आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prakash Bal Article About Marathi Sahitya Sammelan Ghuman Punjab

मराठीचं नेहमीचंच रडगाणं !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘नेमेचि येतो पावसाळा’ या उक्तीच्या धर्तीवर ‘नेमेचि येणारे’ साहित्य संमेलन पंजाबातील घुमान येथं पार पडलं. हा मजकूर प्रसिद्ध होईपर्यंत घुमानला गेलेली मंडळी महाराष्ट्रात परतायला सुरुवात झाली असेल. अर्थात साहित्य संमेलनाच्या निमित्तानं ज्यांनी ‘पंजाबवारी’ करून घेतली नसेल आणि साहित्य मंडळानं रेल्वेच्या हातापाया पडून जी झुकझुक गाडी साहित्यप्रेमींना पुरवली होती, तिने ज्यांनी प्रवास केला नसेल, तेच एव्हाना परत आले असतील.

दरवर्षीप्रमाणे यंदाही नेहमीचेच मानापमान, रुसवे-फुगवे, वाद-विवाद संमेलनाआधी घडले. सरकारी मदतीवरून चर्चा झडल्या. राजकारण्यांना मंचावर बसवावं की नाही, या मुद्द्यावरील निरर्थक चर्चेलाही ऊत येऊन गेला. मात्र, एक बरं झालं. साहित्य संमेलन हा उत्सव असतो आणि तो तसाच राहणार, असं निःसंदिग्धपणे अध्यक्षपदी विराजमान झाल्यावर सदानंद मोरे यांनी सांगून टाकलं. निदान पुढच्या वर्षी हा एक मुद्दा तरी चर्चेच्या गुऱ्हाळातून बाद व्हायला हरकत नसावी.
शिवाय या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समकालीन वास्तवाचं साहित्याला भान असणं इत्यादी मुद्द्यांभोवतीही दरवर्षीप्रमाणे या वेळीही चर्चा रंगली. चर्चा इतकी घनघोर केली जाते की, आता मराठी साहित्यविश्व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून ढवळून निघणार वगैरे असा ऐकणार्‍याचा समज व्हावा. मात्र, महाबळेश्वर येथील साहित्य संमेलनाच्या वेळी आनंद यादव यांच्या कादंबरीवरून रान उठवण्यात ज्यांच्या हात होता, तेच आता अध्यक्षपदी बसल्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे बोलतीलच कसे, असा प्रश्न कोणालाच विचारावासा वाटला नाही.

दरवर्षी हेच नाटक होत आलं आहे; कारण भाषा, संस्कृती व समाजव्यवहार यांचं नातं अतूट असतं, याची जाणच या मंडळींना नसते. भाषा हे संपर्क व संवादाचं माध्यम आहे. समाज व्यवहारात ही भाषा जितकी परिणामकारकरीत्या वापरली जाईल, तेवढं तिचं महत्त्व वाढत जातं. हिंदीचंच उदाहरण घेऊया. उत्तर भारतातील राजकारणात आज हिंदी भाषेत वा तिच्या विविध प्रकारच्या बोलीत संवाद व संपर्क साधला जातो. ज्या मराठी नेत्यांना दिल्लीच्या राजकारणात जम बसवायचा आहे, त्यांना हिंदी भाषा बोलता येणं, हे अनिवार्य आहे. मग उत्तर भारतीयांना कितीही विरोध असू दे! दुसरं उदाहरण व्यापार व उद्योग जगताचं घेता येईल. या क्षेत्रातील बहुतेक व्यवहार गुजराती भाषेत होतात. आज संगणकाच्या व्यवस्थापन शास्त्राच्या जमान्यातही शेअर बाजार, दाणा बाजार वा अगदी उद्योग समूहांच्या वरिष्ठ वर्तुळातही गुजराती भाषेचंच प्राबल्य आहे.

असं काही स्थान मराठीला का मिळवता आलं नाही?
या प्रश्नाचं उत्तर शोधायचं तर मराठी माणसाच्या मनोवृत्तीचा धांडोळा घ्यावा लागेल. मराठी माणसाची मनोभूमिका ही प्रगतिशील व पुढं वाटचाल करणारी बनलेलीच नाही. ‘ठेविले अनंत तैसेचि राहावे’ याच चौकटीत मराठी माणूस अडकून पडला आहे. मराठी माणसांच्या वेगळ्या महाराष्ट्र राज्यात उद्यमशीलता, उपक्रमशीलता, उद्योगाची संस्कृती फोफावलीच नाही. व्यापारी वृत्ती रुजवण्याचे प्रयत्न झालेच नाहीत. ‘वेडात दौडले वीर मराठे सात’ हे गर्वगीत गाण्यात आपली छाती फुगून येऊ लागली. ‘महाराष्ट्र जगला, तर देश जगेल’, असं म्हणत आपण ‘महाराष्ट्र माझा’ हे गाणं म्हणत राहिलो. शिवाजी महाराजांचा नावाचा जप करीत बसलो. पण हा जाणता राजा काळाच्या पुढं पाहत होता, म्हणून तो युगपुरुष ठरला, हे आपण साफ विसरून गेलो. मराठे अटकेपार झेंडे लावून आले, हे आपण मिशांवर ताव मारीत सांगत राहिलो; पण मराठे बादशहातर्फे नादिरशहाशी लढत होते, ते अटकेहून परत आले, तेथे राहून त्यांनी आपलं बस्तान बसवलंच नाही, हे लक्षात घ्यायला आपण तयार नव्हतो. देशातील इतर प्रांत पुढं जात होते. तेथील लोक देशभर निर्माण होणार्‍या नवनव्या संधी शोधून आपली प्रगती करीत होते; पण आपण इतिहासात रमत होतो. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आठवणी जागवत होतो.

बेळगाव महाराष्ट्रात आलं नाही, म्हणून अरण्यरुदन करीत होतो; पण म्हणून महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत आणि राज्यातही मराठी माणसाचं आर्थिक बळ कसं उभं राहील, बदलत्या काळातील नवनव्या संधी साधून त्याला कसं पुढं जाता येईल, सर्वच क्षेत्रांत तो आघाडीवर कसा राहील, याचा विचार झालाच नाही. तो राज्यकर्त्यांनी जसा केला नाही, तसा समाजानंही केला नाही, हे लक्षात घेण्याची गरज आहे. शेवटी तुम्ही किती बलिष्ठ व उपक्रमशील, त्यावरच तुम्हाला जोखलं जातं, तुमचं महत्त्व मान्य केलं जातं, तुम्हाला काही मागण्याची ताकद येते, याची जाणीव मराठी समाजानं ठेवली नाही. ‘हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री गेला’ म्हणून आपल्याला कोण अभिमान वाटला; पण सह्याद्री दिल्लीत स्वतःचं स्थान निर्माण करू शकला नाही. हिमालयाच्या सावलीतच तो कायम राहिला.

वस्तुस्थिती ही आहे की, मराठी समाज आपलं स्वत्व गमावून बसला आहे. त्यामुळं दुसर्‍याला दोष देऊन आपलं समाधान करवून घेण्याची वृत्ती बळावली आहे. यशवंतरावांनी मंगलकलश आणला की तांब्या, हा वायफळ वाद साहित्य संमेलनात घालण्यातच आपल्याला रस आहे. आपण या कलशाचा तांब्या केला, हे लक्षात घेण्याची जरुरी आपल्याला वाटेनाशी झाली आहे. मराठी नाटक व चित्रपटांना प्रदर्शनाची संधीच मिळत नसल्याचं रडगाणं आपण गात असतो. पण प्रेक्षक या कलाकृती बघायला का येत नाहीत आणि ते आले, तर व्यापारी नियमांनुसार आपोआपच प्रदर्शनाच्या संधी मिळतीलच, हे लक्षात घ्यायची आपली तयारी नाही. संस्कृती अशी जबरदस्तीनं लादता येत नसते. ती फुलावी लागते. त्यासाठी सर्जनशीलता व संवेदनशीलता यांची गरज असते. अशा रीतीनं फुलणारी संस्कृती समाजात असली, तरच काळाचं भान असलेलं साहित्य निर्माण होऊ शकतं.

तसं ते होत नसल्यानंच आपण २१ व्या शतकातील भारतात बोलत अहोत, हे विसरून संतांनी काय दिलं, मराठ्यांनी काय केलं, अशा निरर्थक मुद्द्यांवर संमेलनाध्यक्ष आपल्या भाषणात चर्चा करीत राहिले आणि नेहमीप्रमाणे मराठीचं रडगाणंही गायलं गेलं.

प्रकाश बाळ
ज्येष्ठ पत्रकार
prakaaaa@gmail.com