आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘युधिष्ठीर’च्या नेमणुकीचे वादंग!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सत्ता हाती आली की, आपली माणसं विविध मोक्याच्या पदांवर बसवणं, हे जगात सर्वत्रच चालतं. जेव्हा अमेरिकेत अध्यक्षीय निवडणूक होईल, तेव्हा अगदी बराक ओबामा यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्याच हिलरी क्लिंटन विजयी झाल्या, तरीही मोक्याच्या जागी आपल्या विश्वासातील माणसं त्या आणून बसवतील. ब्रिटनमध्ये डेव्हिड कॅमेरॉन पुन्हा पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांच्या सरकारातील अनेक मंत्री जसे बदलले गेले, तसंच प्रशासकीय व संलग्न यंत्रणेतील मोक्याच्या जागी नवी माणसं आली. म्हणूनच २०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या हाती स्वबळावर सत्ता आल्यानं संघ परिवारानं अशा पदांवर आपली माणसं नेमणं यात काहीच गैर नाही. तरीही मोदी सरकारनं ज्या काही नेमणुका केल्या, त्यानं इतका गदारोळ का झाला आहे? कारण खरा मुद्दा हिंदुत्वाच्या पठडीतील माणसं नेमण्याचा नाहीच. तो आहे लायक माणसं नेमण्याचा. तेथेच हिंदुत्ववाद्यांची खरी कोंडी झाली आहे. जगाची मान्यता पावलेला (पिअर अॅक्सेप्टन्स) देशातील कोणत्याही क्षेत्रातील एकही तज्ज्ञ आज संघ परिवारात नाही, हीच खरी मोदी सरकारची मोठी अडचण आहे. त्यामुळेच आधी या पदांवर बसलेल्या माणसांच्या विचारांचा प्रतिवाद करण्याऐवजी त्यांच्या बौद्धिक चरित्र्यहननाचा मार्ग हिंदुत्ववादी अवलंबत आले आहेत. तेच तंत्र सध्याच्या नेमणुकीचा वाद खेळताना संघ परिवार वापरत आहे.
अमर्त्य सेन यांच्यावरून खेळल्या जाणाऱ्या वादाचंच उदाहरण घेऊया. नोबेल पुरस्कार विजेते सेन हे जगभर मान्यता मिळवलेले अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांच्या मांडणीशी मतभेद असलेले अनेक मान्यवर अर्थतज्ज्ञ जगात आहेत; पण सेन यांच्या बुद्धिमत्तेबद्दल कोणीही शंका घेत नाही आणि त्यांनी केलेल्या मांडणीची दखल घेतल्याविना पुढे जाता येणार नाही, हेही जगभर मान्य केलं जात आलं आहे. उलट मोदी पंतप्रधान होऊ नयेत, असं मत सेन यांनी निवडणुकीच्या आधी व्यक्त केलेलं असल्यानं संघ परिवाराचा त्यांच्यावर डोळा होता. प्राचीन काळातील नालंदा विद्यापीठाचं २१ व्या शतकाला साजेसं पुनरुज्जीवन करून त्याच्या प्रमुखपदी सर्वानुमते सेन यांची नेमणूक झाली होती. तीच पुढे चालू ठेवण्याचा निर्णय आग्नेय आशियातील विविध देशांचे प्रतिनिधी असलेल्या नियामक मंडळानं घेतला; पण मोदी सरकारनं त्यात आडकाठी आणली. नियामक मंडळाच्या ठरावाला सरकार मान्यताच देईना. तेव्हा आपल्यामुळे विद्यापीठाच्या कारभाराला खीळ बसू नये, म्हणून सेन यांनी स्वतःहूनच हे पद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गदारोळ उडाल्यावर आता या विद्यापीठाच्या प्रमुखपदी राहण्यासाठी सेन हे कसे गटबाजी करत होते, त्यांनी पैशाचे कसे गैरव्यवहार केले, अशी चिखलफेक संघ परिवार आणि सत्तेच्या आशेनं या परिवाराच्या परिघावर वावरणारे करत आहेत. प्रत्यक्षात संघ परिवार ज्या संस्कृतीच्या गप्पा मारत असतो, ती खरी भारतीय संस्कृती काय असते, याचं मूर्तिमंत उदाहरण अमर्त्य सेन हे कसे आहेत, हे त्यांनी अलीकडेच ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतून दिसून येतं. संस्कृत व गणित हे दोन विषय आपल्या आवडीचे कसे कसे व का आहेत, कालिदासाचं ‘मृच्छकटिक’ हे नाटक आपल्याला का आवडतं, अतिप्राचीन काळातील परिस्थितीचं वर्णन वेदांत कसं आलं आहे; मात्र वेदांत गणित नाही, नुसती कोडी कशी आहेत; आर्यभट्टाचा गणितावरील ग्रंथ पहिल्यांदा संस्कृतमध्ये वाचल्यावर काय वाटलं, पुढं नोबेल मिळाल्यावर या ग्रंथाची आपल्याकडील जुनी प्रत नोबेल वस्तुसंग्रहालयाला कशी दिली, भारतातील बौद्धिक परंपरेची वैशिष्ट्ये कशी होती व आहेत, अशा अनेक मुद्द्यांवर सेन यांनी विस्तारानं या मुलाखतीत मतप्रदर्शन केलं आहे. जगभर मान्यता पावलेल्या या अर्थतज्ज्ञाचा भारतीय संस्कृती, परंपरा, इतिहास यांचा इतका सखोल व गाढा अभ्यास असल्यानंच ‘आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन’ हे पुस्तक सेन लिहू शकले. बहुविधतेची ही जी भारतीय संस्कृती आहे, तिचा पाया खुलेपणा हा आहे. त्यानंच वाद, विवाद, संवाद व समन्वय या प्रक्रियेला वाव मिळतो आणि त्यातूनच सर्जनशीलतेचा उदय होतो. तसं बघायला गेल्यास जगभरच परंपरावादी व पुरोगामी विचारप्रवाहांत कायम वाद होत आला आहे. हा वाद खेळणारे दोन्ही बाजूंचे बुद्धिवंत आपापल्या विचारप्रवाहातील दिग्गज असतात. तेथे मतभेद असतात, पण दुसऱ्याच्या बौद्धिक क्षमतेविषयी आदर असतो; कारण प्रतिस्पर्ध्याची मतं आज वेगळी आहेत, पण उद्या ती तो बदलू शकतो किंवा आपल्यावरही मत बदलण्याची पाळी येऊ शकते, हे असे वाद खेळणाऱ्या दोन्ही बाजूंतील दिग्गजांनी गृहीतच धरलेलं असते. विविध कला, विज्ञान, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान इत्यादीला जे धुमारे फुटतात, ते याच वाद-विवाद-संवाद-समन्वय या प्रक्रियेमुळे.
नेमका याच खुलेपणाचा पाया असलेल्या प्रक्रियेला हिंदुत्वाच्या साचेबंद चौकटीत वाव नाही. तेथे ‘आम्ही सांगू तेच सत्य’ ही एकचालकानुवर्तित्वाची ठाम भूमिका असते. साहजिकच वैचारिक देवाणघेवाणीला वावच उरत नाही. साचेबंद पोथीनिष्ठ मार्क्सवादी चौकटीतही हेच होत असते. म्हणूनच सोव्हिएत युनियनमध्ये सर्जनशील कलाकार, बुद्धिवंत, वैज्ञानिक यांची मुस्कटदाबी झाली. ‘डॉ. झिवॅगो’सारखी नितांत सुंदर कादंबरी लिहिणाऱ्या बोरिस पास्तरनाकला पडद्याआडचं आयुष्य जगावं लागलं. सोविएत काळात सर्जनशीलतेचा जो गळा घोटला गेला, त्याचे परिणाम त्या कालखंडातील विज्ञान, तंत्रज्ञान, कला इत्यादी सर्व क्षेत्रांवर झाले. हेच चीनमध्येही घडलं व आजही घडत आहे. कारण सर्जनशीलतेला वाव असेल, तेथे विरोधाची ऊर्मीही निर्माण होत असते आणि ही ऊर्मी हा एकचालकानुवर्ती शक्तींना कायमचा धोका वाटत असतो. त्यामुळे अशी ऊर्मी निर्माणच होऊ नये, म्हणून या शक्ती प्रयत्न करीत असतात. संघ परिवाराला भारतात तेच घडवायचे आहे. म्हणूनच साहित्य, कला, चित्रपट, नाटक, विज्ञान, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रांत आपली पकड बसवून तेथील सर्जनशीलता मारून विरोधाची ऊर्मी निर्माणच होऊ न देण्यावर संघ परिवाराचा भर आहे. त्या त्या क्षेत्रातील गरजा व लायकी यांच्यापेक्षा ‘नियंत्रणा’ला संघ परिवाराच्या दृष्टीनं जास्त महत्त्व आहे. साहजिकच गजेंद्र चौहान ‘नियंत्रण’ चांगलं करू शकतात, याची खात्री असल्यानेच त्यांची नेमणूक होते. या पदासाठी त्यांची लायकी काय, हा निकषच ही नेमणूक करताना लावलेला नसतो. म्हणूनच ‘लायकी’चा वाद घालत राहणं निष्फळ आहे. आवश्यकता आहे, ती संघ परिवाराचा खरा उद्देश समजून घेण्याची आणि त्यालाच विरोध करण्याची.
prakaaaa@gmail.com