन्या आणि नवीन पिढीसमोर एक आदर्श म्हणून कायम राहिले. स्वातंत्र्य चळवळीचा काळ वेगळा होता. मुंबईतून या चळवळीचे रणशिंग फुंकले गेले होते आणि तरुण वयात प्रभाकर कुंटे त्याकडे आकर्षति झाले होते. त्यांची वैचारिकबैठक, समाजवादी विचारसरणी थोडीशी साम्यवादी असल्याने ते कामगारांच्या लढय़ामध्ये अग्रभागी राहत असत. सत्ता ही सेवेसाठी आहे, ही भूमिका त्यांनी कायम ठेवली होती.
पूर्वीच्या काळी संघर्ष करणे हा एक गुण मानला जायचा. जनता भारावून जात असे. कुंटे 42च्या चळवळीत मुंबईत सहभागी झाले. त्यांनी कारावास तर भोगलाच; पण तो भोगताना कोणतीही कुरकुर नव्हती आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण ते केले, कारावास भोगला, म्हणून मला सर्व काही द्या, अशी भूमिकाही त्यांनी कधी घेतली नाही. 57 ते 61 पर्यंत मुंबई महापालिकेचे ते सदस्य होते. या काळात त्यांच्याबरोबर अनेक मान्यवरांनी काम केले आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्याचे ते एक साधन, असे कुंटे मानत असत आणि या साधनाचा त्यांनी आपल्या म्हणजेच काँग्रेस पक्षाच्या उद्दिष्टासाठी वापर केला. 1972ला कुर्ला मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून आले. वसंतराव नाईकांनी त्यांना संधी दिली नाही; पण शंकरराव चव्हाणांनी त्यांना मंत्रिमंडळात घेऊन सार्वजनिक बांधकाम आणि गृहनिर्माण या खात्याचा राज्यमंत्री पदाचा कारभार त्यांच्याकडे सोपवला. गृहनिर्माण खात्याचे सर्वाधिक काम मुंबई शहरातच आहे. कामगार चळवळीत असल्यामुळे त्यांना परदेशात जाण्याचीही संधी प्राप्त झाली होती. अमेरिका व युरोपीय देशांनाही त्यांनी भेटी दिल्या होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांचे त्या काळातले एका अर्थाने ते प्रवक्ते असल्यासारखेच होते. अनेकदा वादग्रस्त विषयांवर ते मतप्रदर्शन करत असत. हे मतप्रदर्शन करण्याचे काम त्यांनी शेवटपर्यंत केले.
1999मध्ये पवारांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कुंटे त्यांच्याबरोबर बाहेर पडले नाहीत; पण त्यांनी कामगार चळवळीतही फूट पडू दिली नाही. मूळचे अलिबागचे असल्यामुळे त्यांचा बॅ. ए. आर. अंतुले यांच्याशी घनिष्ठ संबंध होता. वादग्रस्त विषयात त्यांनी आपल्या भूमिका तर मांडल्याच मांडल्या; पण पक्षासाठी लेखनही केले. आजारी असतानाही लेखनावर त्यांचा भर होता. सहायकाच्या मदतीने त्यांनी 'शिदोरी' या प्रदेश काँग्रेसच्या मुखपत्रासाठीही लेखन केले आहे. सैनिकी शाळा काढण्याची त्यांची भूमिका होती, ती त्यांनी रायगडमध्ये परिपूर्ण केली. शंकरराव चव्हाणांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना सैनिक स्कूलचा प्रस्ताव राज्यभरात स्थापन करण्यासाठी आणला होता. त्याची राज्यभर स्थापना करण्याची भूमिकाही घेण्यात आली होती. चव्हाणांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ फार कमी होता. याच काळात आणीबाणी आल्यामुळे या विषयाकडे म्हणावे तसे लक्ष दिले गेले नाही आणि हा विषय नंतरच्या काळात राजकीय पार्श्वभूमीवर मागे पडला. पूर्वी महाराष्ट्रात पब्लिक स्कूल म्हणून संस्था होत्या. त्याच धर्तीवर त्यांनी सैनिकी शाळा काढण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्याचा आग्रह धरला आणि राज्याच्या काही भागात तो प्रयोग झाला. अर्थात हा प्रयोग फारसा यशस्वी झाला नाही हे खरे; पण संकल्पना मात्र टिकून राहिली. अलीकडच्या काळात त्यांनी अलिबाग येथे अशी सैनिकी शाळा सुरू केली. उद्देश एवढाच की, मराठी माणसाला सैन्यामध्ये अधिकाधिक संधी तर मिळावीच, शिवाय सैनिकी शाळेच्या अभ्यासातून एक प्रकारची करडी शिस्त तयार व्हावी आणि मराठी तरुण सर्व आघाड्यांवर पुढे राहावा.
लोकोपयोगी योजना अनेकदा राजकीय निर्णयाच्या लालफितीत मागे पडतात. कुंटे यांनी आणलेल्या अनेक योजना नंतरच्या त्यांच्याच पक्षाच्या शासनाने मागे टाकल्या. यामुळे चांगल्या योजनांना संधी प्राप्त झाली नाही. अन्यथा सैनिकी शाळा असो, गृहनिर्माणाच्या समस्या असो, त्या मागे पडल्या नसत्या. सिडकोचा पर्याय आला हे खरे; पण मुंबई शहरात मोठय़ा प्रमाणात भूखंड असूनही तेथे गृहनिर्माण विभागामार्फत दर्जेदार बांधकाम झाले असते तर कामगारांचा, सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसांचा निवार्‍याचा प्रश्न चांगल्या प्रकारे मार्गी लागला असता. राजकीय इच्छाशक्ती असेल तर योजना परिपूर्ण होतात. त्यात स्वार्थाचा लवलेश नसतो.
एक प्रखर, पण पक्षनिष्ठ कार्यकर्ता म्हणून ते नेहमी आघाडीवर राहिले. संसदीय कार्यपद्धतीवर त्यांचा विश्वास होता. त्यामुळे कोठेही अनुचित घडत असेल तर ते भाष्य करत असत. कामगार चळवळीबाबत आणि मुंबईतील समस्यांबाबत त्यांनी एक ठोस भूमिका घेतली होती आणि त्या भूमिकेपासून सरकार दूर जात असेल तर ते कोणाचीही हयगय करत नसत. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण आणि त्यानंतर केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध राहिले आहेत. महाराष्ट्रात त्यांचे वेगळे स्थान होते. या स्थानाचा त्यांनी कधीही दुरुपयोग केला नाही, उलट होता होईतो जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी आपले वजन खर्ची केले. युतीच्या काळातही त्यांच्या शब्दाचा मान होता. आघाडी सरकारमध्येही त्यांना आदराने वागवले जात असे. अनेक नेत्यांचा असलेला घनिष्ठ संबंध हा जसा त्यांचा एक गुण होता, तसा फटकळपणा हाही त्यांच्या प्रगतीत आलेला एक अडसर होता. त्यामुळे कधी-कधी त्यांना त्रासही झाला. गोवा मुक्तिसंग्रामातील त्यांचे योगदान तर महाराष्ट्राबरोबर गोव्यातील जनतेला स्फूर्ती देणारे ठरले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांची भूमिका कॉम्रेड डांगे, एस. एम. जोशी, आचार्य अत्रे यांना अनुकूल असली तरीही काँग्रेस पक्षाला प्रतिकूल मात्र होऊ दिली नाही. अनेक स्वातंत्र्यसेनानींबरोबर काम केल्यामुळे त्यांच्यामध्ये जिद्द तर होतीच, शिवाय बुद्धिप्रामाण्यवाद्यांबरोबर त्यांची बर्‍यापैकी ऊठबस होती. त्यामुळे त्यांना सर्व स्तरावर पाठिंबा मिळत असे. कुंटेंच्या शब्दांना माध्यमामध्ये एक आगळे-वेगळे स्थान होते. त्यामुळे ते माध्यमाचे कायम लाडके राहिले. कुंटे हा स्वातंत्र्य चळवळीतील धगधगता निखारा होता. आज तो शांत झाला; पण त्यांच्या कार्यातून ज्यांनी प्रेरणा घेतली ते कामगार प्रभाकर कुंटेंना विसरणार नाहीत. एक लाल सलाम केल्याशिवाय शांत बसणारही नाहीत.